गुजरातेत गुळाची रोज आवक आणि विक्री

दैनंदिन उपलब्धतेमुळे शीतगृहात गूळ शिल्लक
Jaggery
JaggeryAgrowon

कोल्हापूर : गूळ हंगाम (Jaggery Season) संपल्यानंतरही गूळ उत्पादक (Jaggery Producer) भागांमध्ये अद्यापही गूळ तयार होत असल्याने गुजरातच्या बाजारपेठेत (Gujrat Jaggery Market) ताजा गूळ जात आहे. यामुळे शीतगृहात ठेवलेल्या गुळाला मागणी कमी आहे. शीतगृहातील गुळाचा व्यवस्थापन (Jaggery Management Cost) खर्च वाढल्याने गुजरातच्या व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. गूळ हंगाम संपून दोन महिने झाले तरीही कोल्हापूरसह सांगली व कर्नाटकच्या भागातून गुळाची आवक गुजरातमध्ये होत आहे. यामुळे गुजरातमध्ये गेलेला गूळ प्राधान्याने विक्री केला जात आहे. ज्या व्यापाऱ्यांनी भर हंगामात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीत शीतगृहासाठी गूळ खरेदी केला व तो शीतगृहात ठेवला. तो गूळ तसाच पडून असल्याने त्याची विक्री कशी करायची हा प्रश्न तेथील व्यापाऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

यंदाच्या हंगामात अतिरिक्त उसाची समस्या सगळ्यांनाच डोकेदुखी ठरली. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील बहुतांशी शेतकऱ्यांनी कारखान्याबरोबरच गुऱ्हाळघरांनाही ऊस देण्यासाठी प्राधान्य दिले. साधारणत: साखर कारखान्याबरोबरच म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान गूळ हंगाम समाप्त होतो. पण यंदा चित्र उलटे दिसले. जूनचा मध्य ओलांडला तरीही अजून बहुतांश बाजारपेठांमध्ये गुळाची रोजची आवक सुरूच आहे. यामुळे हंगाम नसतानाही गुळाची खरेदी दैनंदिन स्वरूपात होत आहे. प्रत्येक वर्षी मार्चनंतर ऑक्टोबरपर्यंत गुळाचा हंगाम नसतो. यामुळे गुजरातमधील व्यापारी नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीत गूळ खरेदी करून तो मार्च ते ऑक्टोबरच्या दरम्यान शीतगृहात ठेवून त्याची विक्री करतात. यंदा मात्र गुळाची टंचाई जाणवलीच नाही. कोल्हापूरबरोबरच सांगली व कर्नाटकातील काही जिल्ह्यांमधून अव्याहतपणे गुळाचे उत्पादन अजूनही सुरू आहे. जोपर्यंत जोरदार पाऊस संततधार होणार नाही तोपर्यंत गुऱ्हाळघरे सुरूच राहतील, असा अंदाज आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागात गुऱ्हाळघरे सुरूच राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात गूळ आवक सुरूच

कोल्हापुरात अद्याप गुळाची दैनंदिन आवक सुरूच आहे. रोज गुळास क्विंटलला ३५०० ते चार हजार रुपये इतका भाव मिळत आहे. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता दोन ते तीन हजार रवयांची आवक होत आहे. गूळ हंगामाच्या तुलनेत आवक कमी असली तरी बाजार समितीत गूळ येत आहे हे विशेष. जिथे मनुष्यबळ उपलब्ध आहे तिथे गुऱ्हाळ सुरू असल्याचे चित्र आहे. ऊस उपलब्ध असल्याने कोल्हापूर परिसरातील काही गुऱ्हाळघरात भर पावसाळ्यापर्यंत गुळाचे उत्पादन सुरूच राहील, अशी शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

थेट विक्रीला व्यापाऱ्यांची पसंती

एकट्या कोल्हापूरमधूनच हंगाम नसतानाही रोज दोन ते तीन हजार गूळ रवे गुजरातच्या बाजारपेठेत जात आहेत. सांगली व कर्नाटकातील गूळ याहूनही जास्त प्रमाणात गुजरातला जात आहे. परिणामी गूळ व्यापारी शीतगृहात गूळ ठेवण्याऐवजी थेट विक्रीला पसंती देत आहेत.

समीकरण बिघडले

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजा कोल्हापुरातून ४० रुपये किलोने गूळ खरेदी केला व तो घेऊन ग्राहकाला त्याची विक्री केली तर सुमारे पंधरा रुपये व्यवस्थापन खर्च लागतो. जितके दिवस जास्त गूळ ठेवाल तितकी रक्कम वाढते. साधारणपणे हंगाम संपल्यानंतर शीतगृहातील गुळाची विक्री सुरू होते. व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार एप्रिलमध्ये गूळ हंगाम संपायला हवा होता. असे झाले असते तर मे पासून दिवाळीपर्यंत शीतगृहातील गुळाची विक्री व्यापाऱ्यांना करता आली असती. पण अजूनही गुळाची आवक सुरू असल्याने यंदा हे समीकरण बिघडले आहे. शीतगृहातील गूळ तसाच पडून राहिला आहे. जुलै व ऑगस्ट या दोनच महिन्यांमध्ये गूळ आवक कमी असेल असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. पावसाळ्याच्या या दोन महिन्यांत शीतगृहातील गूळ विकावा लागेल; अन्यथा व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

पुढील हंगामात दराबाबत अनिश्‍चितता

ज्यावेळी व्यापारी शीतगृहासाठी गूळ खरेदी करतात त्या वेळी गुळाचा दर चांगला असतो. यंदाचा अनुभव पाहता येणाऱ्या हंगामात गुळाची स्पर्धात्मक खरेदी किती होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे झाले नाही तर शिल्लक माल असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून गुळाच्या दरात घसरण केली जाऊ शकते, अशी भीती गूळ उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. दोन वर्षे बंद असलेली बाजारपेठ खुली झाल्याने यंदा गूळ विक्रीचा प्रश्न फारसा जाणवला नाही. व्यापाऱ्यांनीही गुळाची चांगली खरेदी केली. पुढील वर्षी शीतगृहसाठी जोरदार खरेदी न झाल्यास सगळ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com