साडेपाच हजार शेतकरी हरभरा विक्रीसाठी प्रतीक्षेत

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील स्थिती; केंद्रावर वाहनांच्या रांगा
साडेपाच हजार शेतकरी हरभरा विक्रीसाठी प्रतीक्षेत
Chana ProcurementAgrowon

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ‘नाफेड’च्या (NAFED) (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) १७ खरेदी केंद्रावरून एसएमएस पाठविलेल्या ५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी (Chana Procurement) बाकी आहे.अजून १ हजार ५७३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्याचे राहिले आहे. (Chana Market)

हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत ‘नाफेड’मार्फत सुरू असलेली हरभरा खरेदी सोमवारी (ता. २३) पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. केंद्रांवर मोजमापासाठी हरभरा घेऊन आलेल्या शेकडो वाहने अडकून पडली आहेत. शेतकऱ्यांना मुक्कामी वाहन भाड्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणच्या केंद्रावर सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे तत्काळ खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १७ केंद्रांवर नाफेडच्या वतीने राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे हमीभावाने सोमवार (ता. २४) पर्यंत १७ हजार २९९ शेतकऱ्यांचा २ लाख ३४ हजार ५७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदीसाठी रविवार (ता. २९) पर्यंतची मुदत होती. परंतु सोमवारी (ता. २४) पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्याची लॉट एन्ट्री करता येत नसल्याने खरेदी थांबविली.

परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांवर १३ हजार ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ११ हजार ९५९ शेतकऱ्यांना केंद्रावर हरभरा विक्रीस आणण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले. सर्व केंद्रांवर ८ हजार ६४ शेतकऱ्यांनी ९७ हजार २७५ क्विंटल हरभरऱ्याची विक्री केली. एसएमएस पाठविलेल्यांपैकी ३ हजार ८९५ शेतकऱ्यांनी खरेदी बाकी. त्यापैकी काही शेतकऱ्यांची वाहने केंद्रावरील रांगेत आहेत. अजून १ हजार ३८० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे बाकी आहे. विदर्भ पणन महासंघाच्या गंगाखेड येथील केंद्रावर १ हजार ३८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सर्वांना एसएमएस पाठविण्यात आले. १ हजार २६६ शेतकऱ्यांच्या १४ हजार ३२१ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली. अजून ११५ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी बाकी आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव नाका, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या आठ केंद्रांवर ९ हजार ६९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ९ हजार ५०३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. ७ हजार ९६९ शेतकऱ्यांचा १ लाख २२ हजार ९७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अजून १ हजार ५३४ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी राहिली आहे. १९३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे बाकी आहे.

पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदीच्या नोंदी होत नाहीत. उद्दिष्ट वाढविण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर एसएमस पाठविलेल्या शिल्लक शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला जाईल.
के. जे. शेवाळे, जिल्हा विपणन अधिकारी, परभणी
परभणीचे खरेदी केंद्र १५ किलोमीटरवरील पेडगाव गावाजवळ आहे. तेथे शेतकऱ्यांसाठी पाण्याची, राहण्याची व्यवस्था नाही. वाहनासाठी सुरक्षितता नाही. चोरी जाण्याची भीती आहे. चार दिवसांपासून वाहने उभी आहेत. वाहन भाडे तसेच मुक्कामाचे वाहन भाडे असे दुहेरी भुर्दंड बसत आहे. तत्काळ हरभरा खरेदी सुरू करावी.
ज्ञानदेव बोबडे, बोबडे टाकळी, ता. परभणी
खरेदी बंदची पूर्वसूचना दिली असती तर वाहन भाडे लागले नसते. मोजमाप सुरू होईपर्यंत ताटकळत थांबावे लागणार असल्याने खर्च वाढणार आहे.
ज्ञानेश्‍वर सिद्धनाथ, कोथाळा, ता. मानवत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com