Cotton Rate : कापूस उत्पादनवाढीचा अंदाज किती खरा?

देशात यंदा कापसाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसलाय. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचा खंड, गुलाबी बोंड अळी आणि इतर कीड-रोग यामुळे शेतकरी जेरीस आलेत. पण कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र देशातील कापूस पिकाची स्थिती सध्या चांगली असून कापूस उत्पादन मागील वर्षीपेक्षा वाढेल, असा दावा केलाय.
Cotton
Cotton Agrowon

सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा

सोयाबीनचे दर (Soybean Rate) सध्या दबावात आलेत. मात्र मंगळवारी सोयाबीन दरात सोमवारच्या तुलनेत क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली. सध्या बाजारातील आवक (Soybean Arrival) नगण्य आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार सोयाबीनचा पेरा (Soybean Sowing) गेल्या वर्षीपेक्षा काहीसा घटलाय. पिकाचं पावसामुळे नुकसानही झालंय. मात्र मागणी सामान्य राहिल्यानं दर दबावात आल्याचं जाणकारांनी सांगितलं. तर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपाने (SOPA) सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असून उत्पादनही चांगलं येईल, असा अंदाज व्यक्त केलाय. त्याचाही परिणाम दरावर जाणवतोय, असंही जाणकारांनी सांगितलं.

गाजराचे दर टिकून राहण्याचा अंदाज

सध्या गाजराला चांगला दर (Carrot Rate) मिळतोय. गणपती उत्सवामुळे गाजराला उठाव मिळतोय. तर बाजारातील आवक कमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अतिपाऊस आणि नंतरच्या टप्प्यात कमी पाऊस, यामुळं उत्पादनावर परिणाम झालाय. परिणामी राज्यातील मोठ्या बाजार समित्या सोडल्या तर आवक नगण्य आहे. सध्या गाजराला २ हजार ५०० रुपये ते ३ हजार ८०० रुपये दर मिळतोय. पुढील काळातही गाजराला मागणी कायम राहील. त्यामुळं गाजराचा दरही टिकून असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton
Monsoon Bulletin: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज

साखरेची दोन टप्प्यात निर्यात होणार

यंदाच्या हंगामासाठी साखर निर्यातीच्या (Sugar Export) हालचाली सुरू झाल्या आहेत. या हंगामासाठी साखरेचा कोटा (Sugar Quota) ठरवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. यंदा दोन टप्प्यांत साखर निर्यातीला परवानगी देण्याचे नियोजन सरकारनं केलंय. केंद्र सरकार नवीन साखर हंगामात (Sugar Season) ७० ते ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. पण सरकार पहिल्या टप्प्यात ४० ते ५० लाख टन आणि दुसऱ्या टप्प्यात उरलेली साखर निर्यात करण्याची परवानगी देईल, असाही कयास लावला जातोय. निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास देशातील साखरेचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

केळीचे दर दबावातच

बाजारात केळीची आवक (Banana Arrival) सध्या कमी होतेय. केळीला गणपतीमुळे चांगली मागणी (Banana Demand) आहे. मात्र दरात अद्यापही वाढ झालेली नाही. केळीला सध्या ८०० रुपये ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हंगामाच्या सुरुवातीला केळी २२०० रुपयांपर्यंत विकली जात होती. मात्र मागणी नसल्याच्या कारणास्तव व्यापाऱ्यांनी दर कमी केले. सध्याच्या दरात केळीचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं. इतर राज्यातील केळी बाजारात येत असल्यानं आवकेचा दबाव आहे. मात्र केळीची आवक कमी झाल्यानंतर दर सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton
Amla Processing : आवळा कॅन्डी कशी तयार कराल?

कापूस उत्पादनवाढीचा अंदाज किती खरा?

देशातील काही बाजारांमध्ये नव्या कापसाची (New Cotton) आवक सुरु झाली आहे. मात्र आवकेचा दबाव ऑक्टोबर महिन्यापासून वाढण्याची शक्यता आहे. सध्या नव्या कापसाला ९ हजार ते १० हजार रुपये (Cotton Rate) प्रतिगाठी दर मिळतोय. यंदा देशातील कापूस लागवड (Cotton Sowing) गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ७ टक्क्यांनी वाढलीय. मात्र देशातील महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसतोय. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचा खंड यांचा सामना करावा लागला. तसेच पिकावर कीड-रोगांचा मोठा प्रादुर्भाव झालाय. देशातील अनेक भागांत गुलाबी बोंडअळीनं डोकं वर काढलंय. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत कापूस पिकाचं नुकसान होत आहे. परंतु काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीएआयने मात्र देशातील कापूस उत्पादन (Cotton Production) यंदा वाढेल, असा अंदाज व्यक्त केलाय. सीएआयचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी कापूस पिकाची स्थिती चांगली असल्याचं म्हटलंय. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही तर ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज गणात्रा यांनी व्यक्त केला. एक कापूस गाठ १७० किलोची असते. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असंही गणात्रा यांनी सांगितलं. यंदा उत्पादन वाढेल मात्र मागणी कमी राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. जागतिक मंदीची शक्यता आणि कपड्यांना मागणी घटल्यानं कापसाचा वापर कमी होऊ शकतो, असं व्यापारी आणि उद्योगाचं म्हणणं आहे. त्यामुळं कापसाचा दर कमी झाल्याचा दावाही केला जातोय. कापूस खंडीचे दर १ लाख रुपयांवरून आता ९३ हजारांवर आले आहेत. असं असलं तरी ऑक्टोबरमधील पाऊस आणि वातावरण तसंच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा राहतो, यावर कापसाचा बाजार अवलंबून राहील, असं जाणकारांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांतला अनुभव पाहता नवीन हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर कापसाचं उत्पादन चांगलं राहण्याचा अंदाज जाणीवपूर्वक दिला जातोय. जेणेकरून बाजारावर दबाव येऊन दर नरमतील आणि शेतकरी कमी भावात कापूस विकण्याची घाई करतील. गेल्या वर्षी मात्र शेतकऱ्यांनी हा डाव ओळखून माल रोखून धरत चांगलाच शह दिला. यंदाही शेतकऱ्यांना सावध राहून कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com