Sugarcane : उसतोडणीतील पाचट वजावटीचा मुद्दा ऐरणीवर

राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाची यंत्रांमार्फत (हार्वेस्टर) तोडणी करताना पाचटाचे वजन दीड टक्क्यांपेक्षा जास्त आकारू नये, अशी एकमुखी मागणी साखर आयुक्तालयातील चर्चेत शेतकरी प्रतिनिधींनी केली.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाची यंत्रांमार्फत (Sugarcane Harvester) (हार्वेस्टर) तोडणी करताना पाचटाचे (Sugarcane Residue) वजन दीड टक्क्यांपेक्षा जास्त आकारू नये, अशी एकमुखी मागणी साखर आयुक्तालयातील चर्चेत शेतकरी प्रतिनिधींनी केली.

ऊस पाचट आकारणीच्या मुद्यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांच्या दालनात अभ्यासपूर्ण चर्चा झाली. धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बी.जी.पाटील, राकेश जगतळे, दीपक पाटील, मलगोंडा चौगुले, शीतल कांबळे या शेतकरी प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला. हार्वेस्टरमुळे ऊसतोड केल्यास पाचट नेमके किती येते, या बाबत राज्यभर सुरू असलेला संभ्रम अद्याप मिटलेला नाही. सध्या विविध कारखाने आपापल्या हिशेबाप्रमाणे शेतकऱ्यांकडून शून्य ते आठ टक्क्यांपर्यंत पाचट वजावट घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या समस्येचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालात पाचटाचे वजन आठ ते बारा टक्क्यांपर्यंत नमुद केले असल्याने शेतकरी प्रतिनिधी चिंतेत आहेत.

Sugarcane Harvesting
Sugarcane : ऊस शेती प्रशिक्षणाला ५ जुलैपासून सुरवात

‘‘हार्वेस्टरतोडीमुळे नेमके काय तोटे होत आहेत, हेदेखील शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. “हार्वेस्टर तोडीमुळे कारखान्यांचे नव्हे तर शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. पाचटामुळे कारखान्यांचे काहीही नुकसान होत नाही. मुळात, कारखाने उताऱ्यानुसार उसाला दर देतात. उसातून पाचट आले तर उतारा घटतो. उतारा घटल्यास शेतकऱ्यांना दर कमी लागतात. त्यामुळे पाचटाच्या नावाखाली कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून पाच ते आठ टक्क्यांपर्यंत वजावट लावणे ही लूट आहे,” असा मुद्दा चुडमुंगे यांनी मांडला.

‘‘केंद्र शासनाच्या अखत्यारित कार्यरत हरियाना येथील संस्थेनेही यंत्रतोडीमुळे अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत वजावट येत असल्याचे यापूर्वीच साखर संघाला कळविले होते. वजावट जास्तीत तीन टक्के गृहीत धरावी. पाचट जास्त निघणे ही शेतकऱ्यांची नव्हे तर हार्वेस्टरचालकाची चूक असते. त्यामुळे अर्धा खर्च कारखान्यांवर टाकावा. म्हणजेच शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त दीड टक्के वजावट घ्यावी,’’ असेही शेतकऱ्यांनी सुचविले. आयुक्तांनी शेतकऱ्यांचे सर्व मुद्दे आस्थेने समजावून घेतले.

हार्वेस्टरतोडीमुळे होणारे तोटे ः

- उसाचे अनेक कंडके होतात. त्यामुळे वजनात पाच टक्क्यांपर्यंत घट येते.

- फडात कांड्या पडतात. वेचण्यासाठी एकरी पाच हजारांपर्यंत खर्च येतो.

- अवजड यंत्र फिरल्याने शेतातील माती घट्ट होते. त्यामुळे मशागतीचा खर्च वाढतो.

- खोडवा फुटण्यात अडचण येते. खोडव्याचे उत्पादन घटते.

पाचट वजावट मुद्द्यावर अभ्यासाअंती शेतकरी हिताचा निर्णय घेतली जाईल.
शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com