केळीला सहा वर्षांनंतर विक्रमी भाव

दोन हजार रुपये भावाचा टप्पा ओलांडला
केळीला सहा वर्षांनंतर विक्रमी भाव
Banana Agrowon

रावेर, जि. जळगाव : सध्या रावेर तालुक्यासह जिल्ह्यात आणि लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर भागातदेखील कापणीयोग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. तसेच उत्तर भारतात केळीची मागणी (Banana Demand) मोठ्या प्रमाणात असल्याने केळीला २ हजार २०० रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव (Record Rate For Banana) मिळत आहेत. २०१६-१७ नंतर प्रथमच केळीचे भाव २ हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत.

मागील दोन-तीन वर्षांत जून-जुलै महिन्यात लागवड झालेल्या केळीवर नंतर सीएमव्ही या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला तसेच या काळात लागवड केलेली केळी ऐन कापणीच्या काळात मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीला येणाऱ्या संभाव्य वादळात सापडण्याची भीती असते. म्हणून मागील वर्षी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सुमारे २५ टक्के केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये केळी लागवड केलीच नाही.

या वर्षी आंबा हवा त्या प्रमाणात न आल्याने केळीची मागणी उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये बऱ्यापैकी टिकून आहे. सध्या केळीची कापणी इतकी कमी झाली आहे की सावदा रेल्वे स्थानकातून रोज भरून जाणारा रेल्वे केळी रॅक आता एक दिवसाआड जात आहे.

काश्मीरमध्येही मागणी

उत्तर भारतातील श्रीनगर, पुलवामा, पठाणकोट या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या केळीला मोठी मागणी आहे. कागदी खोक्यात पॅकिंग करून ट्रकमधून ही केळी पाठवली जात आहेत. उत्कृष्ट केळीची मागणी हरियाना आणि पंजाबमध्ये देखील आहे. या सर्व भागात पाठविल्या जाणाऱ्या केळीला २ हजार ते २१०० रुपयांपेक्षा जास्त भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.

मेहनतीचे फळ

तालुक्यातील आणि जिल्ह्यातील काही प्रयोगशील व प्रगतिशील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सीएमव्ही रोगाचा आणि संभाव्य वादळाचा धोका पत्करून मागील जून-जुलै महिन्यात केळी लागवड केली. नुकत्याच संपलेल्या एप्रिल-मे महिन्यात ४५-४८ अंश तापमानात केळीची जोपासना केली आणि दर्जाही राखला. तांदळवाडी येथील सुशील पाटील, प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन यांच्या केळीला विक्रमी २२०० रुपये क्विंटल भाव मिळाला असून, त्याबरोबर अभिजित महाजन, वैभव पाटील, जितेंद्र महाजन, अमोल महाजन, कन्हय्या महाजन, मिलिंद पाटील, नीलेश पाटील (निंबोल), संदीप चौधरी (चिंचोल), विशाल महाजन (नायगाव, ता. मुक्ताईनगर) या शेतकऱ्यांच्या केळीलाही २१०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळालेला आहे.

भाववाढ शक्य

२०१६-१७ या आर्थिक वर्षात तालुक्यातील आणि जिल्ह्यातील केळीला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला होता. आता त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी केळीला पुन्हा विक्रमी भाव मिळाले आहेत. गुजरातमधील केळीची आगामी पंधरवड्यात स्पर्धा करावी न लागल्यास हेच भाव किमान महिनाभर टिकून राहतील, अशी स्थिती आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com