
१) सोयाबीन दरात काहीशी घट (Soybean Rate Market)
देशातील सोयाबीन बाजारावरील दबाव आजही कायम होता. आज काही बाजारांमध्ये सोयाबीन दर कमी झालेले पाहायला मिळाले. आज सोयाबीनची सरासरी दरपातळी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होती.
तर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कायम आहे. देशातून सोयापेंड निर्यातही वाढली. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ कायम राहिल्यास देशातील सोयाबीनचे दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापसावरील दबाव कायम (Cotton Market Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आणि हजर बाजारातील दर काहीसे नरमले होते. तर देशातील काही बाजारांमध्येही कापूस दरात थोडी घट झाली होती.
मात्र कापसाची सरासरी दरपातळी कायम होती. कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. कापसाचे दर सध्या दबावात असले तरी दरवाढीस पोषक स्थिती असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.
३) गाजराला मागणी टिकून
राज्यातील बाजारात सध्या गाजराची आवक कमी आहे. त्यामुळे गाजराला सध्या चांगला दर मिळत आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता दैनंदिन आवक २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. पण गाजराला उठाव चांगला आहे.
त्यामुळे सध्या गाजराला सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गाजराचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) ज्वारीचे दर तेजीतच (Jwari Market Rate)
देशात यंदा ज्वारीचे उत्पादन घटले. तर ज्वारीला चांगला उठाव आहे. त्यामुळे सध्या ज्वारीला भाव मिळत आहे. ज्वारी उत्पादक पट्ट्यातील बाजार आणि पुणे, मुंबईसह मोठ्या बाजारांमधील आवक काहीशी अधिक आहे.
मात्र इतर बाजारांमधील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे सध्या ज्वारीला सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. ज्वारीचे दर पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
५) तांदळाचे उत्पादन नेमके का कमी झाले? (Rice Producer)
जागतिक पातळीवर मागील दोन महिन्यांमध्ये तांदळाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आशियातील देशांमध्ये उत्पादन घटल्याचा परिणाम तांदूळ दरावर (Rice Rate) जाणवत आहे. यंदा भारतात तांदूळ उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस झाला.
यामुळं उत्पादन घटलं. तर पाकिस्तानमध्ये पूराने भात पिकाचं नुकसान केलं. चीनमध्येही पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादन घटले. तर थायलंड आणि व्हिएतनाममध्येही भात पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसला.
यामुळे यंदा जागतिक तांदूळ उत्पादनात २.७ टक्क्यांनी घट येण्याचा अंदाज आहे. यंदा ५ हजार ११६ लाख टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज आहे. तर तांदळाचा वापर ५ हजार १९५ लाख टनांवर होईल. जागतिक पातळीवर तांदळाचा मागिल हंगामातील शिल्लक साठा असला तरी दरवाढ कायम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दरानं २०११ नंतरचा विक्रमी दर गाठला, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात थाडलंडच्या तांदळाचे भाव प्रतिटन ५०० ते ५२३ डाॅलरवर आहेत.
तर भारताचा तांदूळ ३९५ ते ५०० डाॅलर प्रतिटनानं मिळतोय. भारत आणि थायलंड हे सध्या तांदूळ निर्यातीत महत्वाचे देश आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे दर वाढल्यामुळे देशातही तांदूळ भाव खाण्याची शक्यता तांदूळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.