खाद्यतेलाचे दर खरंच १५ रुपयाने घटले?

रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफुल तेलाचा ठप्प झालेला पुरवठा आणि घटलेले पामतेल उत्पादन, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दराला फोडणी मिळाली. याचा परिणाम देशातील खाद्यतेल दरावर झाला. खाद्यतेलाचे दर जवळपास ७० ते ९० टक्क्यांनी वाढले.
Edible Oil
Edible OilAgrowon

पुणेः महागाईची (Inflation) झळ सोसणाऱ्या ग्राहकांना खाद्यतेल दरात (Edible Oil Rate) दिलासा मिळल्याचा दावा केंद्राने केला. देशातील महत्वाच्या तेल विक्री ब्रॅंड्सनी तेलाचे दर लिटरमागे १० ते १५ रुपयाने कमी केले. त्यामुळे सोयातेल (soya Oil), सुर्यफूल (Sunflower Oil), पाम आणि वनस्पती तेलाचे दर (Vegetable Oil Rate) गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचा दावा केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केला. परंतु प्रत्यक्ष बाजारात खाद्यतेलाचे दर (Edible Oil Prices) या प्रमाणात कमी झाले नाही, हे मंत्रालयाच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होते.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफुल तेलाचा ठप्प झालेला पुरवठा आणि घटलेले पामतेल उत्पादन, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दराला फोडणी मिळाली. याचा परिणाम देशातील खाद्यतेल दरावर झाला. खाद्यतेलाचे दर जवळपास ७० ते ९० टक्क्यांनी वाढले. सरकारने मागील वर्षभर दर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातच दर चढे असल्यामुळे भारत सरकारला यश आले नाही. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलासह इतर खाद्यतेलाच्या दरातील तेजीला ब्रेक बसतोय. पामतेलाचे दर ७ हजारावरून ५ हजार रिंगीटपेक्षाही कमी झाले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. त्यासोबत केंद्राने आयात शुल्कात केलेली मोठी कपात, शुल्करहित आयातीला परवानगी, साठा मर्यादा, साठ्याच्या नोंदी हे उपाय केल्याने देशातील महत्वाच्या ब्रॅंड्सनी खाद्यतेलाचे दर १० ते १५ रुपयांनी कमी केल्याचा दावा केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केला.

Edible Oil
खाद्यतेल महागाईचा चढता आलेख

मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले की, देशात वनस्पती तेल, सोयाबीन तेल, सूर्यफुल तेल आणि रिफाईंड पामतेलाचे घाऊस आणि किरकोळ दर मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाले. खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. पुढील काळात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव शुधांशू पांडे यांनी सांगितले. पांडे यांच्या मते देशातील सर्व महत्वाच्या तेल विक्री ब्रॅंड्सनी १० ते १५ रुपयांनी दर कमी केले. विभागाने तेल वितरण साखळीतील सर्व पातळ्यांवर योग देखरेख आणि नियोजन केल्याने हे शक्य झाल्याचा दावा पांडे यांनी केला.

Edible Oil
इंडोनेशियाचा खाद्यतेल बॉम्बः भारताला धडा

अदानी विलमारच्या फाॅर्च्यून ब्रॅंडने रिफाईंड सूर्यफूल तेलाचा दर लिटरमागे १० रुपयांनी केमी केला. एमआरपी २२० रुपयांवरून २१० रुपये केला. तसेच सोयाबीनची एमआरपी २०५ रुपयांवरून १९५ रुपयांवर आणल्याचा दावा केला जात आहे. यासोबत आणखी काही ब्रॅड्सनी दर कमी केल्याचे पांडे यांनी म्हटले. सरकारने आयात शुल्कात केलेली मोठी कपात, शुल्करहित आयातीला परवानगी, साठा मर्यादा, साठ्याच्या नोंदी हे उपाय केल्याने खाद्यतेलाचे दर घटल्याचा दावा पांडे यांनी केला.

देशातील महत्वाच्या ब्रॅंड्सनी खाद्यतेलाचे दर १० ते १५ रुपयांनी कमी केल्याचा दावा केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केला. मात्र याच मंत्रालयाच्या किरकोळ विक्री दरावरून हा दावा खरा नसल्याचे स्पष्ट होते. कारण देशातील सरासरी विक्री दरात १० ते १५ रुपयांनी घट झालेली नाही, हे याच खात्याच्या माहितीवरून स्पष्ट होते.

प्रत्यक्ष बाजारातील स्थिती

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार १६ जूनला वनस्पती तेल १६५.३१ रुपये प्रतिलिटरने किरकोळ बाजारात विकले जात होते. या तेलाचा दर २३ जूनला १६५ रुपये होता. म्हणजेच दरात केवळ ३१ पैशांची घट झाली. सोयातेलाचा भाव या आठवडाभरात केवळ १.७१ रुपयाने कमी होऊन १६६.८६ रुपयांवर आले. तर सूर्यफुल तेलाचेही दर केवळ १.७८ रुपयाने नरमले, आणि १८९.४६ रुपये प्रतिलिटरवल पोचले. पामतेलाच्या दरातही केवळ ३.५ रुपयांची घट झाली. आजही पामतेल १५.९२ रुपये प्रतिलिटरने किरकोळ बाजारात मिळत आहे.

केंद्राचा दावा खरा आहे का?

देशातील महत्वाच्या खाद्यतेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी लिटरमागे १० ते १५ रुपयाने दर कमी केल्याचे सरकार सांगत आहे, मात्र प्रत्यक्ष बाजारात खाद्यतेल दर ऐवढे कमी झालेले दिसत नाही. केवळ पामतेलाचे दर मागील आठवड्यात साडेतीन रुपयांनी कमी झाले. सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाचे दर दोन रुपयांनीही घटले नाहीत. तर वनस्पती तेल केवळ ३१ पेशांनी स्वस्त झाले. म्हणजेच सरकारचा दावा फोल ठरतोय. मागील आठवडाभरात किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरात नगण्य घट झाली.

आठवडाभरात खाद्यतेल दरातील घट

वनस्पती तेल…३१ पैसे

सोयातेल…१.७१ रुपये

सूर्यफुल तेल…१.७८ रुपये

पामतेल…३.५ रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com