Agrowon Podcast : तुरीचा हमीभाव वाढवा; व्यापारी व प्रक्रिया उद्योगाची मागणी

देशात तुरीचे उत्पादन घटल्यामुळे दर तेजीत आहेत. दर पाडण्यासाठी सरकारचा मोठा आटापिटा सुरू आहे. परंतु मुळात उत्पादनच कमी असल्याने तुरीच्या बाजारात मोठी मंदी येण्याची शक्यता दिसत नाही. पुढचा खरीप तोंडावर आलाय.
Tur Rate
Tur RateAgrowon

१) सोयापेंड निर्यातीमुळे सोयाबीनला बळ (Soyameal Export)

भारतातून होणाऱ्या सोयापेंड निर्यातीला मोठा उठाव मिळालाय. २०२२-२३ या तेलवर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या काळात सोयापेंड निर्यातीत तब्बल ११० टक्के वाढ झालीय. व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ या देशांकडून खरेदीत मोठी वाढ झाली.

यंदा देशातून विक्रमी सोयापेंड निर्यात होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील सोयापेंड साठे संपत आलेत. आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत आहे. भारतातील सोयाबीन प्रक्रियादारांनी निर्यातीचे करार केले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. आज सोयाबीनला प्रमुख बाजारांत (Soybean Market) प्रति क्विंटल ५ हजार ते ५ हजार ५०० रूपये दर मिळाला. येत्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात १५० ते २०० रूपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

२) कापसाचे दर स्थिर (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय वायदेबाजारात कापसाच्या दरात किंचित घट झाली. परंतु देशातील बाजारात मात्र कापसाचे दर स्थिर राहिले. प्रमुख बाजारांत कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ते ८ हजार ५०० रूपये दर मिळाला. येत्या काही दिवसांत बाजारात कापसाची आवक कमी होण्याची चिन्हे आहेत.

टेक्सटाईल उद्योगाकडे सध्या कापसाचा पुरेसा साठा नाही. त्यांच्याकडून कापसाची खरेदी वाढेल. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. ज्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस ठेवलाय, त्यांना त्याचा फायदा होईल.

३) नाफेडकडून ६ लाख ८६ हजार टन हरभरा खरेदी (Chana Procurement)

यंदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यातच नाफेडच्या हरभरा खरेदीने जोर पकडलाय. त्यामुळे हरभऱ्याचे दर टिकून राहतील; हरभऱ्याच्या दरात मोठी पडझड होण्याची शक्यता नाही.

म्हणून शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकू नये, असा सल्ला जाणकारांनी दिलाय. नाफेडने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात हमीभावाने सुमारे ६ लाख ८६ हजार २२५ टन हरभरा खरेदी करण्यात आला.

त्याचा एकूण ३ लाख ६६ हजार ८४१ शेतकऱ्यांना फायदा झाला. नाफेडने आतापर्यंत सुमारे ३६६१ कोटी रूपयांचा हरभरा खरेदी केलाय. नाफेडच्या हरभरा खरेदीत जवळपास निम्मा वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ३ लाख २४ हजार ५९३ टन हरभरा खरेदी करण्यात आलाय.

Tur Rate
Chana Procurement : हमीभावाने ६६ हजारांवर क्विंटल हरभऱ्याची खरेदी

४) जिऱ्याच्या दरात प्रचंड तेजी

देशातील प्रमुख बाजारांत जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आलीय. गेल्या दहा दिवसांत जिऱ्याचे सरासरी भाव ३६ हजार रूपये क्विंटलवरून ३९ हजार ७६५ रूपयांवर पोहोचलेत. अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्यामुळे जिरा पिकाचं मोठं नुकसान झालंय.

राजस्थानात ७० टक्के तर गुजरातमध्ये ३० टक्के पिकाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिल्लक साठा कमी असल्यामुळे पुरवठ्यात मोठी तूट आहे. त्यात उत्पादन घटणार असल्यानं पुरवठा आणखीनच आक्रसून जाईल.

दुसऱ्या बाजूला निर्यातीला वाढती मागणी आहे. त्यामुळे जिऱ्याच्या दराने उसळी घेतली आहे. जिऱ्याच्या दरातील तेजी कायम राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

५) तुरीचा हमीभाव वाढवा, व्यापारी व उद्योगाची मागणी (Tur Rate)

देशात तुरीचे उत्पादन घटल्यामुळे दर तेजीत आहेत. दर पाडण्यासाठी सरकारचा मोठा आटापिटा सुरू आहे. परंतु मुळात उत्पादनच कमी असल्याने तुरीच्या बाजारात मोठी मंदी येण्याची शक्यता दिसत नाही. पुढचा खरीप तोंडावर आलाय.

पुरवठ्याची पाईपलाईन कोरडी पडल्यास पुढील वर्षी मोठी अडचण होईल, अशी भीती व्यापारी आणि डाळमिल चालकांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी चक्क शेतकऱ्यांची बाजू घेऊन सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी येत्या खरीपात तुरीचा पेरा वाढवला तरच पुरवठा सुरळीत राहू शकतो.

त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तूर लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे, त्यासाठी तुरीचा हमीभाव वाढवावा, अशी मागणी व्यापारी आणि डाळमिल चालकांनी केली आहे. यंदा तुरीला सरासरी प्रति क्विंटल साडे आठ हजार रूपयांच्या घरात भाव मिळतोय

Tur Rate
Soybean, Cotton, Tur Price : सोयाबीन, कापूस, तुरीत किंमतवाढीचा कल

गेल्या वर्षी भाव सहा हजारांच्या आसपास होता. परंतु यंदा प्रतिकूल हवामानाचा फटका बसला. त्यामुळे तुरीचा उतारा निम्म्यावर आलाय. त्यामुळे भाव वाढूनही शेतकऱ्यांचा फायदा झालेला नाही. तूर हे इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त कालावधीचं पीक आहे.

पण त्याचा हमीभाव मात्र इतर कडधान्यांपेक्षा कमी आहे. मुगाचा हमीभाव आहे ७७७५ रूपये पण तुरीला मात्र ६६०० रूपये हमीभाव आहे. तुरीतून चांगला परतावा मिळाला तरच शेतकरी पुढील हंगामात तुरीचा पेरा वाढवतात.

यंदा शेतकऱ्यांचं नुकसानच झालेलं असल्यामुळे त्यांचा तुरीकडे ओढा राहील का, याबद्दल शंका आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचा सगळा भर आयातीवर आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू देऊन पुढील हंगामात पेरा वाढविण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे.

पण त्याऐवजी बेसुमार आयात करून भाव पाडण्याचा हुकुमी एक्का सरकार वापरत आहे. या पार्श्वभूमीवर तुरीचा हमीभाव वाढविण्याच्या मागणीला महत्त्व प्राप्त झालंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com