Maize : मका तेजीत राहणार

देशात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
Maize Market
Maize MarketAgrowon

पुणेः देशात सध्या मक्याचा दर (Maize Price Rate) तेजीत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं दराला आधार मिळतोय. तर खरिपातही मका लागवडीत अपेक्षेप्रमाणं वाढ झाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही मका दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जगातील महत्वाच्या मका उत्पादक देशांमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानाचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळं जागतिक मका पुरवठा मर्यादीत होण्याची शक्यता व्यक्त होतेय. अमेरिकेचा कृषी विभाग अर्थात युएसडीएनं नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात २०२२-२३ या वर्षात जागतिक मका उत्पादनात ३९१ लाख टनांची घट येण्याचा अंदाज व्यक्त केला. यंदा अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसंच रशिया आणि युक्रेनमध्येही मका पिकाला फटका बसतोय.

Maize Market
Soybean : सोयाबीन, भात, मका पिक व्यवस्थापनात करा हे बदल

जागतिक पातळीवर मका निर्यातीत अमेरिका आघाडीवर आहे. मात्र येथील पिकाचं दुष्काळामुळं नुकसान होतंय. त्यामुळं यंदा अमेरिकेतील मका उत्पादन १९२ लाख टनांनी कमी राहून ३ हजार ६४७ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. तर युरोपियन युनियनमधील रोमानिया, हंगेरी, फ्रान्स, इटली, स्पेन, स्लोवाकिया, बुल्गेरिया आणि जर्मनी या देशांनाही दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं युरोपियन युनियनमधील मका उत्पादन १०९ लाख टनाने घटणार आहे. युद्धाच्या झळा सोसणाऱ्या युक्रेनमध्येही यंदा उत्पादन १२१ लाख टनांनी घटेल, तर रशियातही उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय.

तसंच युएसडीएनं यंदा जागतिक मक्याची मागणी स्थिर राहील, तर शिल्लक साठा ५१ लाख टनांनी घटून ६ हजार ६७ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केलाय. म्हणजेच यंदाचा शिल्लक साठा मागील आठ वर्षांतील दुसरा निचांकी साठा असेल. म्हणजेच यंदा जागतिक बाजारात मक्याचा पुरवठा मर्यादीत असेल. त्यामुळे मका दर तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

तर देशात सध्या मक्याचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी देशात मका तेजीत आहे. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं यंदा पेरा वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र ताज्या अहवालानुसार देशात केवळ दीड टक्क्यानेच मक्याची लागवड वाढली. देशात आतापर्यंत जवळपास ८० लाख हेक्टरवर मका आहे. तर बाजारात मका दर २३०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील मागणी बघता मका दरात पुढील काळात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com