
१) सोयाबीन दरात नरमाई (Soybean Rate)
सोयाबीनच्या बाजारात सध्या नरमाई दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सायोपेंडचे वायदे कमी झाले. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.९० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४४९ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता.
तर देशातील बाजारातही दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची नरमाई आली. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळतोय.
सोयाबीन बाजारातील ही नरमाई जास्त दिवस राहणार नाही. दरात पुढील काळता सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) कापसात चढ उतार सुरुच (Cotton Rate)
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आज नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळाला.
देशातील बाजारात सध्या कापूस आवक अधिक आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये आवकेचा दबाव कमी होऊ शकतो. त्यामुळं दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
३) ढोबळी मिरची झाली कवडीमोल (Shimala Chilli)
देशातील बहुतांशी राज्यांमध्ये सध्या ढोबळी मिरचीचे दर घसरले. पंजाब आणि हरियानात यंदा काही शेतकऱ्यांनी गहू आणि भाताऐवजी इतर पिकं घेतली. त्यात भाजीपाला पिकांचा समावेशही आहे. ढोबळी मिरची आता बाजारात आली पण त्याला उठाव नाही.
ढोबळी मिरचीला अगदी १०० रुपये क्विंटलपासून दर मिळतोय. तर सरासरी दरपातळी ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील आवक अधिक असल्यानं पुढील काही दिवस ही स्थिती दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) पपईला उठाव वाढला (Papaya Rate)
उन्हाचा चटका चांगलाच वाढला. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये दुपारचं तापमान आता असह्य होतंय. उन्हामुळं सध्या रसाळ फळांना मागणी वाढली. पपईलाही चांगला उठाव आहे.
त्यामुळं पपईचे दरही तेजीत आहेत. सध्या पपईला प्रतिक्विंटल १२०० ते १७०० रुपये भाव मिळतोय. पुढील काळातही पपईला चांगला उठाव राहण्याची शक्यता असून दरही कायम राहतील, असा अंदाज आहे.
५) तूर आणि हरभरा आयातीचं चित्र कसं राहीलं? (Tur, Chana Market)
देशात सध्या तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. तर बाजारात हरभरा आणि मसूरची आयात सुरु आहे. सध्या हरभरा आणि मसूर हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहे. पण निम्म्या अधिक कडधान्याचे भाव तेजीत असल्यानं सरकारचा जोर आयातीवर आहे.
पण २०२२-२३ च्या हंगामात भारताची कडधान्य आयात कमी झाली आहे. उडीद, हरभरा आणि राजमा आयात कमी झाली. तर तूर आणि मसूरची आयात वाढली होती. २०२२-२३ मध्ये तुरीची ८ लाख ७५ हजार टन आयात झाली होती. तर २०२१-२२ मधील आयात ८ लाख ४० हजार टनांवरच स्थिरावली होती.
तर मसूरची आयात १ लाख ६ हजार टनांनी वाढून ७ लाख ७३ हजार टनांवर पोचली. मात्र उडदाची आयात जवळपास एक लाख टनानं कमी राहीली. तर हरभरा आयात निम्म्यापेक्षाही कमी झाली. राजम्याची आयातही घटली होती. कारण या कडधान्यांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील दरापेक्षा अधिक आहेत.
चालू वर्षात सरकारपुढे तूर आणि उडदाचा पुरवठा वाढविण्याचे आव्हान असेल. कारण देशात यंदा उत्पादनात मोठी घट झाली. तर डाळींच्या दरात मागील दोन महिन्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर पुढील काळात तुरीच्या दारतील तेजी कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.