गुजरात, मध्य प्रदेशातील कापूस बियाण्याची घुसखोरी

कृषी यंत्रणांना याचा मागमूसही नाही; अवैधपणे विक्री
गुजरात, मध्य प्रदेशातील कापूस बियाण्याची घुसखोरी
cottonagrowon

अकोला ः राज्यात बोंड अळीला (Ballworm) पायबंद घालण्यासाठी सरकारकडून विशिष्ट कालावधीपर्यंत कपाशीच्या बीटी बियाणे (BT Seed) विक्रीला बंदी घातली आहे. मात्र त्यामुळे परराज्यातील बियाणे उत्पादक (Seed Producer) याचा फायदा घेत आहेत. अवैधपणे राज्यात असे बियाणे एजन्टांमार्फत गावोगावी विक्री केले जात आहे. कृषी यंत्रणांना याचा मागमूसही लागलेला नाही. यंदाच्या हंगामातही मोठ्या प्रमाणात गुजरात, मध्य प्रदेशातून बीटी कापूस बियाणे आयात झाल्याचे बोलले जात आहे.

काही जणांनी गुजरातमधून ‘फाइव्ह जी’ लिहिलेले बीटी बियाणे मार्केटमध्ये आणले आहे. या बियाण्याच्या व्यवहारात कुठल्याही प्रकारचे बिल शेतकऱ्याला दिले जात नाही. कापूस पट्ट्यात हे बियाणे सर्रास विक्री होत आहे. प्रामुख्याने अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत सिंचनावर कापूस लागवड होणाऱ्या पट्ट्यात हे बियाणे विक्री झाले आहे. मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड वर्षानुवर्षे या जिल्ह्यांमध्ये केली जाते. सिंचनासाठी पाणी कमी पडत असल्याने याचे प्रमाण सध्या कमी झाले तरी लागवड होतच आहे. काही जणांनी तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पेरणीची तयारी केली होती. एक जूनपासून सर्वत्र लागवड सुरू झाली.

राज्यात एक जूनपर्यंत कपाशीचे बियाणे विक्रीवर बंदी असल्याचा फायदा गुजरात, मध्य प्रदेशातील बीटी बियाणे उत्पादकांनी उचलला. हजारो पाकिटे गावोगावी एजन्टांच्या माध्यमातून पोहोचविण्यात आली. उपलब्ध झालेल्या एका पाकिटावर तर थेट ‘५ जी’ असा उल्लेख केलेला आहे. हे बियाणे केवळ ट्रायलसाठी असेही त्यावर लिहिले आहे. एकीकडे बीटी ‘बीजी २’ असे बियाणे उपलब्ध असताना हे आता ‘५ जी’ बियाणे कोठून आले. चाचण्या घेण्याचा वैज्ञानिक आधार काय, या बाबत संभ्रम तयार होत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता

हे बियाणे अवैधमार्गाने आल्याने त्याच्या खरेदीची कुठलीही पावती शेतकऱ्याला दिली जात नाही. यंदाच्या हंगामात तर काही बियाणे हे तणनाशकाला पूरक ठरणारे असल्याचेही सांगत विक्री होत आहे. भविष्यात या बियाण्याबाबत काही अडचण निर्माण झालीच तर शेतकऱ्यांजवळ कुठलेही बिल, पक्की पावती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे राज्यातील ‘बीजी २’ बियाणे ७५० रुपयांपर्यंत उपलब्ध असताना हे अवैध मार्गाने पोहोचलेले बियाण्याचे पाकीट १२०० ते १५०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com