द्राक्षाच्या गुणवत्तेवर हवे सर्वाधिक लक्ष

‘एनआरसी’ पुणे येथे आयोजित चर्चासत्रातील सूर
द्राक्षाच्या गुणवत्तेवर हवे सर्वाधिक लक्ष
GrapeAgrowon

पुणे ः एकरी उत्पादनवाढीपेक्षा द्राक्षाची गुणवत्ता (Grape Quality) सर्वोत्तम कशी ठेवता येईल, या दृष्टीने बागायतदारांनी (Grape Farmer) व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात (National Grape Research Institute) गुरूवारी (ता. ९) झालेल्या चर्चासत्रात व्यक्त झाली. द्राक्षाला देशांतर्गत बाजारपेठच प्रचंड मोठी आहे. निर्यातीपेक्षा गुणवत्तापूर्ण ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षे (Residue Free Grape) भारताच्या कानाकोपऱ्यात कशी पोचवता येतील व ग्राहकांच्या पसंतीनुसार नव्या वाणांची लागवड कशी वाढवता येईल, त्यासाठी द्राक्ष उद्योगातील सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असा सूरही या वेळी व्यक्त झाला.

पुणे- मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात (एनआरसी) गुरूवारी (ता. ९) द्राक्षांची गुणवत्ता व विपणन व्यवस्था या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी ‘एनआरसी’ तील शास्त्रज्ञ, राज्यातील बागायतदार व निर्यातदार संघाचे आजी-माजी प्रतिनिधी, प्रयोगशील व प्रगतिशील बागायतदार, निर्यातदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना ‘एनआरसी’ चे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर म्हणाले, ‘‘द्राक्षशेतीत निविष्ठांचा वापर वाढला आहे. ‘लेबल क्लेम’ असलेल्या रसायनांव्यतिरिक्तही अन्य घटकांचा वापर होत आहे. बागेत माल तयार होण्यास काही अवधी असतो. त्याचवेळी अवकाळी पाऊस आल्यास तो माल नाईलाजाने व्यापाऱ्याला द्यावा लागतो. अशा विविध समस्यांमुळे द्राक्षाची गुणवत्ता घटण्याचा धोका जाणवत आहे. सर्व अनुषंगाने द्राक्षाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही संशोधन प्रकल्प हाती घेतले आहेत. द्राक्ष छाटणीच्या वेळा, वाढीच्या विविध अवस्थांमध्ये आवश्‍यक सूर्यप्रकाश वा तापमान आदींचा अभ्यास सुरू आहे. रसायन अवशेष विरहित द्राक्ष उत्पादनाचे प्रकल्प विविध विभागात सुरू केले आहेत.’’

फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते म्हणाले, ‘‘द्राक्षाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेबिनार तसेच अन्य कार्यक्रमांद्वारे प्रशिक्षित करण्यात येत आहे. द्राक्षबागांवर संरक्षित प्लॅस्टिक आच्छादनासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. त्याचे मापदंड निश्‍चित केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेऊ, असे केंद्राने सांगितले आहे. ‘आरकेव्हीवाय’ योजनेतूनही या आच्छादनासाठी बागायतदारांना मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. बागायतदारांना योजनांद्वारे मजूर स्वरूपातही मदत करण्यात येणार आहे.’’

महाराष्ट्र पणन विभागाचे व्‍यवस्थापक (निर्यात) सतीश वराडे म्हणाले, ‘‘आपल्या द्राक्षांची सर्वाधिक निर्यात युरोपीय देशांत, त्यानंतर आखाती देश व आशियातील पूर्व-पश्‍चिमी देशांना होते. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा द्राक्ष आयातदार देश आहे. आपला आंबा या देशाला जातो. त्याच धर्तीवर द्राक्षे पाठवता येतील का याची चाचपणी सुरू आहे. उभय देशांमध्ये त्यादृष्टीने बोलणीही झाली आहेत.’’

