वाशीतून सव्वा सातशे टन हापूस निर्यात

हंगाम अंतिम टप्प्यात; विमान वाहतूक भाडेवाढीमुळे १५ टक्के घट
वाशीतून सव्वा सातशे टन हापूस निर्यात
MangoAgrowon

रत्नागिरी ः विमान वाहतुकीच्या (Air Freight) भाडेवाढीमुळे हापूसच्या निर्यातीला (Hapus Export) मोठा फटका बसला असून नवीन निर्यातदारांचे एक पाऊल मागेच राहीले आहे. परिणामी १५ टक्के निर्यात यंदा कमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाशी (ता. नवी मुंबई) येथील पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रातून आतापर्यंत सव्वा सातशे टन आंबा अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियासह युरोपमधील विविध देशामध्ये निर्यात (Export Of Mango) करण्यात आला आहे.

अवकाळी वातावरणामुळे यंदाचा हापूस हंगाम आरंभापासूनच अडचणीत आहे. शेवटच्या टप्प्यातही पावसाने पाणी फेरले. तुलनेत यंदा निर्यातीला लवकर आरंभ झाला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्यातीत अडथळे आले होते. सर्वाधिक मागणी असलेल्या अमेरिकेमध्येही निर्यात होऊ शकली नव्हती. यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतील निरीक्षकांनी वाशी पॅकहाऊसची पाहणी करून निर्यातीला हिरवा कंदील दिला. त्यानंतर काही दिवसांतच पहिली कन्साईनमेंट पाठविण्यात आली. रत्नागिरीतून थेट निर्यात करण्यासाठी आवश्यक केंद्र आहे; परंतु विमान वाहतुकीसाठी मुंबईत आंबा पाठवावा लागतो. तसेच निर्यातदारही मुंबईतील वाशी बाजारातूनच आंबा पाठवतात. निर्यातीसाठी आवश्यक आकाराचा आंबा एकाच बागायतदाराकडे मिळत नाही. पण वाशीतील व्यापाऱ्याकडे पुरेसा माल मिळतो. त्याचा फायदा निर्यात करणाऱ्यांना होतो. अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, इंग्लंड, जपान या देशांना आंबा निर्यात केला जातो. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, कर्नाटकी यासह अन्य प्रकारचे आंबा वाशी केंद्रातून निर्यात केले जातात. आतापर्यंत सुमारे सव्वा सातशे टन आंबा पाठविण्यात आला आहे. त्यातील सर्वाधिक आंबा इंग्लंडला ३०० टन इतका गेला आहे. त्या खालोखाल अमेरिकेचा क्रमांक लागतो.

Mango
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा आंबा पिकाला फटका

वाशीतील विकीरण प्रक्रियेचा वापर करून अमेरिकेत २९३ टन, ऑस्ट्रेलियात २० टन आंबा गेला. उष्णजल प्रक्रियेत तीन मिनिटे प्रक्रिया करून इंग्लंडला ३०० टन तर ४८ अंश सेल्सिअसला ६० मिनिटांची प्रक्रिया करून ६० टन युरोपला गेला. व्हेपरी ट्रीटमेंट केला २० टन आंबा जपान, दक्षिण कोरियाला पाठविण्यात आला आहे. इंग्लंडला आंबा पाठविण्यासाठी पूर्वी उष्णजल किंवा बाष्पजल प्रक्रिया वापरली होती. ती प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे आंबा पाठवणे सोपे झाले आहे. फायटो सर्टिफिकेटचा वापर करून निर्यात करता येत आहे.

यंदा निसर्गाबरोबरच वाढत्या विमान वाहतुकीच्या दराचा परिणाम निर्यातीवर झाला. रशिया-युक्रेन युद्धाबरोबरच वाढलेल्या इंधन दराचा फटका बसला आहे. किलोला २२० रुपये भाडे आकारले जात होते. यंदा हाच दर ५५० रुपये आकारला गेला. त्यामुळे मोठा निर्यातदारच या पद्धतीने विक्री करू शकला. छोटे निर्यातदार किंवा नव्याने व्यावसायात पदार्पण करणाऱ्यांना तेवढा फायदा होऊ शकलेला नाही. त्यामुळे निर्यातीत घट झाली आहे.

वाशी केंद्रातून हापूससह विविध प्रकारच्या आंब्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
भास्कर पाटील, पणन मंडळ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com