कांद्याच्या उत्पादनात एकरी ५० टक्क्यांपर्यंत घट

प्रतवारीत घसरण; कांदा टिकवणक्षमतेचा प्रश्‍न उभा
कांद्याच्या उत्पादनात एकरी ५० टक्क्यांपर्यंत घट
OnionAgrowon

नाशिक : चालू वर्षी उत्तर महाराष्ट्रात २ लाख ६५ हजार हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवडी (Summer Onion Cultivation) झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत त्या ७३ हजार हेक्टरने वाढल्या. त्यामुळे विक्रमी उत्पादन (Record Onion Production) होईल, असा अंदाज होता. मात्र कांदा काढणीपश्‍चात (Post Harvesting) नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. एकरी उत्पादनात नाशिक व धुळे जिल्ह्यात ३० टक्क्यांपासून ते ५० टक्क्यांवर उत्पादन घटल्याचे वास्तव समोर आले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात ५० हजार हेक्टरने लागवडी वाढल्या. त्यासह धुळे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत त्या दुपटीने आहेत. तर जळगाव जिल्ह्यात वाढ दिसून आली. तर नंदुरबार जिल्ह्यातही उन्हाळी कांद्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन व उत्पन्नाचे गणित व्यस्त झाले आहे. या बाबत क्षेत्रीय पातळीवर जाऊन कांदा पिकाचा आढावा घेतल्यास एकरी उत्पादनात घट होण्यासह प्रतवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विकत असले तरी उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत आहेत. नीचांकी ४० रुपये, तर सरासरी ८७५ रुपयांखाली प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन व दर या दोन्ही बाजूनी कोंडी झाल्याचे चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यात डिसेंबरपूर्वी झालेल्या लागवडीमध्ये उत्पादन नुकसान तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. मात्र जानेवारीमध्ये झालेल्या लागवडीमध्ये एकरी उत्पादनात घट आहे. प्रामुख्याने येवला, मालेगाव, देवळा व चांदवड तालुक्यांच्या पूर्व भागात तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन निम्म्यावर आले आहे. कळवण तालुक्यात हे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. निफाड तालुक्याच्या पश्‍चिम भागात ३० टक्क्यांपर्यंत तर पूर्व भागात काही ठिकाणी ६० टक्क्यांपर्यंत घट आहे. सिन्नर तालुक्यातही ४० टक्क्यांवर घट आहे. इगतपुरी, पेठ, दिंडोरी या तालुक्यातही परिणाम असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे (NHRDF) माजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे म्हणाले, ‘‘तापमान वाढीनंतर कांदा पिकात अन्न तयार करण्याची क्षमता संपुष्टात येते. अशावेळी पीक जगते; मात्र अन्न तयार करून उत्पादन वाढ होऊ देत नाही. उशिरा लागवडीमध्ये तापमानाचा असा फटका अधिक बसतो. तापमान वाढल्याने पिकाची परिपक्वता लवकर होऊन ते काढणीस येते. मात्र टिकवणक्षमतेवर परिणाम होतो. कांद्यावरील संरक्षित आवरण बाधित होते. तीव्र सूर्यप्रकाश असल्याने कांद्याला इजा होते. अशी परिस्थिती चालू वर्षी दिसून आली. त्यामुळे साठवणूक क्षमतेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.’’

उत्पादनातील अडचणी :

- मजूरटंचाईमुळे लागवड व काढणी लांबणीवर

- चालू वर्षी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने कंदसड

- करपाजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम

- पीक फेरपालट न केलेल्या क्षेत्रात उत्पादनात घट

- कांद्याला अपेक्षित आकार नाही; गोल्टी व चिंगळीचे प्रमाण अधिक

- मालाची दुय्यम प्रतवारी

उत्तर महाराष्ट्रातील लागवड स्थिती (हेक्टर):

जिल्हा...२०२०-२१...२०२१-२२...लागवडीत झालेली वाढ

नाशिक...१,६६,५०४...२,१६,६७४...५०,१७०

धुळे...१५,०२४...३०,७३१...१५,७०७

जळगाव...३,०७६...४,३५७...१,२८१

नंदुरबार...७,३३४...१३,९८२...६,६४८

एकूण...१,९१,९३९...२,६५,७४५...७३,८०६

शेतकऱ्यांनी कळविलेले मुद्दे :

गेल्या दोन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याच्या लागवडी प्रारंभीच रोपे खराब झाल्याने नुकसान, खते, लागवड व काढणी मजुरी या शिवाय वाहतूक खर्चात वाढ झाल्याने एकरी खर्च ७० हजारांवर, पाण्याच्या टंचाईमुळे कांदा अपरिपक्व; त्यात कडक उन्हामुळे खराब होण्याचे प्रमाण वाढले, कांद्याच्या रंग, चकाकी व आकार यामध्ये फटका, कांद्याला गुणवत्तेअभावी बाजारात उठाव नाही, प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, मजूरटंचाईमुळे उत्पादनखर्च दुपटीने वाढूनही उत्पादन निम्म्यावर, डिसेंबरपर्यंतच्या लागवडीला दरवर्षीपेक्षा २५ टक्क्यांपर्यंत घट, तर जानेवारीनंतर ४० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट, घटलेले उत्पादन व सध्या क्विंटलला निच्चांकी ४० रुपये दर, खर्चात भरमसाट वाढ.

चालू वर्षी तापमानवाढीमुळे उत्पादनात मोठी घट आहे. एकीकडे पाणी कमी त्यात भारनियमनामुळे अजूनच संकट वाढले. यंदा एकरी ५० टक्के उत्पादन कमी आहे. वेळेवर सिंचन करण्यात अडचणी आल्या. तर खर्च ७० ते ८० हजार रुपयांवर गेला.
अनिल शिंदे, शेतकरी, देशमाने, ता. येवला
सुधारित पद्धतीने कांदा पीक घेऊन सुद्धा एकरी २ ट्रॅक्टर उत्पादन निघते. शेती कशी परवडेल, हा प्रश्‍न आहे. त्यात मिळालेल्या कांद्याची गुणवत्ता नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या कांदा लागवडीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत, तर जानेवारी महिन्यातील कांदा उत्पादनात ५० टक्के घट आहे. -
दत्तू भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलाल, ता. येवला
१० जानेवारीनंतरच्या लागवडीचा उतारा एकरी ७० ते ९० क्विंटल इतका आहे. तसेच कांद्याची गुणवत्ता असून, मध्यम प्रतीचा कांदा आहे. २५ ते ३० टक्के चिंगळी कांदा आहे.
वैभव शिंदे, शेतकरी, देश शिरवाडे, ता. साक्री, जि. धुळे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com