‘डाटा’ संकलित करणे गरजेचे

भारतीय द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी द्राक्षनिर्यातीची स्थिती, वाटचाल सध्या येत असलेली आव्हानेही विषद केली. ते म्हणाले, ‘‘कोणत्या देशात किती निर्यात होते, मागणी किती, पुरवठा किती याबाबतची आपल्याकडील माहिती मोघम आहे. त्याचा मजबूत ‘डाटा’ तयार केल्यास त्या दृष्टीने निर्यातीचे पध्दतशीर नियोजन करणे शक्य होईल.’’ राज्यातील द्राक्षस्थितीबाबत विविध विभागातील असा ‘डाटा’ ही संकलित करण्याची गरज यावेळी अन्य बागायतदारांनीही उपस्थित केली. परदेशात द्राक्षे पाठवताना कीडनाशकांच्या अवशेषांबाबत जसा अहवाल देणे बंधनकारक असते त्याच पध्दतीने द्राक्षातील ‘ब्रीक्स’ बाबतचा अहवाल देणे बंधनकारक करावे, अशी सूचना खापरे यांनी मांडली.

‘देशातील बाजारपेठेकडे लक्ष द्यावे’

राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले, ‘‘आपल्याकडील एकूण द्राक्ष उत्पादनातील केवळ सात टक्के निर्यात होते. उर्वरित द्राक्षे भारतातच विकली जातात. द्राक्ष म्हटले की कोणत्याही कार्यक्रमात केवळ निर्यातीचीच चर्चा होते. पण भारतातील विविध राज्ये हीच आपली मोठी बाजारपेठ आहे. ‘मेडिकल कौंसिल' सोबत चर्चा करून द्राक्षातील आरोग्यदायी गुणधर्मांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत द्राक्षाचा प्रचार वाढवायला हवा.’’

बागायतदार संघाचे खजीनदार सुनील पवार म्हणाले, ‘‘द्राक्ष आणि बेदाणा यांच्यापुढे जाऊन त्यावर आधारीत जॅम, जेली, ज्यूस, त्यासाठी लागणारे यांत्रिककरण यांना चालना मिळायली हवी. ‘रेसीड्यू फ्री ग्रेप्स इन डोमेस्टिक मार्केट’ ही संकल्पना रूजवायला हवी. द्राक्षाचे नवे पेटंटेड वाण, विविध महोत्सवांमधून द्राक्ष, वाईन यांचे ‘मार्केटिंग’ तसेच ऊस व अल्कोहाल या धर्तीवर द्राक्ष व स्पिरीट अशा संकल्पनांवर काम सुरू हेण्याची गरज आहे.’’

विविध समस्यांवर चर्चा

महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली या वेळी ‘पॅनेल डिस्कशन’ पार पडले. यात कृषीरत्न अनिलतात्या मेहेर, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज.मा. खिलारी, अखिल भारतीय द्राक्ष संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी राजेंद्र ब्रम्हेचा, अरूण मोरे, नाना झांबरे, अशोक गायकवाड, राहुल रसाळ, अभिषेक कांचन, सुभाष आर्वे, डॉ. सुजोय साहा, अन्य बागायतदार व निर्यातदारांनीही आपले अनुभव आणि विचार मांडले.

हवामान बदल, द्राक्षातील क्रॅकिंगची महत्वाची समस्या, अन्य विकृती, त्यावरील उपाययोजना, खरड व गोडी छाटणीच्या अनुकूल वेळा, बाजारातील थेट विक्रीची संधी, कोल्डस्टोरेज, नव्या वाणांचे महत्व, सेद्रिय कर्ब वाढ, बाजारातील सेंद्रिय उत्पादने, त्यातील भेसळ, वाढत्या उत्पादन खर्चावर नियंत्रण आदी विषयांवर यावेळी साधकबाधक चर्चा झाली. ‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी विक्री व्यवस्था व मार्केटिग यासाठी बागायतदारांच्या संघटितपणातून सक्षम व्यासपीठ तयार करण्याची गरज व्यक्त केली. अमेरिकेतील बदाम उत्पादकांच्या एकीतून तयार झालेला संघ व त्यांनी मिळवलेल्या जागतिक बाजारपेठेचे उदाहरण यावेळी विषद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com