रशियाच्या आडमुठेपणामुळे गव्हात तेजीचा भडका

रशियाने काळ्या समुद्रातून होणारी शेतीमालाची निर्यात सुरळीत करण्याचा शब्द दिला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र रशियाने युक्रेनमधील मायकोलाईव बंदरावर हल्ला केला. त्यामुळे रशियाच्या भुमिकेबद्दल संशय बळावला. जगभरात गव्हाच्या दरात मोठी तेजी आली.
रशियाच्या आडमुठेपणामुळे गव्हात तेजीचा भडका
Wheat ExportAgrowon

आजचं मार्केट बुलेटिनः दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी.

प्रेषित मोहम्मद वाद शेतकऱ्यांच्या मुळावर

भाजपच्या निलंबंत प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपचे बडतर्फ दिल्ली मिडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये (Arabian Country) संतापाची लाट उसळलीय, हे तुम्हाला ठाऊकच असेल. या देशांशी भारताचे गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ट व्यापारी संबंध आहेत. या वादामुळे हा व्यापार अडचणीत आला आहे. भारतातील उत्पादनांवर (Boycott Indian Product) बहिष्कार घालण्याचं आवाहन या देशांमध्ये केलं जात आहे. आखातातील देशांमध्ये शेती फारशी होत नाही. त्यामुळे त्यांना ८५ टक्के अन्न आणि ९३ टक्के तृणधान्य आयात (Cereal Import) करावं लागतं. भारताचा त्यामध्ये मोठा वाटा आहे. भारत या देशांना तांदूळ, म्हशीचे मांस, मसाले, सागरी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि साखर निर्यात (Sugar Export) करतो. फक्त संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईबरोबर भारताचा द्विपक्षीय व्यापार ७२.९ बिलियन डॉलरचा आहे. तो २०२६ पर्यंत १०० बिलियन डॉलरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

चिकन निर्यातीसाठी भारताला मोठी संधी

भारताला आग्नेय आशियातील देशांमध्ये विशेषतः सिंगापूरला चिकन निर्यात करण्याची संधी मिळाली आहे. परंतु भारताला त्याचा फायदा घेता येईल का यावरून देशातील पोल्ट्री क्षेत्रामध्ये दोन गट पडले आहेत. मलेशियात चिकन खूप महाग झालंय. चिकनच्या किमती कमी करण्यासाठी मलेशियाने चिकन निर्यातीवर गेल्या आठवड्यात बंदी घातली. त्यामुळे सिंगापूरसारख्या देशांची मोठी अडचण झालीय. भारताने या संधीचा फायदा उठवत निर्यातीच्या बाजारपेठेत उतरावं, असं काहींचं म्हणणे आहे. तर भारतात चिकन उत्पादनाचा खर्च खूप जास्त आहे, तसेच चिकनवर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा नाहीत, भारतातील चिकन अनेक देशांमध्ये स्वीकारलं जात नाही त्यामुळे ही संधी आपल्याला फारशी उपयोगाची नाही, असं पोल्ट्री क्षेत्रातील दुसरा गट म्हणतोय.

हरभऱ्याच्या सरकारी खरेदीत सहा पट वाढ

यंदा हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्याने सरकारी खरेदी तब्बल सहा पट वाढली. केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्च ते मे या कालावधीत हमीभावाने ४.११ लाख टन हरभरा खरेदी केला होता. यंदा मात्र याच कालावधीत खरेदी सुमारे २३ लाख टनावर गेली आहे. राजस्थानमध्ये हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. तर महाराष्ट्रात एकदा मुदतवाढ देऊन लगेचच खरेदी बंद करण्यात आली. मध्य प्रदेशात सर्वाधिक सुमारे ८ लाख टन हरभरा खरेदी करण्यात आला. त्या खालोखाल महाराष्ट्रातला आकडा सुमारे ६ लाख टन इतका आहे. गुजरातमध्ये सुमारे साडे पाच लाख टन आणि सगळ्यात कमी राजस्थानमध्ये सुमारे १ लाख टन हरभरा खरेदी करण्यात आला. यंदा सरकारी खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सरकार लवकरच रेशन दुकानांतून हरभरा वाटप सुरू करेल, अशी चर्चा आहे.

तांदूळ निर्यातीसाठी करारांचा धडाका

केंद्र सरकारने अचानक रातोरात गहू निर्यातबंदी केल्याच्या अनुभवातून धडा घेत तांदूळ निर्यातदार सावध झाले आहेत. तांदळाचीही निर्यात बंद केली जाईल, अशा बाजारगप्पा रंगल्या आहेत. त्यामुळे निर्यातदारांनी तांदूळ निर्यातीचे करार करण्याचा धडाकाच लावलाय. पुढच्या तीन-चार महिन्यांचं बुकिंग जोरात सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल दहा लाख टन तांदूळ निर्यातीचे करार झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच ९६ लाख टन तांदूळ देशाबाहेर पाठवण्यात आलाय. यंदा देशात तांदळाचं विक्रमी उत्पादन झालंय. त्यामुळे निर्यात वाढूनही बाजारात दर काही सुधारले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळाला नाही.

रशियाच्या आडमुठेपणामुळे गव्हात तेजीचा भडका

रशियाच्या आडमुठेपणामुळे जगभरात गव्हाच्या दरातील तेजीचा आणखी भडका उडाला आहे. युक्रेन जगाला गहू, सूर्यफुल तेल आणि इतर शेतमालाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करतो. परंतु रशियाशी युध्द सुरू झाल्यामुळे युक्रेनमधली शेतीमाल निर्यात थंडावली आहे. त्यामुळे जगभरात अन्नधान्य टंचाईचं संकट आ वासून उभं आहे. युक्रेनमधील अनेक बंदरं रशियाच्या ताब्यात आहेत. तर काही बंदरं रशियाच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे रशियाने सामंजस्याची भूमिका घेतली तर अन्नधान्य निर्यातीचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. रशियानेही त्याला होकार दिला. त्यानुसार असं ठरलं की रशिया काळ्या समुद्रातून होणारी शेतीमालाची निर्यात सुरळीत करण्यासाठी मदत करेल. परंतु प्रत्यक्षात मात्र रशियाने युक्रेमधील मायकोलाईव बंदरावर हल्ला केला. त्यामुळे रशियाच्या भुमिकेबद्दल संशय बळावला आहे. या घडामोडींचा परिणाम म्हणून सोमवारी (ता. ७) जगभरातील बाजारपेठांमध्ये गव्हाचे दर वाढले. रशियाने युक्रेनच्या दोन गोदामांवर रॉकेटचा मारा केला.

रशियाची ही चाल आणि जागतिक पातळीवर तुटवड्याची स्थिती यामुळे गव्हाच्या दरात तेजी आलीय. फ्रान्समध्ये दुष्काळ पडल्यामुळे आगीत आणखी तेल ओतलं गेलंय. अमेरिकेतील शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडिंग म्हणजे सीबॉटवर गव्हाच्या फ्युचर्स दरात वाढ झाली. फ्रान्समध्ये दुष्काळाच्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळं तिथं गव्हाच्या उत्पादनात किती घट होणार, याची चिंता सतावते आहे. युरोपमध्ये होणारा गव्हाचा पुरवठा त्यामुळे आक्रसला आहे. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात मात्र मोठी गारपीट झाली. गव्हाच्या शेतात टेनिस बॉलच्या आकाराच्या गारा पडल्या. त्यामुळेही पिकाचं मोठं नुकसान झालंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com