हरभऱ्याला निर्यात अनुदान द्या

देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. सध्या बाजारात हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे.
हरभऱ्याला निर्यात अनुदान द्या
Chana Export SubsidyAgrowon

पुणे ः देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन (Record Chana Production) झाले. सध्या बाजारात हमीभावापेक्षा (Chana MSP) एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान (Chana Export Subsidy) देऊन हरभरा निर्यातीला (Chana Export) प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी केली. तसेच यामुळे बाजारात दर वाढतील आणि शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असाही दावाही केला; मात्र यातून शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचाच फायदा होईल, असे जाणकारांनी सांगितले.

चालू हंगामात सरकारने कडधान्य आयातीला पाडघड्या घातल्या. त्यामुळे कडधान्याचे दर दबावात आले. त्यातही तूर आणि हरभरा दरात मोठी मंदी आली. देशातील एकूण कडधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के क्षेत्र एकट्या हरभरा पिकाखाली आहे. तर एकूण कडधान्य उत्पादनात हरभऱ्याचा वाटा ५० टक्क्यांवर येतो. बाजारभाव हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी आहेत. केंद्राने यंदा देशात १ लाख ३९ हजार टन हरभरा उत्पादन झाल्याचा अंदाज जाहीर केला; मात्र त्यापैकी ‘नाफेड’ने २३ लाख टनांचीच हमीभावाने खेरदी केली. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या केवळ १६.४८ टक्के मालाची खरेदी सरकारने केली. उर्वरित ११६ लाख टन हरभरा शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागणार आहे. सध्या हरभाऱ्याला सरासरी ४ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. तर हमीभाव ५ हजार २३० रुपये आहे. अशा परिस्थितीत हरभरा निर्यात करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने हरभरा निर्यातीसाठी १० टक्के निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी कडधान्य व्यापारी आणि निर्यातदारांनी केली.

सरकारने ७ टक्के असलेले निर्यात अनुदान दोन वर्षांपूर्वी बंद केले होते. ते पुन्हा सुरू करण्याची मागणी पुढे रेटली जात आहे. सरकारने निर्यात अनुदान दिल्यास बाजारात हरभरा भाव वाढतील. इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले की, सरकारने हरभऱ्यासाठी अनुदान दिल्यास देशातून निर्यात वाढेल. जास्तीत जास्त हरभरा बाहेरच्या देशात गेल्यावर स्थानिक बाजारात दर वाढतील. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. या आशयाची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. आम्ही आता सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. सरकारने आतापर्यंत २६ लाख टनांची खरेदी केली. तरीही देशात हरभऱ्याचा मोठा साठा शिल्लक आहे. त्यातच सध्या खरिपाची पेरणी सध्या सुरू आहे. हवामान विभागाने यंदा चांगल्या मॉन्सूनची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे खरिपातही कडधान्य उत्पादन वाढेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हरभरा निर्यातवाढीला प्रोत्साहन द्यावे.

शेतकऱ्यांना फायदा मिळेल?

हरभऱ्याला निर्यात अनुदान दिल्यानंतर निर्यात वाढेल. त्यामुळे बाजारात दर वाढतील आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. खुल्या बाजारातही शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल, असे व्यापारी आणि निर्यातदारांचे म्हणणे आहे. परंतु बाजारातील जाणकारांच्या मते बहुतेक शेतकऱ्यांनी आता हरभरा विकला आहे. अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारात भाव वाढले तरी फायदा व्यापाऱ्यांचाच होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com