Palm Oil : जागतिक बाजारात पामतेलाची घसरगुंडी

जागतिक बाजारपेठेत पामतेलाची घसरगुंडी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी किमती थोड्या वाढल्या होत्या. परंतु शिल्लक साठ्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच पुढचा उत्पादन हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर पामतेलाचे व्यवहार होत आहेत. (Palm Oil Rate In Global Market)
Palm Oil
Palm OilAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

गहू निर्यातबंदीवरून भारतावर पुन्हा टीकेची झोड

1. जी-७ देशांनी पुन्हा एकदा भारताच्या गहू निर्यातबंदीच्या (Wheat Export Ban) निर्णयावर टीका केलीय. भारताच्या भुमिकेमुळे जागतिक अन्न बाजारातील (Global Food Market) खडखडाट आणखीनच वाढला, असं या देशांनी म्हटलंय. अमेरिका, युरोपीयन युनियन, इंग्लंड, जपान, कॅनडा आदी देशांनी भारतावर हल्लाबोल केलाय. ही निर्यातबंदी खरोखरच गरजेची होती का, याबद्दल या देशांनी संशय व्यक्त केलाय. अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजे यूएसडीए आणि इतर जागतिक संस्थांनी भारतातील गहू उत्पादनाबद्दल अंदाज दिला होता. त्यानुसार १०० दशलक्ष टन गहू उत्पादनाची शक्यता आहे. २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या काळात भारताचं सरासरी गहू उत्पादन ९६ दशलक्ष टन राहिलंय, असं या देशांचं म्हणणं आहे. भारताने मे महिन्यात रातोरात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे घटलेलं उत्पादन आणि स्थानिक बाजारातील वाढत्या किमती याचं कारण त्यासाठी दिलं होतं.

Palm Oil
पावसाच्या पाण्यामुळे चाळीतील २१ ट्रॉली कांदा वाहून गेला

बफर स्टॉकसाठी ५२ हजार टन कांदा खरेदी

2. केंद्र सरकारकडून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी सुरू आहे. नाफेडकडून यंदा आतापर्यंत ५२ हजार ४६० टन कांदा खरेदी करण्यात आला. तुटवड्याच्या काळात कांद्याचे दर स्थिर राहावेत, म्हणून सरकार बफर स्टॉक करत असतं. सरकारने यंदाच्या हंगामात अडीच लाख टन रबी कांदा खरेदीचं टार्गेट ठेवलंय. पुढील महिन्यापर्यंत ते गाठलं जाईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्या हंगामात बफर स्टॉकसाठी सुमारे दोन लाख टन कांदा खरेदी केला होता.

Palm Oil
नगरला टोमॅटो, बटाट्याच्या आवकेत वाढ

मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी

3. नगर व पुणे भागात सध्या टोमॅटोचा हंगाम सुरू आहे. संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, पुणे या बाजार समित्यांत दररोज सरासरी दोन ते तीन हजार क्विंटल आवक होतेय. २० किलोच्या क्रेटला ३०० ते ११०० रूपये दर मिळतोय. मागणीच्या तुलनेत मालाची आवक कमी आहे. यंदा कडक उन्हामुळे टोमॅटोचं उत्पादन घटलंय. हवामानातील तीव्र बदलांमुळे गेल्या काही हंगामांत टोमॅटोची उत्पादकता घसरलीय. दुसऱ्या बाजुला प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढलीय. तसेच बांगलादेश, नेपाळ, दुबई, मलेशिया या देशांतून टोमॅटोला वाढती मागणी आहे.

Palm Oil
Wheat Export Ban: गहू निर्यातबंदीवरून भारतावर बड्या देशांची टीका

दोन वर्षांच्या मंदीनंतर आल्याच्या भावात सुधारण

4. मागच्या दोन वर्षांच्या मंदीनंतर आल्याच्या भावात सुधारणा झाली आहे. आले सध्या प्रति क्विंटल तीन हजार रूपयांच्या पातळीवर पोहोचलंय. अतरिक्त उत्पादन, लॉकडाऊन यामुळे आल्याचे दर पडले होते. आठशे ते नऊशे रूपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना आले विकावे लागले. आले या पिकामध्ये दोन-अडीच वर्षे मंदी आणि दीड-दोन वर्षे तेजी अशी सायकल किंवा चक्र असतं, असं जाणकार शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी प्राईस पॅटर्नवर नजर ठेऊनच आल्याची शेती केली पाहिजे, असा त्यांचा सल्ला आहे. आले उत्पादनात मध्य प्रदेश, कर्नाटक, आसामच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक लागतो.

जागतिक बाजारात पामतेलाची घसरगुंडी

5. जागतिक बाजारपेठेत पामतेलाची (Palm Oil Rate In Global Market) घसरगुंडी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी किमती थोड्या वाढल्या होत्या. परंतु शिल्लक साठ्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच पुढचा उत्पादन हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर पामतेलाचे व्यवहार होत आहेत. पामतेलाचा जागतिक पुरवठा वाढलाय. तर मलेशियातून निर्यात होणाऱ्या पामतेलाची मागणी घटलीय. दुसऱ्या बाजुला इंडोनेशिया पामतेलाची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय. २४ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार इंडोनेशियाने १७ लाख टन पामतेल निर्यातीसाठी परवानगी दिलीय.

भारत हा पामतेलाचा मोठा खरेदीदार देश आहे. परंतु इंडोनेशियाने मे महिन्यात पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली. पामतेलाचे भाव आभाळाला भिडले. त्यामुळे केंद्र सरकारने पामतेलाऐवजी सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढवली. या तेलाच्या आयातीवरचं शुल्क काढून टाकलं. दोन वर्षांसाठी प्रत्येकी २० लाख टन सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयात करण्याची परवानगी दिली. थोडक्यात भारताची पामतेल खरेदी घटली. मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातील पामतेलाचा साठा १६ टक्क्यांनी घटला. चीनकडून पामतेलाची मर्यादीत खरेदी होतेय. तर पाकिस्तानकडून पामतेल खरेदी घटलीय. या सगळ्या घडामोडींमुळे पामतेलाच्या किमतींत घसरण सुरूय. पंरतु भारत आणि पाकिस्तानकडून ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पामतेलाची मागणी वाढेल, असा बाजारविश्लेषकांचा अंदाज आहे.

मॉन्सूनची स्थिती कशी राहील यावरही अनेक गणितं अवलंबून आहेत. तसंच सध्या मोठ्या जहाजांची कमतरता आहे. त्यामुळेही पामतेल खरेदीसाठी हात आखडता घेतला जातोय. इंडोनेशियाने पामतेलाची निर्यात बंद केल्यानंतर पामतेलासाठी वापरली जाणारी जहाजं क्रुड ऑईलच्या वाहतुकीसाठी वापरली जाऊ लागली. थोडक्यात आणखी दीड-दोन महिने तरी पामतेलाच्या दराला फोडणी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com