हरभरा खरेदी
हरभरा खरेदीAgrowon

हरभरा उत्पादकांचा जीव टांगणीला

अनेक केंद्रांवर खरेदीसाठी वाहनांच्या रांगा

औरंगाबाद : उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत दिलेल्या मुदतीपूर्वी अचानक किमान आधारभूत दराने हरभरा (Chana MSP) खरेदी बंद झाली.एकीकडे बाजारात हमीदरापेक्षा कमी दर (Chana Rate) मिळत असल्याने होणाऱ्या परवडीमुळे जीव टांगणीला लागलेल्या मराठवाड्यातील हरभरा उत्पादकांना (Chana Farmer) पुन्हा एकदा हरभरा खरेदी (Chana Procurement) सुरू होण्याची प्रतीक्षा लागली.

राज्यात किमान पाच हजार २३० रुपये प्रतिक्विंटल या किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू होती. २३ मे रोजी दुपारी अचानक उद्दिष्टपूर्ती झाल्याचे कारण पुढे करत पोर्टलवर ऑनलाइन खरेदीची नोंदणी बंद झाली. त्यामुळे काही केंद्रांवर खरेदी केलेल्या मात्र पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी न केलेल्या हरभऱ्यासह ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविले, परंतु त्यांची खरेदी बाकी होती अशा हजारो शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला किमान आधारभूत दर मिळण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बाजारात किमान आधारभूत दरापेक्षा अत्यंत कमी दर मिळत असल्याने शासन ही परवड थांबविण्यासाठी तत्पर पुढाकार घेईल का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

चार जिल्ह्यांत सहा लाख ३६ हजार क्विंटल खरेदी

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांत ४५ हजार २७३ शेतकऱ्यांकडील सहा लाख ३६ हजार ४ क्विंटल हरभऱ्याची किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आली. या चारही जिल्ह्यांत ५४ हजार १९९ शेतकऱ्यांनी आपला हरभरा आधारभूत दराने खरेदी केला जावा म्हणून ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ५२ हजार ४८ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले होते. तर जवळपास २ हजार १५१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविणे बाकी होते. या शेतकऱ्यांसह जवळपास ७ हजारांवर शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...अन्यथा दोन दिवसांत तीव्र आंदोलन

जालना : तत्काळ ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन झाले आहे. त्यांचे हरभरा खरेदी केंद्र सुरू करून संपूर्ण हरभरा घ्यावा. अन्यथा, दोन दिवसांत शेतकरी संघटना तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी संघटना उपाध्यक्ष दत्तात्रेय कदम, जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे, तालुका अध्यक्ष अशोक आटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आयडियल ॲग्रीटेक प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड सावरगाव येथील खरेदी केंद्र १२५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी ८०२ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाला आहे. ४५४ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी बाकी आहे.
भगवानराव डोंगरे, आयडियल ॲग्रीटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सावरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com