
अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात कापूस दरात काही ठिकाणी आज वाढ पाहायला मिळाली. मात्र अद्यापही जानेवारीचे कापसाचे वायदे सेबीने सुरु करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीवरच दर अवलंबून असतील, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
देशातील शेतमाल बाजारात आता कापसाची चर्चा जास्त रंगू लागली. चालू आठवड्यात कापसाचा बाजार तुटला. त्याला मुख्यकरून वायदे कारणीभूत होते. मात्र मंगळवारी कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा होऊन बाजार बंद झाला होता. पण वायदे कमी झाल्यानंंतर प्रत्यक्ष खरेदीतील दर ज्या प्रमाणात पाडले होते, त्या प्रमाणात वायदे वाढल्यानंतर सुधरणा झाली नाही. म्हणजेच वायद्यांच्या आडून व्यापारी आणि कापड उद्योगाने आपला मनसुबा पूर्ण केला. त्याला बाजारातील आवक आणि अफवा तसंच संभ्रमही कारणीभूत होते.
कालपासून प्रत्यक्ष खरेदी अर्थात बाजार समित्यांमधील कापूस दरात काही ठिकाणी क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसून आली. आजही कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सध्या आर्थिक नड असलेले शेतकरी कापूस विकत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस मागे ठेवला.
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र आज कापसाचे वायदे नरमले होते. कापसाचे व्यवहार ८४.५९ सेंट प्रतिपाऊंडने पार पडले. रुपयात हा दर १५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल होतो. मात्र नवीन वर्षात कापसाचे दर वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
वायद्यांवरून चर्चा
देशातील वायदेबाजार अर्थात एमसीएक्सवर कापसाचे जानेवारी आणि त्यापुढील वायदे अद्यापही खुले झाले नाहीत. कापसाच्या वायद्यांबाबत आता भलते सलते अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही जणांच्या मते सेबी कापसाचे वायदे सुरु करण्यास इच्छूक नाही, तर काही जणांच्या मते जानेवारीच्या शेवटपर्यंत फेब्रुवारीचे वायदे येऊ शकतात. वायदे नसताना कापसाचे दर खरंक कमी राहतात का? याची चचपणी सरकार करत असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. पण सेबी किंवा सरकारने कापसाच्या वायद्यांविषयी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळं वाट पाहणं सोईस्कर ठरेल.
शेतकऱ्यांना वायद्यांचा फायदा काय?
पण वायद्यांमध्ये कापसाची प्रत्यक्ष खरेदी विक्री नगण्य असते. वायदे हे हेजिंगचे प्लॅटफाॅर्म आहे. आयातदार, निर्यातदार, व्यापारी, उद्योग आपली जोखिम कमी करण्यासाठी वायद्यांचा आधार घेत असतात. पण भविष्यातील दरपातळी समजण्यासाठी शेतकऱ्यांना वायदे महत्वाचे असतात.
कापूस दर वाढणार
पण वायदे सुरु झाले नाहीत तरी जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केले नाही तर बाजारातील आवक वाढणार नाही. त्यामुळं वायदे नसल्याच्या काळात शेतकऱ्यांच्या विक्रीवर बऱ्यापैकी बाजार अवलंबून राहील. सोयाबीनच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव येत आहे. पण जानेवारीत कापसाचे दर वाढतील. त्यामुळं शेतकऱ्यांनी गरजेपुरता कापूस विकावा, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.