
पुणेः चीन हा जगातील सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र २०२२ मध्ये कोरोनामुळं चीनची सोयाबीन आयात (Soybean Import) कमी राहिली.
आता चीनमधील कोरोना निर्बंध शिथिल होत आहेत. त्यातच तिथे सोयापेंडचा (Soyacake) साठाही कमी आहे. त्यामुळं चालू वर्षात चीनची सोयाबीन आयात वाढण्याचा अंदाज आहे. याचा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराला (Soybean Market) आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
जागतिक शेती व्यापारात चीनचं स्थान महत्त्वाचं आहे. जगातील सगळ्यात मोठी शेतीमाल बाजारपेठ चीन आहे. जगातील सगळ्यात जास्त लोक चीनमध्ये राहत असल्यामुळे शेतीमालाचा वापरही मोठा होतो. जागतिक शेतीमाल बाजारपेठे चीनच्या मागणीवर अवलंबून आहे.
सोयाबीन बाजारावरही चीनच्या मागणीचं वर्चस्व आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोयाबीनचा सर्वाधिक वापर करणार देश म्हणून चीनचा वेगळाच दबदबा आहे. मात्र मागील दोन वर्षे चीनला कोरोनाचा मोठा फटका बसला. त्यामुळं चीनकडून सोयाबीनची आयातही कमी झाली होती.
चीन सोयापेंडची थेट आयात करणं टाळतो. त्याऐवजी सोयाबीनची आयात करून देशातच गाळप करून सोयापेंड आणि सोयातेल तयार केले जाते. चीनची सोयाबीन आयात २०२२ मध्ये २०२१ च्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी घटली.
मागील वर्षी चीनने ९१० लाख टन सोयाबीन आयात केले होते. तर २०२१ मधील आयात जवळपास ९६० लाख टनांवर पोहोचली होती. कोरोनामुळे मागील वर्षात म्हणजे २०२२ मध्ये चीनची सोयाबीन आयात घटल्याचे तेथील सरकारने स्पष्ट केले होते.
मगील वर्षात चीनला सोयाबीन वाहतुक आणि पुरवठा साखळीत अनेक अडचणी आल्या होत्या. तसंच व्यापारातही अडथळे होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याने चीनमधील प्रक्रियादार अडचणीत आले होते.
दुसरीकडे पोल्ट्री आणि वराहपालन उद्योगातून सोयापेंडला उठाव कमी होता. परिणामी सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाले. काही उद्योगांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळं अनेक गाळप प्लांट्स बंद पडले होते. या सर्व घटकांचा परिणाम चीनच्या सोयाबीन मागणीवर झाला. त्यामुळं २०२२ मधील चीनची सोयबीन आयात घटली.
डिसेंबरमध्ये विक्रमी आयात
मागील वर्षभरात चीनची सोयाबीन आयात कमी राहिली. मात्र डिसेंबरमध्ये चीनने विक्रमी आयात केली. डिसेंबरमध्ये जवळपास १०५ लाख ६० हजार टन सोयाबीन आयात झाली. २०२१ च्या डिसेंबरच्या तुलनेत ही आयात तब्बल १९ टक्क्यांनी अधिक होती. तर जून २०२१ नंतर एका महिन्यातील सर्वाधिक आयात होती.
यंदा आयात वाढणार
चीनमध्ये गेल्या वर्षी पशुखाद्यात सोयापेंडचा वापर एक टक्क्याने कमी राहिल्याचा अंदाज आहे. चीनचे नवीन वर्ष २१ जानेवारीपासून सुरु होते. नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. त्यामुळे पोल्ट्री आणि वराहपालन उद्योगातून सोयापेंडला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.
तसेच सध्या चीनमध्ये सोयापेंडचा साठा ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला आहे. तर कोरोना निर्बंध तब्बल तीन वर्षांनंतर शिथिल होत आहेत.
त्यामुळे २०२३ मध्ये चीन सोयाबीनची आयात वाढवू शकतो. याचा आधार सोयाबीन बाजारालाही मिळेल. सोयाबीनच्या दरवाढीला त्यामुळे मदत होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.