Turmeric : विदर्भातील वायगावच्या हळदीचा देशभरात डंका

समुद्रपूर तालुक्‍यातील आरोग्य वर्धक वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर सोन्याचे दिवस आले आहेत.
Turmeric
TurmericAgrowon

वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळदीची (Waygaon Turmeric) माहिती देशभरात पोहोचविण्यासाठी पोस्टाचे पाकिट (Post Envelop For Turmeric Branding) तयार करण्यात आले आहे. ` अतुल्य भारत की अमूल्य निधी` या संकल्पनेंतर्गत हे पाकिट तयार करून त्यावर वायगावर हळदीची माहिती (Turmeric Information On Post Envelop) छापण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्या हस्ते या पाकिटाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

समुद्रपूर तालुक्‍यातील आरोग्य वर्धक वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर सोन्याचे दिवस आले आहेत. वर्धा जिल्ह्यातील वायगाव गावात उत्पादित होणाऱ्या हळदीला वायगाव हळद असे नाव रूढ झाले. समुद्रपूर तालुक्‍यात वायगाव जातीच्या हळदीची लागवड परंपरेने होत आहेत. या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आणि औषधी गुणधर्मामुळे बाजारात इतर हळदीच्या तुलनेत अधिक भाव मिळत असल्याने ही हळद देशभरातील खवय्याच्या अन्नाची पोषकता आणि चव वाढविण्यास सहाय्यभूत ठरली आहे.

Turmeric
औरंगाबाद झाले संभाजीनगर, उस्मानाबाद धाराशिव ! हिंगोलीत हळद संशोधन केंद्र

महात्म्याचा वर्धा जिल्हा

1930 मध्ये महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमावरुन दांडीसाठी पदयात्रा सुरु केली. त्याचवेळी त्यांनी भारताला स्वातंत्र मिळेपर्यंत साबरमतीला न परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दरम्यान त्यांना अटक करुन दोन वर्ष कारागृहात ठेवण्यात आले. प्रदिर्घ कारावासानंतर त्यांची सुटका झाली त्यानंतर त्यांनी काही काळ भटकंतीत घालविले. याच दरम्यान त्यांनी मध्यभारतात आपले मुख्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल 1936 मध्ये ते तेव्हाच्या शेगाव आणि आताच्या सेवाग्राममध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांचे वय 67 वर्ष होते. महात्मा गांधी यांनी या ठिकाणी बराच काळ घालविला. स्वातंत्रलढ्यातील अनेक आंदोलनाचे सेवाग्राम हे साक्षीदार राहिले आहे. महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळेच वर्धा जिल्हयाला वेगळी ओळख देश आणि जागतीकस्तरावर मिळाली. गांधीजींच्या पुढाकारानेच या भागात चरख्यावरील खादी उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले आजही अनेक खादीचे प्रकल्प या भागात सुरु आहेत. काळानुरुप त्यामध्ये बदल झाले असले तरी रोजगार निर्मितीचा उद्देश त्यातून साधण्यास मोठा हातभार लागला आहे. ग्रामोद्योगावरील आधारीत अनेक प्रकल्प देखील वर्धा जिल्हयात आहेत. सेंद्रीय कापूस उत्पादनावर देखील या भागातील शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शामुळे हे परिवर्तन घडले. वर्धा जिल्हयाचे वैशिष्ट जपणाऱ्या या बाबीसोबतच इतरही अनेक वैशिष्टय या जिल्हयाने जपली आहेत. त्यामध्ये कुरकुमीनचे अधिक प्रमाण आणि याच वातावरणात येणाऱ्या वायगाव हळदीचा देखील समावेश आहे. आजपर्यंत वायगाव फक्त बाबा फरीद गिरडवाले यांचा दर्गा व लसनपूरच्या गोशाळेसाठी प्रसिद्ध होते, पण भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर वायगाव व परिसरातील गावे कुरकुमीन आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या हळदीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओळखली जात आहेत.

Turmeric
व्यवस्थापनातून चांगल्या हळद उत्पादनात सातत्य

ऐतिहासिक पार्श्वभूमी

मुगल काळापासून समुद्रपूर परिसरातील माळी समाज स्थानिक वायगाव जातीच्या हळदीची लागवड करीत आहे. त्याकाळी मुगल सुभेदारांनी माळी समाजातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना एक आर पासून ते 10 आर पर्यंत हळद लागवडीसाठी जमिनीचे पट्टे दिले. हळद लागवडीसाठी दान दिलेल्या जमिनीला हरदान असे म्हटल्या जायचे. त्याकाळी 300 शेतकऱ्यांना सुभेदारांनी जमिनीचा वाटप केला. त्याची शासकीय दप्तरात देखील नोंद आहे. त्याकाळी उत्पादित हळद सुभेदाराच्या माध्यमातून मुगल कालीन राज्यात वितरीत व्हायची तर उर्वरित हळदीची बाजारात विक्री व्हायची . लोकांच्या पसंतीस उतरलेल्या हळदीची मागणी वाढल्याने 60 किलोमीटरच्या परिक्षेत्रात लागवड केली जात आहे.

