कच्च्या साखरेच्या निर्यातीस परवानगीची शक्यता

केंद्रीय अधिकाऱ्यांचे सूतोवाच; साखर उद्योगाची बैठक
कच्च्या साखरेच्या निर्यातीस परवानगीची शक्यता
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : साखर निर्यातीवर निर्बंध (Restriction On Sugar Export) आणल्याने उद्योगाचे (Sugar Industry) नुकसान होत असून सध्या निर्यात प्रकियेत असणाऱ्या ५ ते १० लाख टन कच्च्या साखरेच्या निर्यातीस (Raw Sugar Export) केंद्राने तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातील संस्थांनी केली आहे. अन्नपुरवठा मंत्रालयाचे केंद्रीय अधिकारी व देशभरातील साखर क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रमुख निर्यातदार यांची नुकतीच आभासी प्रणालीद्वारे बैठक झाली. यामध्ये साखर उद्योगातील सर्वच घटकांनी अगदी जोरदारपणे केंद्राकडे निर्यातीबाबत अनुकूल निर्णय घेण्याची मागणी केली. अधिकारी आमच्या मागणीकडे सकारात्मकपणे पाहत असून लवकरच कच्च्या साखरेला निर्यातीस परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती बैठकीत सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली.

केंद्राने काही दिवसांपूर्वीच कारखान्यांना मागणीच्या ४५ टक्क्यांपर्यंत साखर निर्यात कोटा दिला होता. विशेष करून कच्ची साखर निर्यातीचे करार होऊनही केंद्राने मान्यता न दिल्याने कच्च्या साखरेचे नुकसान होत आहे. ही साखर निर्यात न झाल्यास साखर खराब होणार असल्याने जेवढे करार झाले आहेत त्या सर्व निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातील संस्थांनी केली. अनेक कारखान्यांना या कराराच्या आधारावर ऊस बिलासाठी रक्कम मिळालेली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत करार केलेली साखर परदेशात जाणे अपरिहार्य असल्याचे साखर कारखानदारांनी केंद्रीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

साखर कारखान्याचे अधिकारी मात्र निर्यातीचे पुनरवलोकन करण्याच्या परिस्थितीत सुरुवातीच्या टप्प्यात नव्हते. सप्टेंबरपर्यंत चालू हंगामातील उपलब्धतेनुसार, ते मर्यादित प्रमाणात कच्च्या साखरेला अतिरिक्त परवानगी देऊ शकत असल्याचे केंद्रीय अधिकाऱ्यांनी कारखानदारांना सांगितले. केंद्राकडून उत्पादन व संभाव्य विक्रीचा आढावा घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

निर्यातीवरील निर्बंध कमी करून जास्तीत जास्त साखर निर्यातीला परवानगी द्या, अशी मागणी साखर उद्योगाच्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. केंद्रीय अधिकाऱ्यांनी कोणतेही स्पष्ट आश्‍वासन दिले नसले तरी त्यांना साखर उद्योगाचे म्हणणे पटले आहे. येत्या काही दिवसांत पाच ते दहा लाख टन कच्च्या साखरेला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या ऑगस्टला ७५ लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर होऊ शकतो, असे सूतोवाच बैठकीत सहभागी साखर उद्योगातील संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर केले. अन्न मंत्रालयाने कच्च्या साखरेच्या उपलब्धतेची पडताळणी करण्यासाठी कारखान्याकडे किंवा बंदरांवर असलेल्या कच्च्या साखरेचे तपशील सादर करण्यास सांगितले आहे. हा तपशील हाती आल्यानंतर केंद्राकडून साखर निर्यातीबाबतचे अनुकूल निर्णय होऊ शकतील, असा अंदाज आहे.

उत्पादन अंदाजाबाबत संभ्रम

यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात साखर उद्योगातील संस्थांनी वर्तवलेले सगळे अंदाज चुकीचे ठरले आहेत. प्रत्येक महिन्याला साखर उद्योगातील संस्थांना वाढीव नवीन अंदाज जाहीर करावे लागले. यामुळे सर्वजण संभ्रमात पडले. काही संस्था शास्त्रोक्त पद्धतीने अंदाज व्यक्त करत असताना इतका फरक कसा राहू शकतो. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे एका अधिकाऱ्याने साखर संस्थांच्या प्रतिनिधींना सांगितले. उत्पादनाबाबत निश्चित माहिती नसल्याने सरकार सावधतेने पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. उत्तर प्रदेशात यंदा जास्त क्षेत्र असूनही उत्पादन कमी झाले तर महाराष्ट्रात सुरुवातीच्या टप्प्यात उच्चांकी साखरनिर्मिती होईल, असा अंदाज कुणालाही आला नव्हता; यामुळे नियोजन करणे अवघड बनले, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

साखर उद्योग आशावादी

आम्ही साखर उद्योगाची बाजू जोरदारपणे केंद्रीय अधिकाऱ्यांकडे मांडल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. आम्ही साखर उद्योगाचे होणारे संभाव्य नुकसान केंद्रीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो आहोत. येत्या काही दिवसांत निश्‍चितपणे सकारात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.

ऑगस्टमध्येच निर्यात धोरण जाहीर करावे

दरम्यान, पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्राने ऑगस्टमध्येच साखर निर्यात धोरण जाहीर करावे, अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे. अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी खाद्य मंत्रालयाला दिलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. हंगाम सुरू होण्याअगोदरच कारखान्यांना कच्च्या साखरेची मागणी येते. जर ऑगस्टमध्येच निर्यात धोरण जाहीर झाल्यास मागणीनुसार कारखान्यांना कच्ची साखर किती करावी याचा अंदाज येईल. यानुसार ती निर्यात करता येईल, असे ठोंबरे यांनी पत्रात म्हटले आहे. सध्याच्या हंगामातील शिल्लक कच्च्या साखरेच्या निर्यातीबाबतही केंद्राने सकारात्मक विचार करावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com