हरभरा खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त

नोंदणी करूनही एक हजार ७८१ शेतकरी प्रतीक्षेत
Chana Market
Chana MarketAgrowon

धामणगाव रेल्वे, जि. अमरावती : बाजार समिती परिसरातील ‘नाफेड’च्या (NAFED) (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) खरेदी केंद्रावर (Chana Procurement Center) हरभरा खरेदी अचानक थांबवण्यात आली. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. खुल्या बाजारात नाइलाजाने मातीमोल भावात चणा (Chana Market) विकून व्यापारी वर्गाचा फायदा करण्यासाठी पोर्टल बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आधारभूत खरेदीसाठी एकूण ४ हजार ९ शेतकऱ्यांनी नोंदणी मेपर्यंत केली होती. त्यापैकी २ हजार २२८ शेतकऱ्यांचा चणा खरेदी करण्यात आला. यात ५१ हजार १९ क्विंटल ८० किलो चणा खरेदी केला. आता खरीप हंगाम तोंडावर असताना नोंदणी करूनही १ हजार ७८१ शेतकऱ्यांचा चणा विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.

२४ मे च्या सकाळी १० वाजता विदर्भ को.ऑप मार्केटिंग फेडरेशन यांनी हरभरा खरेदी बंद ठेवण्यात यावी ही माहिती दिली. दरम्यान चणा खरेदी अचानक थांबल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चेतन परडके, कपिल पडधान, काँग्रेस मुकेश राठी व शेतकरी तहसील कार्यालयावर गेले असता नायब तहसीलदार जगदीश मंडपे यांनी सुद्धा मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोर्टल बंद असताना चणा खरेदी केल्यास मोबदला मिळणार का? या प्रश्नावर महसूल व विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले होते.

कोणत्याही प्रकारची पूर्वसूचणा न देता शासकीय खरेदी बंद केल्याने यार्डवर असलेला शेतकऱ्यांचा माल शासकीय बारदाण्यात भरून ठेवला आहे. मात्र शासकीय खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद आहे.
मारोती बोकडे,व्यवस्थापक, दत्तापुर ख.वि.से.संस्था
खुल्या बाजारात चणा विकला जावा व व्यापाऱ्यांचे भले व्हावे या हेतूने शेतकऱ्यांच्या विरोधात षडयंत्र केले जात आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा चणा खरेदी केला नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
चेतन परडखे, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या चण्याला खुल्या बाजारात भाव नाही. केंद्र सरकारच्या ‘नाफेड’ने शेतकऱ्यांची थट्टा करणे लावले आहे. आत्ता बोलवलेला माल आणणे, परत नेणे, किंवा तिथेच भरून ठेवणे याचे भाडे कोण भरेल हा प्रश्न आहे.
मुकेश राठी, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com