सध्या पूर्वविदर्भ आणि पश्‍चिम विदर्भातील काही भागात लागवड वाढली आहे. वायगावच्या हळद लागवडीसाठी दान मिळालेल्या पट्ट्यात काहींनी घर उभी केली. मात्र वायगाव गावात अद्यापही हळदीची लागवड क्षेत्र कायम आहे.सध्या स्थितीत समुद्रपूर तालुक्‍यातील गावात शेतकरी हेक्‍टरमध्ये हळदीचे पिक घेत आहे.

वायगाव हळद आरोग्य वर्धक

वायगाव हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही हळद इतर हळदीच्या तुलनेने रंगाने गडद पिवळी असून तिची चवही वेगळी आहे. ही हळद सूज, वेदना, कमी व नष्ट करणारी, त्वचा विकारांचा नाश करणारी, जखम निर्जंतुकीकरण करून भरून काढणारी, रुची वाढवणारी, तापाचा नाश करणारी, अशी विविध गुणांनी समृद्ध आहे. कर्करोग, मेंदूविकार, वात विकार, सर्दी, ताप, खोकला त्वचाविकार इत्यादीसाठी ही उपयुक्त आहे. हळदीचा अर्क हा कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी उपयुक्त असतो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. अलीकडे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार हळदीतील कुरकुमीन हे संयुग वेगळे काढून त्याचा वापर कर्करोगग्रस्त पेशी मारण्यासाठी करता येतो. आत्तापर्यंत कुरकुमीन हे गुणकारी असल्याचे माहीत असूनही त्याचा वापर परिणामकारकपद्धतीने करता येत नव्हता, असे इलिनोइस विद्यापीठाचे प्रा. दीपरंजन पाल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस

समुद्रपूर तालुक्‍यातील सेंद्रिय हळद उत्पादक शेतकरी गटाने विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक शेतकरी कंपनीच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उभारली आहे. कोरोना काळातही ए.एस ऍग्री अक्वा कंपनीशी करार करून ओली हळद 900 टन विक्री केली आहे. यातून या शेतकरी कंपनीने दीड कोटीची उलाढाल केली आहे.

वायगाव हळदीची लागवड

वायगाव हळद लागवडीसाठी मातृ कंदाचा वापर करण्यात यायचा. अद्यापही पारंपारिक हळद उत्पादक मातृकंद लागवडीला पसंती देतात. मात्र व्यावसायिक दृष्टीने अधिक क्षेत्र लागवड करण्यासाठी हळदीच्या शेंगाचा वापर व्हायला लागला आहे. हळदीची लागवड साधारणपणे अक्षय्यतृतीयेपासून सुरु होते. या भागात हळदीचे पिक नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर अद्यापही करतात. मात्र सध्या काही शेतकरी तुषार आणि ठिबक सिंचनाचा वापर करतात.

उत्पादन काढणी व प्रक्रिया

वायगावचे 80 टक्के शेतकरी पूर्वी हळदीचे उत्पादन घ्यायचे. सध्यस्थितीत तालुक्‍यात चारशेहून अधिक शेतकरी हळद लागवड करीत आहे. मे आणि जून महिन्यात लागवड केलेल्या हळदीची काढणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात करण्यात येते. या महिन्यात उत्पादित उत्पन्नाची प्रतवारी करून मातृकंद बियाण्यासाठी वेगळी ठेवण्यात येते. तर उर्वरित शेंगा तांब्याच्या पात्रात उखळणी करून सुकविल्या जाते. मात्र कालातंराने आधुनिक प्रेशर कुकरचा वापर होवू लागला आहे. ताम्र पात्राच्या माध्यमातून उखळलेल्या हळदीचे गुणधर्म साबूत राहण्यास मदत मिळायची. वायगाव हळदीवर आताही पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. वायगाव हळदीत कुरकुमीन 6 टक्के पासून 9 टक्‍क्‍यापर्यंत आढळून येते. इतर हळदीच्या तुलने वायगाव हळदीचा पावडर मऊ असल्याने ग्राहकांच्या पसंतीत उतरली आहे.

(शब्दांकन ः गजानन गारघाटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com