मार्च महिन्यात देशात हरभरा, तुरीची आयात घटली
Chana Agrowon

मार्च महिन्यात देशात हरभरा, तुरीची आयात घटली

देशात सरकारच्या धोरणामुळे कडधान्य आयात सुरुच आहे. मात्र सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये हरभरा आणि तूर आयात घटली.

आजचं मार्केट बुलेटिनः दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी.

देशात सोने खरेदीचा नवा विक्रम

देशात सोने खरेदीनं (Gold) नवा विक्रम गाठलाय. त्यामुळे सोन्याची आयात मोठ्या प्रमाणावर वाढलीय. भारताने मे महिन्यात तब्बल १०१ टन सोनं आयात केलं. गेल्या वर्षी याच कालावधीत फ्कत १३ टन सोनं आयात करण्यात आलं होतं. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने आयातीत चक्क ६७७ टक्के वाढ झालीय. अक्षय्यतृतीयेच्या आधी सोन्याच्या किंमतीत झालेली घट आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे लोकांनी सोने खरेदीचा धडाका लावला. कोरोना संकटामुळे अनेक लग्नं पुढं ढकलण्यात आली होती. यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे लग्नसराई जोरात झाली. त्यामुळे सोन्याला मोठा उठाव मिळाला. परंतु वाढत्या सोने आयातीमुळे भारताची व्यापार तुट वाढेल. तसेच आधीच कमजोर झालेल्या रूपयावर आणखी दबाव येईल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिलाय.

भारताच्या पामतेल आयातीत मोठी वाढ

इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भारताला पामतेल आयातीत अडचणी येतील असं वाटत होतं. परंतु प्रत्यक्षात मे महिन्यात गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक पामतेल आयात झालीय. एप्रिलच्या तुलनेत आयात १५ टक्के वाढलीय. इंडोनेशियाला पर्याय म्हणून भारताने मलेशिया, थायलंड आणि पापुआ न्यू गिनी या देशांमधून पामतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली. भारताने मे महिन्यात ६ लाख ६० हजार टन पामतेल आयात केलं. एप्रिल महिन्यात पामतेल आयात ५ लाख ७२ हजार ५०८ टन इतकी होती. पामतेलाबरोबरच देशात सोयातेल आयातही वाढली आहे.पुढील दोन महिन्यांत सोयातेल आयात आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली.

येत्या खरिपात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

देशात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड वाढेल, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाचे कार्यकारी संचालक डी.एन.पाठक यांनी सांगितले. गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढेल. कर्नाटकसारख्या राज्यात सोयाबीनची लागवड सुरू झाली आहे. परंतु मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांत मात्र शेतकरी मॉन्सूनकडे डोळे लावून बसले आहेत. मॉन्सून कधी येतो आणि पावसाचे प्रमाण कसे राहते यावर सोयाबीन पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. उत्तर कर्नाटकात पेरण्या सुरू झाल्या आहेत. कलबुर्गी आणि बिदर या परिसरात शेतकरी तुरीऐवजी सोयाबीनला पसंती देत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मात्र सोयाबीनला कापसाची तगडी स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कापसाला विक्रमी भाव मिळाल्यामुळे कापसाची लागवड वाढण्याची चिन्हे आहेत. कडधान्य पिकांखालील काही क्षेत्र कापूस आणि सोयाबीनकडे वळतं होईल, असा अंदाज आहे.

हळदीला जीएसटी लागू नाही

हळदीला जीएसटी लागू होत नाही, असा महत्त्वाचा निर्णय आल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. वाळवलेली व पॉलिश केलेली हळद कृषी उत्पादन नसल्यामुळे तिला पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याविरोधात महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगकडे (MAAAR) दाद मागण्यात आली होती. या ॲपिलेट ऑथॉरिटीने शेतकऱ्यांनी वाळवलेली, पॉलिश केलेली हळद हे कृषी उत्पादन असून त्याच्यावर जीएसटी लागू होत नाही, असा निर्वाळा दिला. त्यामुळे जीएसटीची टांगती तलवार दूर झाली आहे.

हरभरा, तूर आयात घटली

केंद्र सरकारनं कडधान्य आयातीला पूर्ण मोकळीक दिलीये. त्यामुळं देशात सर्रास आयात सुरुये. आयातीचा आकडा महिन्याला बदलतोय. मात्र देशातील कडधान्य बाजारावर या मालाचा दबाव वाढलाय. मार्च महिन्याचा विचार करता फेब्रुवारीच्या तुलनेत कडधान्य आयात काहीशी घटली. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतीक बाजारातील अस्थिरता याला कारणीभूत असल्याचं जाणकारांनी सांगितलं. देशात हरभरा दर हमीभावाच्या खाली आहेत. सरकारच्या आयात धोरणाचा दरावर दबाव आलाय. हमीभावापेक्षा हरभऱ्याला एक हजार ते १२०० रुपयांपर्यंत कमी दर मिळतोय. मात्र तरीही आयात सुरुचये. फेब्रुवारी २०२२ मध्ये १२ हजार ४०८ टन हरभरा आयात झाली होती. तर मार्च महिन्यात हरभरा आयात निम्म्याने कमी झाली. मार्चमधील आयात जवळपास ६ हजार टनांवर आली. तर तुरीचीही आयात मार्च महिन्यात घटली. फेब्रुवारीत तूर आयात १० हजार १५७ टन झाली. मार्चमध्ये मात्र ४ हजार टनांवरच स्थिरावली. असं असलं तरी मसूर आणि मुगाची आयात मात्र वाढली. मसूर आयात फेब्रुवारीतील ३२ हजार टनांवरून मार्च महिन्यात ५० हजार टनांवर पोचली. तर मूगाची आयात २८ हजार टन होती, ती ४९ हजार टनांपर्यंत वाढली. हरभरा आणि तूर आयात एप्रिल आणि मे महिन्यात कमीच राहिल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविलाय. मात्र बाजार दरावर याचा परिणाम दिसून आला नाही. हरभरा आणि तुरीचे बाजारभाव अद्यापही हमीभावापेक्षा कमीचये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com