पांरपरिक भातबियाण्यास मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० हेक्टरवर लागवडीची शक्यता; लाल तांदूळ बियाण्याला पसंती
पांरपरिक भातबियाण्यास मागणी
PaddyAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म असून देखील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पांरपरिक भातबियाण्यांची (Paddy Seed) मागणी आता पुन्हा वाढू लागली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ७०० किलो पांरपरिक भातबियाण्यांची विक्री (Paddy Seed Sale) झाली असून, अजून ५०० किलो भातबियाण्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. (Paddy Seed Demand) या वर्षी १०० हेक्टर क्षेत्रावर पांरपरिक भातबियाण्यांची लागवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इतर भातांपेक्षा लाल तांदूळ असलेल्या भातबियाण्यांना मोठी मागणी दिसून येत आहे.

सुधारित आणि संकरित भातबियाण्यांच्या सुकाळात पोषकता आणि औषधी गुणधर्म असलेली भातबियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती. परंतु गेल्या काही वर्षांत चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढलेले आजार, निर्माण झालेले विविध रोग आणि त्यांचे दिवसागणिक वाढत असलेले प्रमाण यामुळे पुन्हा एकदा लोकांना पांरपरिक तांदळाचे आहारातील महत्त्व पटू लागले आहे. जिल्ह्यात आणि संपूर्ण कोकणातील नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली पांरपरिक भातबियाण्यांचे संकलन, संर्वधन आणि संशोधन करण्याचे काम गेल्या दहा वर्षांत ॲग्रीकार्ट शेतकरी फार्मर कंपनी, बाएफ आणि बियाण्यांचे अभ्यासक प्रमोद जाधव यांच्यासह असंख्य शेतकरी मित्रांनी रात्रंदिवस केले आहे. त्यातूनच कुडाळ येथे पांरपरिक भातबियाण्यांची सीड बँक तयार करण्यात आली आहे.

पांरपरिक ४६ भातबियाणी संकलित करण्यात आली होती. त्यापैकी कोकणातील हवामानास अनुकूल अशी बियाणे सध्या सीड बँकेत विक्रीस ठेवण्यात आली आहेत. यामध्ये लाल, काळा आणि सफेद अशी बियाणी आहेत. काळा भात प्रतिकिलो ४०० रुपये, लाल भात प्रतिकिलो १०० रुपये आणि सफेद भात प्रतिकिलो ५० रुपयेप्रमाणे विक्री सुरू आहे. वालय, घाटी पंकज, मोगरा, लाल वरगंळ, सोनफळ या पांरपरिक भातबियाण्यांची आतापर्यंत सातशे किलो विक्री झाली आहे.अजून पाचशे ते सहाशे किलो बियाण्यांची विक्री होईल, अशी अपेक्षा आहे. या वर्षी साधारणपणे १०० हेक्टर क्षेत्र पांरपरिक भातबियाणे लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. लाल तांदूळ असलेल्या भाताला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी मिळत आहे.

लागवड पद्धतीत बदलाची गरज

परिपक्व झाल्यानंतर पांरपरिक भातबियाणे कोसळतात हे वास्तव आहे. परंतु सिलीकॉनयुक्त भाताचे तूस, बांबूचा पाला, उसाचे चिपाड यापैकी काहीही जमिनीत वापरल्यास भात कोसळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक लागवड पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

पांरपरिक भातबियाण्यांवर आम्ही गेली काही वर्ष काम करीत आहोत. निवड पद्धतीने संकलन केलेल्या भातबियाण्यांची आता सीड बँक तयार झाली असून, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना ही बियाणे हवी आहेत त्यांनी सीड बँकेतून घ्यावीत किंवा संपर्क साधल्यास आम्ही त्यांना पाठवून देण्याची व्यवस्था करू.
सचिन चोरगे, संचालक, ॲग्रीकार्ट कंपनी, कुडाळ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com