Cotton Production : महाराष्ट्रामुळं वाढणार देशातल कापूस उत्पादन?

देशातील काही राज्यांमध्ये पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. मात्र गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस पिकाची स्थिती चांगली आहे असं सांगत या दोन्ही राज्यातील उत्पादन वाढीमुळे देशातील एकूण उत्पादनात वाढ होईल, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

नवं सोयाबीन दबावात

1. राज्यात सध्या सुरु असलेल्या पावसानं सोयाबीनचं नुकसान होतंय. काढणीला आलेलं पीक पावसात भिजल्यानं १५ ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा येतोय. त्यामुळं नव्या सोयाबीनला ४ हजारांपासून दर मिळतोय. देशभरात सरासरी ४ हजार ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान नवं सोयाबीन विकलं जातंय. तर जुन्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. नवं सोयाबीन वाळवून ओलावा कमी झाल्यानंतर विकल्यास शेतकऱ्यांना किमान सरासरी ५ हजार रुपये दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Cotton Production
Soybean Rate : सोयाबीन बाजारात काय घटतंय ?

तुरीचे दर टिकून

2. देशात सध्या कडधान्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळं डाळिंचे दर काहीसे सुधारले आहेत. मात्र सरकार मागील वर्षभरापासून कडधान्याचे दर कसे नियंत्रणात ठेवता येतील, याची खबरदारी घेतंय. आता तूर आणि उडदाची टंचाई जाणवत आहे. दरवाढीच्या आशेने व्यापारी आणि प्रक्रियादार आल्याकडील साठा बाहेर काढत नाहीत. मात्र त्यांच्याकडील साठा बाहेर काढण्यासाठी सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय. सध्या देशात तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

Cotton Production
Tur Rate : तुरीचे दर आणखी वाढणार का?

सिताफळ आवक वाढतेय

3. राज्यातील सिताफळाचा हंगाम आता सुर झालाय. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये सिताफळाची आवक वाढतेय. मात्र राज्याच्या बहुतांशी भागात मागील काही दिवस पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळं सिताफळाचं मोठं नुकसान झालं. पण सिताफळाचे दर अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. सध्या सिताफळाला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर दर्जेदार सिताफळाचे दर सरासरी ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सिताफळाचे हे दर आवक वाढल्यानंतरही टिकून राहू शकतात, असा अंदाज सिताफळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

दिवाळीतही हरभरा दर कमीच

4. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना दिवाळीच्या काळात हरभरा दरात सुधारणा होण्याची शक्यता होती. कारण दिवाळीच्या काळात हरभरा डाळ आणि बेसनला मागणी असते. मात्र सरकारनं बफर स्टाॅकमधील हरभरा विक्री सुरुच ठेवली. तसचं या हरभऱ्याचे दर कमी होते. त्यामुळं खुल्या बाजारात सुरुवातीपासूनच हरभरा दर दबावात राहीले. सध्या हरभऱ्याला ४ हजार ३०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हरभरा दरात लगेच वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

महाराष्ट्रामुळं वाढणार देशातल कापूस उत्पादन?

5. देशात सप्टेंबर महिन्यापर्यंत विविध राज्यांमध्ये पाऊस आणि किड-रोगानं कापूस पिकाला फटका (Cotton Crop Damage) बसला होता. मात्र तरीही सप्टेंबरपर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयनं (Cotton Association Of India) यंदा कापूस उत्पादन (Cotton Production) गेल्यावर्षीपेक्षा जास्त होईल, असा अंदाज व्यक्त केलाय. १ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या हंगामात ३४४ लाख गाठी कापूस उत्पादन होईल. विशेष म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस चांगला आल्यानं देशातील कापूस उत्पादन वाढेल, असं सीएआयनं म्हटलंय.

महाराष्ट्रातील कापूस उत्पादन जवळपास १३ टक्क्यांनी सुधारेल. तर गुजरातच्या उत्पादनात २० टक्क्यांची वाढ होईल. या दोन्ही राज्यांतील उत्पादन वाढीमुळंच देशातील कापूस उत्पादन वाढणार आहे, असंही सीएआयनं आपल्या अंदाजात म्हटलंय. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलाय. अनेक भागांमध्ये पिकाचं होत्याचं नव्हतं झालं. कापसाच्या वाती झाल्या, बोंडं सडली, कापूस गळून पडला. त्यामुळं कापूस उत्पादनात घट झाली. इतर राज्यांमध्येही हीच स्थिती आहे. त्यामुळं सीएआयचा अंदाज चुकणार असल्याचं शेतकरी सांगतात. सध्या कापसाला देशभरात सरासरी ७ हजार ते ९ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान मिळतोय. सध्या कापसाला उठाव कमी असल्यानं दर काहीसे दबावात आहेत. मात्र पुढील काळात शेतकऱ्यांना किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com