केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा संकटात

ललित बहाळे : येवला येथे कांदा परिषद, ३० जूननंतर आंदोलनाचा निर्णय
केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा संकटात

नाशिक : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) लादल्याने कांदा पिकासाठी हे वाईट ठरले. निर्यातदारांना सौद्यांचे वायदे पूर्ण करता आल्याने ग्राहक हातातून गेले. केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच कांदा अडचणीत (Onion Crisis) आहे. आखाती देश आणि बांगलादेशची बाजारपेठ (Bangladesh's Onion Market ) हातातून जात आहे. तेथील देश लागवडीला प्रोत्साहन देत भारतीय कांदा नाकारत आहेत. याप्रश्‍नी वाणिज्य, विदेश व्यापार व कृषिमंत्री यांच्याशी भेटून चर्चा करणार आहोत. येत्या ३० जूनपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसोबत थेट दिल्लीकडे कूच करू, असा इशारा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (Lalit Bahale) यांनी सूचित केले.

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बुधवारी (ता. १५) कांदा उत्पादन व व्यापार परिषद झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून बहाळे बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रज्ञा बापट, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सीमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत भदाणे, युवा आघाडीचे सुधीर बिंदू, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

बहाळे म्हणाले, की मंत्री पियुष गोयल यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि व्यापार अशी दोन खाती आहेत. मात्र ग्राहकांना खूष करण्यासाठी त्यांनी व्यापार मंत्रालयाकडे दुर्लक्ष करून ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे काम पाहिले. त्यांचा कांदाप्रश्‍नी मागील अनुभव वाईट आहे. त्यामुळे आता सोबतच कृषिमंत्री निशाण्यावर आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी उत्पादवाढीसोबत बाजारात तुटवडा झाला पाहिजे, त्यासाठी जागतिक पातळीवरील कांदा साठवणूक तंत्रज्ञान, विविध गुणधर्म असलेल्या नावीन्यपूर्ण जातींचा विकास होणे गरजेचे आहे.

चटप म्हणाले, की आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र येऊया, आक्रमक दबाव गट म्हणून चळवळ पुढे न्यावी लागणार आहे. घनवट म्हणाले, की नाफेड व्यवस्था शेतकऱ्यांसाठी नाही तर ग्राहकांसाठी आहे. ही व्यवस्था बंद झाली पाहिजे. नाफेड गोपनीयता पाळत असल्याने बंदोबस्त करण्याचे आंदोलन करावे लागेल.

प्रास्ताविक शंकरराव ढिकले यांनी तर संतू पाटील झांबरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बापूसाहेब पगारे यांनी केले. परिषदेला नाशिक, धुळे, नगर, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, वाशीम, वर्धा, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकशाही नाही, तर दांडूकेशाही मार्गाने लढू

‘नाफेड’चा कांदा चाळीतच राहिला पाहिजे, तो खुल्या बाजारात विक्री होणार नाही याची काळजी घ्या. हा माल डांबून ठेवण्याचे आवाहन केले. लोकशाही नाही, तर दांडूकेशाही मार्गाने लढू; नाहीतर आपला घात होणार आहे, असे स्पष्ट केले. ईडी, आयकर विभागाचे अधिकारी व्यापाऱ्यांना त्रास देतील तेथील त्यांची चौकशी करा आणि आम्हीही लढण्याला सज्ज आहोत. माल बाहेर येऊ देणार नाही, फाटे बंद करण्याची तयारी ठेवा. व्यापाऱ्यांचे मनोबल खच्ची केले, तर आयकर, ईडीच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा बहाळे यांनी दिला.

परिषदेत मांडलेले मुद्दे :

- मंदीत धाडी नसतात; मात्र भाव वाढले, की आयकर, ईडीच्या पडतात त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर

- शेतकऱ्यांनो, सिंहासन हलविण्याची ताकद कांद्यात आहे, हे लक्षात ठेवा.

- चाळीस वर्षांपासून कांदाप्रश्‍नी लढाई सुरू असल्याने आता कोंडी सोडवावीच लागेल

- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अन्नदाता शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ ही परिस्थिती वाईट

- सर्वत्र महागाई वाढली, मग कांद्याला अपेक्षित दर का मिळत नाही?

- रस्त्यावरची लढाई आता नको, आगामी निवडणुकीत धडा शिकवू

- केंद्र सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत

- दर वाढल्यानंतर वाहतूकबंदी, साठा मर्यादा, आयकर, ईडीच्या धाडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com