सोयाबीनचे दर तेजीत

कळमना बाजार समितीत दर ५५०० ते ६४५० रुपये क्विंटल
सोयाबीनचे दर तेजीत
Soybean RateAgrowon

नागपूर : मॉन्सून लांबल्याने (Monsoon) शेतकऱ्यांसह प्रक्रिया उद्योग (Processing Industry) क्षेत्रातील सर्वांचीच चिंता वाढली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दरात तेजी (Soybean Price Rice) नोंदविण्यात आली आहे. कळमना बाजार समितीत सोयाबीनची ३८६ क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली असून, दर ५ हजार ३०० ते ६ हजार २९० रुपयांवरून ५ हजार ५०० ते ६ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत.

मॉन्सून यंदा वेळेवर दाखल होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली; मात्र आठवडा उलटूनही पावसाच्या सरी न बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. हंगाम लांबण्याची शक्यता पाहता बाजारातदेखील चिंता वाढली असून, प्रक्रिया उद्योजक कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी चिंताग्रस्त झाले आहेत. या सर्वांच्या परिणामी बाजारात येत्या काळात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कळमना बाजार समितीत गेल्या महिन्यात सोयाबीनचे दर चांगले तेजीत होते. त्यानंतर दरात घसरण अनुभवण्यात आली. आता पुन्हा सोयाबीन दरात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत आहे. महाराष्ट्र १००, मध्य प्रदेश ७५ तर राजस्थानमधील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटलमागे ५० रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. बाजारातील ही स्थिती पाहता येत्या काळात सोयाबीनचे दर आणखी तेजीत राहतील, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

पुरेसे सोयाबीन उपलब्ध ः ‘सोपा’चा दावा

बाजारात सोयाबीनची आवक मंदावली असतानाच दुसरीकडे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) मात्र सोयाबीनची उपलब्धता पर्याप्त असल्याचा दावा केला आहे. ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत सोया डिओसीच्या निर्यातीमध्ये ६९.३० टक्के घट झाली. ५.५० लाख टन इतकीच सोया डिओसी निर्यात झाल्याचे ‘सोपा’चे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १७.९० लाख टन इतकी निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात आठ महिन्यांच्या कालावधीत ७१ लाख टन इतकीच आवक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७९.७५ लाख टन आवक झाली होती. ५३ लाख टन क्रशिंग झाले, ५१ हजार टन सोयाबीन निर्यात झाली तर मे अखेरपर्यंत ५५.३९ लाख टन सोयाबीन साठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षीपेक्षा १९.६४ लाख टन अधिक आहे. त्यामुळे बाजार स्थिर राहील, अशी अपेक्षा ‘सोपा’ने वर्तविली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com