सोयाबीन, कापूस बियाणं कितीनं महागलं?

इंधन, खते, किटकनाशके, मजूरी आणि वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी आधिच अडचणीत आहेत. त्यातच आता खरिपासाठी कापूस आणि सोयाबीन दरात मोठी वाढ झाली आहे.
सोयाबीन, कापूस बियाणं कितीनं महागलं?
Seed RateAgrowon

आजचं मार्केट बुलेटिनः दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी.

१. देशात आत्तापर्यंत साखरेचं ३५२ लाख टन उत्पादन

देशात ६ जून अखेर ३५० लाख टनाचा साखर उत्पादनाचा (Sugar Production) टप्पा ओलांडलाय. यंदा ५२२ साखर कारखान्यांनी हंगाम (Sugar Season) सुरू केला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत ३०७ लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं.यंदा मात्र ३५२ लाख टनांवर उत्पादन पोचलंय. यंदा उत्पादन ४५ लाख टनांनी अधिक झालंय. गेल्या वर्षी याच कालावधीत देशातील केवळ ४ साखर कारखाने सुरू होते. मात्र सध्या २९ कारखाने गाळप करतायेत. यातील ९० टक्के कारखाने एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यंदाचं साखर उत्पादन ३६० लाख टनापर्यंत जाईल, असा सुधारित अंदाज ‘इस्मा’नं नुकताच व्यक्त केलाय. गेल्यावर्षी इथेनॉलकडं २० लाख टन साखर वळूनही ३११ लाख टन उत्पादन झाले होतं. यंदा ३४ लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरून ही ३६० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन जाईल, असा अंदाजये.

२. मध्य प्रदेश वाढवणार व्यापाऱ्यांची अनामत रक्कम

बाजार समिती कायद्यांतर्गत खरेदी केलेल्या शेतीमालाचे २४ तासांत चुकारे करण्याची तरतूदये. परंतु अनेकदा व्यापारी ओळखीच्या शेतकऱ्यांना धनादेश देतात किंवा काही दिवसांनी चुकारे करू, असं सांगत त्यांची बोळवण करतात. पुढील काळात मात्र चुकारे केले जात नाहीत. काही व्यापारी चुकारे न करताच पळून जातात. या प्रकारावर नियंत्रणासाठी मध्य प्रदेश पणन मंडळानं परवानाधारक व्यापाऱ्यांना वाढीव अनामत रक्कम जमा करण्यााच निर्णय घेतलाय. त्यासाठी कायद्यात सुधारण करण्याकरता सूचना मागवल्या. या रकमेतून शेतकऱ्यांचे चुकारे करण्याचं प्रस्तावितये. मात्र मध्य प्रदेशातील बहुतांश बाजार समित्यांमधील व्यापारी संघटनांनी या सुधारणांना तीव्र विरोध दर्शविलाय.

३. नाफेडची आत्तापर्यंत १४ लाख टनांपर्यंत खरेदी

नाफेडनं देशभरात आत्तापर्यंत १३ लाख ८१ हजार टन हरभरा खरेदी (Chana Procurement) केलाय. नाफेडचं खेरदीचं उद्दीष्ट संपल्यानं बहुतेक ठिकाणी खरेदी ठप्प झालीये. नाफेडनं यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक ६ लाख ४२ हजार टन खरेदी केल्याची माहिती नाफेडच्या वेबसाईटवर उपलब्धये. मात्र राज्यात ७ लाख ७६ हजार टन खरेदी झाल्याने प्रक्रिया बंद करण्यात आलीये. कर्नाटकात ७४ हजार टन, तर आंध्र प्रदेशात ७२ हजार टन हरभरा नाफेडनं खरेदी केलाय. एकूण उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचं उद्दीष्ट यंदा सरकरानं ठरलवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना ७५ टक्के माल खुल्या बाजारात विकावा लागंल. मात्र खुल्या बाजारात सध्या हमीभावापेक्षा १००० रुपयांनी दर कमी आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.

४. युरियासाठी भारतानं श्रीलंकेची कर्जमर्यादा वाढवली

आर्थिक डबघाईला आलेल्या श्रीलंकेला भारतानं पुन्हा मदतीचा हात दिलाय. भारत सरकारनं श्रीलंकेसाठी कर्ज मर्यादा वाढवलीये. श्रीलंकेला युरियाच्या खरेदीसाठी 55 दशलक्ष डाॅलरची कर्ज मर्यादा वाढवण्यात आलीये. श्रीलंकेनं आर्थिक आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तातडीची मदत मागितली होती. त्यामुळं भारतानं कर्ज मर्यादा वाढवली होती. या संदर्भात ‘जीओेएसएल’ आणि ‘एक्सपोर्ट- इम्पोर्ट बँक आॅफ इंडिया’ यांच्यात 10 जून रोजी करार झालाय. श्रीलंकेमध्ये सध्या सुरू असलेल्या भात पेरणीसाठी युरियाची नितांत गरजये. त्यामुळं भारतानं श्रीलंकेला तातडीची मदत केलीये.

५. सोयाबीन, कापूस बियाणं कितीनं महागलं?

सोयाबीनच्या बियाण्याने (Soybean Seed) दरानं यंदा हनुमान उडी घेतलीये. दोन वर्षापुर्वी ३० किलो वजनाची बॅग २९०० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा सर्वच कंपन्यांचं बियाणं (Seed Rate) हजार रुपयांनी महागलंय. महाबीजसारख्या शासनाच्या अंगिकृत महामंडळानंही सोयाबीन बियाण्याचा दर यंदा १३० ते १४५ रुपये प्रतिकिलो जाहीर केलाय. गेल्या हंगामात हाच दर ७५ ते ८२ रुपयांपर्यंत होता. एकाच वर्षात सोयाबीन बियाणं किलोमागं ५५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत महागलंय. म्हणजेच दर जवळपास दुप्पट झालाय. कपाशीचं बीटी बियाणं पाकिटही वर्षाला ३० ते ४० रुपयांनी महाग होतंय. दोन वर्षांपुर्वी ३० रुपयांनी दरवाढ झाली होती. यंदा पाकिटामागे ४० रुपये वाढवले. यंदा पाकिटाची एमआरपी ८१० रुपये निश्‍चितये. मक्याच्या बियाण्याचा दर मात्र फारसा वाढलेला दिसत नाही. यंदा एक हजार पासून १२५० रुपयांपर्यंत मक्याच्या बियाण्याची चार किलोची बॅग मिळतेय. यापुर्वी जवळपास एवढाच दर होता, असं विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं. कापूस, सोयाबीन या पिकांचा उत्पादन खर्च वर्षाला वाढतोय. दुसरीकडं मात्र उत्पादनात शाश्‍वती नाही. सोयाबीनसारखे पीक पावसाच्या तडाख्यात सापडण्याचं प्रमाण वाढलं. कापसाला यंदा विक्रमी दर मिळतोय. मात्र उत्पादनात जवळपास निम्म्यानं घट झालीये. यातून फक्त खर्चाचीच बरोबरी होतेय. सोयाबीनला चांगला दर मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी लवकर सोयाबीन विकल्यानं त्यांना फायदा झाला नाही. आता बियाणे दरवाढ झाली. खतंही महागलं. यातून खर्चाचा ताळमेळ बसवण्याचं आव्हान शेतकऱ्यांपुढंये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com