Banana
BananaAgrowon

केळी उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले

वसमत तालुक्यात ५२९ हेक्टर केळीला वादळाचा तडाखा

हिंगोली ः वादळामुळे काढणीस आलेली केळीची झाडे (Banana Tree) मोडून पडली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. होत्याचे नव्हते झाल्याने वसमत तालुक्यातील केळी उत्पादकांचे (Banana Growers) अर्थकारण कोलमडले आहे. १३ गावांतील १ हजार २४६ शेतकऱ्यांच्या ५२९ हेक्टरवरील केळी बागांना (Banana Crop Damage) वादळाचा तडाखा बसल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात आढळून आले आहे. पीक व्यवस्थापनावरील (Crop management) खर्च वाया गेला आहे. शेतकऱ्यांना विमा भरपाईसह (Compensation) भरीव आर्थिक मदतीची गरज आहे.

वसमत तालुक्यातील गिरगाव, खाजमापूर, पार्डी बुद्रुक, परजना, दाभडी, सोमठाणा, कुरुंदा, कुरंदवाडी, कौठा, गुंज, ममदापूर वाडी आदी गावांतील शेतकऱ्यांचे केळी हे प्रथम क्रमांकाचे नगदी पीक आहे. त्यानंतर हळद, ऊस या पिकांचा क्रमांक आहे. गिरगाव तसेच परिसरातील अनेक गावांना सिद्धेश्‍वर, तसेच इसापूर प्रकल्पांच्या कालव्याचा सिंचनासाठी लाभ होतो. त्यामुळे जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत असताना गिरगाव, कुरुंदा या मंडलांमध्ये मात्र केळीचे क्षेत्र टिकून आहे. अनेक शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत आहेत. विविध देशात केळीची निर्यात होऊन शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

यंदाच्या हंगामात केळीचे प्रतिक्विंटलचे दर २००० रुपयेपर्यंत पोहोचले आहेत. केळीचे पीक बहरात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची आशा होती. परंतु बुधवारी (ता. ८) दुपारनंतर झालेल्या वादळामुळे केळी बागा मोडून पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी या भागातील विविध शेतकऱ्यांच्या शेतावरील सुमारे आठ लाख केळी झाडांचे व्यवस्थापन विविध कंपन्यांमार्फत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांशी करार करण्यात आले होते. परंतु वादळात बागा मोडून पडल्याने पीक व्यवस्थानावरील खर्च वाया गेला आहे. फळपीकविमा संरक्षण घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना संकेतस्थळ बंद, सर्व्हर डाउन आदी समस्यांमुळे विमा प्रस्ताव दाखल करता आले नाहीत.

गिरगाव येथील शेतकरी गणेशराव नादरे म्हणाले, ‘‘दरवर्षी जून, जुलै महिन्यात केळी काढणीसाठी येते. पहिल्या घडाचे पूजन करून केळी पिकविली जाते. गावात वाटप केले जाते. परंतु यंदा वादळामुळे पाच हजारांपैकी साडेचार हजारांवर झाडे मोडून पडली. उभ्या झाडांच्या मुळ्या खिळखिळ्या झाल्या. एकही झाड हाती न लागल्यामुळे यंदा केळी पूजन झाले नाही. साडेतीन लाख रुपये खर्चासह १२ ते १४ लाखांचे उत्पन्न बुडाले.’’

बाराशेवर शेतकऱ्यांचे नुकसान
पीक नुकसानीच्या प्राथमिक सर्वेक्षणात तेरा गावांतील १ हजार २४६ शेतकऱ्यांच्या ९०६ पैकी ५२९ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी एकूण ९५ लाख २२ हजार रुपये निधीची मागणी तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम बांधित क्षेत्र निश्‍चित करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी सांगितले.

केळीच्या उतिसंवर्धित पंधरा हजार रोपांची लागवड केली होती. चांगले दर असल्यामुळे चाळीस ते पन्नास लाखांचे उत्पन्न अपेक्षितहोते. परंतु वादळाने बाग मोडून पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने मदत करावी.
केशव नरडीले, खाजमापूर, ता. वसमत
केळी बागेतील अडीच हजारांवर झाडे मोडून पडली आहेत. खर्च वाया गेला. उत्पन्न बुडाले. मोडलेली झाडे दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये खर्च लागत आहे. उभ्या झाडांच्या मुळ्या ढिल्या झाल्या आहेत. उत्पादन मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
रमेश बागल, पार्डी बुद्रुक, ता. वसमत
साडेतीन एकरांवरील केळी बागेतील चार हजारांवर झाडे मोडून पडली आहेत. आजच्या दराने १४ लाखांचे नुकसान झाले आहे. वेबसाइट बंद असल्याने विमा काढता आला नाही.
बाबूराव रायवाडे, गिरगाव, ता. वसमत

केळी पीकबाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गाव...शेतकरी संख्या...लागवड क्षेत्र...बाधित क्षेत्र
गिरगाव...५२०...२५५...१४४
खाजमापूर...१५७...१२०...१०९.५
पार्डी बुद्रूक...२८५...२५५...९५
दाभडी...१२...६३...६०...४५
सोमठाणा...२५...३२.२...१८
परजना...२०...२५...१२
कुरुंदा...८०...७०...५८
कुरुंदवाडी...३५...४२...२०
ममदापूरवाडी...२५...२०...१५
कानोसा...१५...१५...९
गुंज...१०...२०...१
मुरुंबा बुद्रूक..६...२०...१
कौठा...५...२...१.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com