मुदती अगोदरच हरभरा खरेदी बंद

खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण; हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
मुदती अगोदरच हरभरा खरेदी बंद
Chana Agrowon

अकोला ः राज्यातील हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) १८ जूनपर्यंत दिलेली मुदत अद्याप शिल्लक असतानाच उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने पुन्हा एकदा पोर्टल बंद करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील हरभऱ्याची खरेदी (Procurement Portal) गुरुवार (ता. २) सायंकाळपासून ठप्प पडली असून, अद्यापही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा तसाच पडून आहे.

केंद्र सरकारच्या आधारभूत किमत योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी मार्चपासून केंद्र सुरू करण्यात आले होते. पहिल्या टप्‍यात राज्याला ६७ लाख १३ हजार ५३४ क्विंटल हरभरा खरेदीसाठी २९ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत पूर्ण होण्याच्या आधीच २३ मे रोजी खरेदी बंद करण्यात आली. त्यानंतर सर्वत्र मागणी झाल्याने केंद्राने सात लाख ४६ हार ४६० टन खरेदीला परवानगी देत १८ जूनपर्यंत ही प्रक्रिया राबविण्याची मुदत दिली. परंतु खरेदीचे हे उद्दिष्ट अवघ्या चारच दिवसांत पूर्ण झाले. परिणामी, गुरुवारी दुपारपासूनच नाफेड, एफसीआयच्या केंद्रावर खरेदी थांबवण्यात आली. पोर्टल बंद पडल्याने यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. व्हीसीएमएफ, मार्केट फेडरेशन, महाएफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको आदी खरेदी संस्थांच्या माध्यमातून ही खरेदी केली जात होती.

खरेदी बंद झाल्याने राज्यभरात हजारो शेतकरी हरभरा विक्रीपासून वंचित राहिलेले आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत किमान १० हजार शेतकरी अद्याप प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याचा आकडा यापेक्षा आणखी कितीतरी मोठा आहे.

दुसऱ्या टप्प्यात शेतकरी कंपन्यांना फायदाच नाही

हरभरा खरेदीसाठी दुसऱ्या टप्प्यात परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रावर मात्र खरेदीच होऊ शकली नाही. गुरुवारी केवळ एक तास-दोन तासांसाठी पोर्टल उपलब्ध झाले. या काळात त्यांना केवळ खरेदीच्या नोंदी करणेच शक्य झाले. व्यवस्थापनातील गोंधळामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे, त्या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शेतकरी प्रतिक्रिया...

मला बुधवारी (ता. एक) सायंकाळी पाच वाजता नाफेडमधून फोन आला, ‘तुमचा हरभरा गुरुवारी (ता. दोन) घेऊन यावा, असा निरोप देण्यात आला. मी बाहेरगावी असल्यामुळे गुरुवारी हरभरा नेणे शक्य नव्हते, म्हणून त्यांना विनंती केली की शुक्रवारी (ता. तीन) आणतो. त्यांनी मान्य केले. नाफेडच्या नियमानुसार एकदा नंबर लागला की सात दिवसांत हरभरा देणे बंधनकारक राहते. माझ्याकडे ६४ क्विंटल ५० किलो हरभरा होता. म्हणून मी गुरुवारी सायंकाळीच ट्रॉलीत ४० पोती भरून ठेवली व उर्वरित माल नेण्यासाठी दुसऱ्या वाहनात पोते भरू लागलो. तर लगेच निरोप मिळाला की खरेदी बंद झाली. आता माझ्यासारखे जेवढे शेतकरी हरभरा विक्रीपासून वंचित राहिले त्यांना प्रतिक्विंटल हजार रुपये भाव फरक द्यायला हवा. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा ४२०० रुपयांवर विकत नाही. शासनाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा. जर येत्या दोन दिवसांत काही निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रीय किसान संस्थेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- निंबाजी लखाडे पाटील, रा. खुदनापूर, ता. मेहकर, जि. बुलडाणा

हरभरा खरेदी आहे की नाटक ः तुपकर

हरभरा खरेदीसाठी संदेश आल्याने शेतकरी केंद्रावर माल घेऊन पोहोचले तर येथे खरेदी बंद करण्यात आली. आता वाहनात भरून नेलेल्या मालाचा वाहतुकीचा खर्च, दिवसभर घेतलेली मेहनत तसेच पडलेली मजुरी याला कोण जबाबदार आहे. हमीभाव योजनेचा उद्देश शेतकऱ्याचा प्रत्येक दाणा खरेदी होईपर्यंत योजना सुरू ठेवणे असताना हे ‘बंद-सुरू’चे नाटक का केले जात आहे हेच समजत नाही. शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत ही योजना सुरू ठेवा. अन्यथा, आमचे कार्यकर्ते राज्यभर रस्त्यावर उतरतील.

- रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com