एफआरपीची थकबाकी यंदा कमी!

राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप केले. यंदाचा हंगाम सरासरी १७३ दिवस चालला. यामुळे साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली.
एफआरपीची थकबाकी यंदा कमी!
Sugar Cane FRPAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

भारताच्या कडधान्य आयातीत ९.४४ टक्के वाढ

केंद्राने कडधान्य आयतीसाठी (Cereals Import) पायघड्या घातल्या. त्यामुळं २०२१-२२ च्या हंगामात कडधान्य आयत साडेनऊ टक्क्यांनी वाढली. २०२०-२१ मध्ये एकूण आयात २४ लाख ६६ हजार टन झाली होती. तर २०२१-२२ मध्ये २६ लाख ९९ हजार टनांवर आकडा पोचला. त्यामुळं चालू वर्षातही कडधान्य आयात २५ ते २६ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तूर, मूग आणि उडिद या महत्वाच्या कडधान्य आयातीत दुपटीने वाढ झाली होती. तुरीची आयात ४.४२ लाख टनांवरून ८.४० लाख टनांवर पोहचली. तसेच उडदाची आयात ३.४४ लाख टनांवरून ६.११ लाख टन आणि मूग आयात ८१ हजार टनांवरून १.९५ लाख टनांवर पोहचली. या आयातीमुळे या पिकांचे दर बाजारात पडले. हमीभावापेक्षा या पिकांना एक हजारांपर्यंत कमी दर मिळत आहे.

मलेशियाच्या पामतेल उत्पादनात मे महिन्यात घट

इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी (Palm Oil Export Ban) केल्यानंतर भारताला मलेशियाचा आधार मिळाला. भारताने मलेशियाकडून पामतलेची खरेदी (Palm Oil Procurement) वाढवली होती. याचा फायदा मलेशियालाही झाला. कारण येथील पामतेलाचे दर (Palm Oil Rate) वाढले होते. परंतु तेल मिळल्याने भारतात पुरवठा काहीसा वाढला. परंतु मे महिन्यात मलेशियातील पामतेल उत्पादन घटले. गेल्यावर्षी मे महिन्यात १५ लाख ७० हजार टन उत्पादन झाले होते. ते यंदा १४ लाख ६० हजार टनांपर्यंत घसरले. ही घट गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी होती, असे येथील जाणकारांनी सांगितले. सध्या पामतेलाचे दर तेजीत आहेत. अशा परिस्थितीत येथे उत्पादन घटल्याने दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाल्यास भारतातही खाद्यतेलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात हरभरा उत्पादन ४३ टक्के घटण्याचा अंदाज

जागतिक पातळीवर हरभरा उत्पादनात ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया ब्युरो ऑफ अॅग्रीकल्चरल अॅन्ड रिसोर्स इकाॅनाॅमिक्स अॅन्ड सायन्स अर्थात अबॅरेस या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार येथे यंदा हरभरा लागवड २८ टक्क्यांनी घटली. मागील हंगामात ६ लाख १६ हजार हेक्टरवर हरभरा होता. तर यंदा ४ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी घटल्याने उत्पादनही तब्बल ४३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात १०६२ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदा ६ लाख ६ हजार टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. सर्वांत मोठ्या निर्यातदार देशांत उत्पादन घटल्याचा फायदा भारताला होऊ शकतो. देशातून निर्यात वाढल्यास बाजारभावालाही आधार मिळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

देशात यंदा कापूस लागवड वाढण्याची शक्यता

चालू हंगामात कापसाला ११ वर्षांतील विक्रमी दर मिळत आहे. देशभरात सध्या कापसाला १० हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाला चांगला दर मिळाल्याने इतर पिकांकडील शेतकरी कापसाडे वळत आहेत. विशेषतः शेतकरी कडधान्य लागवड कमी करून कापशीला प्राधान्य देत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत कापूस लागवड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरिपातील कापूस लागवड हंगाम आत्ताच सुरु झाला. यात कापूस लागवडीचे क्षेत्र वाढल्याचे त्या त्या राज्यांच्या कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे देशभरातील कापूस लागवड यंदा वाढेल. परंतु पुढील काळातील पाऊस, किड-रोग यावर उत्पादन अवलंबून असेल. यंदाच्या हंगामातही कापसाला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

एफआरपीची थकबाकी यंदा कमी!

राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप (Record Sugarcane Crushing) केले. यंदाचा हंगाम सरासरी १७३ दिवस चालला. यामुळे साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली. यातून शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पोटी ४२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यंदा २०० साखर कारखान्यांनी एकूण १३२० लाख टन उसाचे गाळप केले. यातून १३७ लाख टन साखर उत्पादन झाले. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४० टक्के राहिला. जास्तीत जास्त गाळप दिवस २४०, तर किमान गाळप दिवस ३६ चालले. यंदा २४.७५ लाख टन ऊसगाळप करीत माढा येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मान मिळविला. राज्यात वर्षाला इथेनॉल तयार करण्याची क्षमता आता २६४ कोटी लिटर्सपर्यंत गेली. सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांनीही नवे आसवनी प्रकल्प उभारले किंवा विस्तारीकरण केले आहे. कारखान्यांनी इथेनॉल पुरवताच २१ दिवसांत तेल कंपन्यांकडून पेमेंट होते. एकूण इथेनॉल प्रकल्प ११२ असून निर्मिती २०६ कोटी लिटर्सपर्यंत झाली आहे. कारखान्यांनी यंदा इथेनॉलमध्ये ९ हजार कोटींची उलाढाल केली. सहविजेत सहा हजार कोटींची, तर मद्यनिर्मितीतून १२ हजार कोटींची उलाढाल केली. कारखान्यांनी आतापर्यंत ३७ हजार कोटींपेक्षा जास्त एफआरपी शेतकऱ्यांना दिली. मात्र १८६९ कोटी रुपये थकीत असून, ही टक्केवारी अवघी ४.७२ आहे. यंदा एफआरपी वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे, असे कारखान्यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com