वाघिणी नसल्यामुळे बंदरांमध्ये खते पडून

वाहतुकीत अडथळे; ऐन खरिपात खत टंचाईची भीती
वाघिणी नसल्यामुळे बंदरांमध्ये खते पडून
FertilizerAgrowon

पुणे ः आयात केलेली रासायनिक खते (Chemical Fertilizer ) देशातील विविध बंदरांमध्येच (Fertilizer On Port) पडून आहेत. रेल्वे वाघिणींची टंचाई (Wagon Shortage) भासत असल्यामुळे खतांच्या वाहतुकीत (Fertilizer Transport) अडथळे येत आहे. त्यामुळे ऐन खरिपात खत टंचाईला (Fertilizer Shortage) सामोरे जावे लागेल, अशी भीती कृषी उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

देशातील वीज टंचाईमुळे रेल्वेने गेल्या महिन्यात सर्वाधिक वाघिणी कोळशासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. रेल्वेच्या ताब्यातील १.३१ लाखपैकी १.१३ लाख उघड्या वाघिणी केवळ कोळसा वाहतुकीसाठी जुंपण्यात आल्या. लोहमार्गांवरही कोळसा वाघिणींना महत्त्व दिले गेले. खत वाहतुकीसाठी उघड्या वाघिणी वापरता येत नाहीत. मात्र, बंदिस्त वाघिणींची टंचाई व त्यात पुन्हा लोहमार्ग उपलब्ध होत नसल्याने खतांची वाहतूक विस्कळित झाली आहे, असा दावा सूत्रांनी केला.

रेल्वेकडे सध्या एकूण ३.८२ लाख वाघिणी आहेत. मात्र, कोळसा वाहतुकीला प्राधान्य, नादुरुस्त वाघिणींची संख्या जास्त असल्याने खताची वाहतूक दुय्यम स्थानावर गेली आहे.
राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे यांनी सांगितले की, “खत वाहतुकीसाठी पुरेशा वाघिणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. हा मुद्दा केंद्रीय खत नियोजनाच्या बैठकांमध्ये राज्य शासनाकडून वारंवार उपस्थित केला गेला आहे. या समस्येबाबत पत्रव्यवहारदेखील झालेला आहे. वाघिणींचे नियोजन न झाल्यास काही भागात विलंबाने खत पुरवठा होण्याची शक्यता तयार होईल. मात्र, आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”

गेल्या खरिपात राज्यातील शेतकऱ्यांनी ४३.५२ लाख टन खताची खरेदी केली होती. यंदाच्या खरिपात ही मागणी ४५ लाख टनापर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. “केंद्राने यंदा राज्यासाठी ४५.२० लाख टन साठा मंजूर केला आहे. आधीचा १२.१५ लाख टनाचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे खरिपासाठी एकूण ५७.३५ लाख टन खते उपलब्ध असतील,” असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात येणारा साठा गुजरातमध्ये अडकला
निविष्ठा उद्योगातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “ मॉन्सून सध्या लांबलेला आहे. मात्र, तो सर्व दूर पसरताच खतांच्या मागणीत एकदम वाढ होईल. त्यावेळी वाघिणींसाठी धावाधाव करावी लागेल. या बाबत आम्ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाकडे माहिती कळवली आहे. विशेषतः महाराष्ट्रासाठी डीएपीचा पुरवठा सर्वाधिक गुजरातच्या चार बंदरांमधून होतो. तेथे सध्या डीएपीच्या लाखो गोण्या पडून आहेत.”

“देशाच्या विविध बंदरांमध्ये रासायनिक खते भरपूर प्रमाणात आयात झाली आहेत. मात्र, बंदरांमधून विविध जिल्ह्यांमध्ये वाहून नेण्यासाठी रेल्वे वाघिणींची मोठी टंचाई जाणवते आहे. या समस्येवर वेळेत व समन्वयपूर्वक तोडगा काढावा लागेल. आम्ही ही बाब केंद्रीय खते तसेच रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.”
मनमोहन कलंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com