फिलिपाईन्सला भारताची तांदूळ निर्यात वाढणार

फिलिपाईन्सने भारतातील तांदूळ आयातीवरचं शुल्क कमी केलं आहे. पूर्वी हे शुल्क ५० टक्के होतं. ते आता ३५ टक्क्यावर आणलंय. थायलंड, व्हिएतनामला शह देण्यासाठी फिलिपाईन्सनं ही खेळी केली आहे.
फिलिपाईन्सला भारताची तांदूळ निर्यात वाढणार
Rice ExportAgrowon

आजचं मार्केट बुलेटिनः दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडी.

१. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातील गव्हाच्या दराच्या तुलनेत यंदा ५.६ टक्के वाढ झाली आहे. भारताने गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे युक्रेनमध्ये गव्हाचे घटलेले उत्पादन याचा हा परिणाम आहे, असे फुड ॲन्ड ॲग्रिकल्चर ऑर्गनायजेशन अर्थात एफएओने म्हटलं आहे. यंदा सलग चौथ्या महिन्यात गव्हाचे भाव वाढले आहेत.

२. राजस्थानमध्ये हरभरा खरेदीला मुदतवाढ

केंद्र सरकारने राजस्थानामधील हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून आता दरदिवशी हरभरा खरेदीची मर्यादा २५ क्विंटलवरुन ४० क्विंटलपर्यंत वाढवली आहे. हरभरा खरेदीचे उद्दीष्ट वाढवावे आणि मुदतवाढ द्यावी, यासाठी तेथील शेतकरी दोन महिन्यांपासून मागणी करत आहेत. हरभरा खरेदी कासव गतीने सुरू असल्यामुळे राजस्थानमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. मध्य प्रदेशमध्ये हरभऱ्याची ८० टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. परंतु राजस्थानात मात्र जेमतेम २० टक्के खरेदी झाली आहे.

३. इथेनॉल ही शाश्वत संधी नाहीः नरेंद्र मुरकुंबी

भारतातील साखर उद्योगासाठी इथेनॉल उत्पादन ही सध्या सुवर्णसंधी आहे. मात्र, ती शाश्वत स्वरुपाची नाही. पुढील १०-१५ वर्षांनंतर इथेनॉलऐवजी पुन्हा अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल, असे मत रवींद्र एनर्जीचे संचालक नरेंद्र मुरकुंबी यांनी व्यक्त केले. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषधेत ते बोलत होते. पुढील १० वर्षे इथेनॉल आधारित वाहने चालू राहतील. तो आपल्यासाठी सुवर्ण काळ असेल. मात्र, त्यानंतरचे जग इलेक्ट्रिक वाहनांचे असेल, असे मुरकुंबी म्हणाले.

४. दहा लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर

केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यात करण्यासाठीचा कोटा जाहीर केला आहे. ही साखर निर्यात करण्यासाठी ९० दिवसांची मुदत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी साखर निर्यातीवर बंधनं घातली होती. त्यानुसार यंदाच्या हंगामात १०० लाख टनापेक्षा जास्त साखर निर्यात करता येणार नाही. साखर कारखन्यांनी ९० लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. आणखी १० लाख टन साखर निर्यातीचा मार्ग सरकारच्या ताज्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. देशात साखरेचे पुरेसे उत्पादन आहे. त्यामुळे १० लाख टन साखर निर्यात होऊनही देशात साखरेचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी दिली.

५. जागतिक बाजारपेठेत तांदळावरून घमासान

भारताच्या तांदूळ निर्यातीला बळ देणारी एक महत्त्वाची घडामोडी आंतरराष्ट्रीय बाजारात घडली आहे. फिलिपाईन्सने भारतातील तांदूळ आयातीवरचं शुल्क कमी केलं आहे. पूर्वी हे शुल्क ५० टक्के होतं. ते आता ३५ टक्क्यावर आणलंय. आंतरराष्ट्रीय बाजारातील साठमारीचा एक पदर त्याला आहे. थायलंड आणि व्हिएतनाम हे देश तांदूळ उत्पादनात आघाडीवर आहेत. या दोघांनी मिळून तांदळाचे भाव वाढवून टाकले. तांदळाच्या बाजारात एक प्रकारची मक्तेदारी आणून चढ्या भावाने इतर देशांना तांदूळ विकण्याचा या दोघांचा डाव होता. फिलिपाईन्सने त्याला शह देण्यासाठी भारताचा आधार घेतला आहे. थायलंड, व्हिएतनाममधून तांदूळ आयातीला पर्याय म्हणून भारताला फिलिपाईन्सने पसंती दिलीय.

भारत हा जगात सगळ्यात जास्त तांदूळ पिकवणारा देश आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा जवळपास ४० टक्के एवढा भरभक्कम आहे. गेल्या वर्षी भारताने बासमतीसह एकूण २१३ लाख टन तांदूळ निर्यात केला होता. थायलंड आणि व्हिएतनाम या देशांनी आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं कारण सांगून तांदळाचे भाव वाढवले आहेत. गेल्या वीस वर्षांत तांदळाचा उत्पादनखर्च वाढलेला असूनही भाव मात्र त्या प्रमाणात वाढले नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. कोरोना महामारीच्या फटक्यातून जग आता सावरत आहे. त्यामुळे तांदळाची मागणी वाढली. त्याचा फायदा घेण्याचा या दोन देशांचा प्रयत्न आहे. जागतिक बाजारात व्हिएतनाम आणि थायलंडच्या तुलनेत भारतातील तांदूळ प्रति टन १०० रूपये कमी दराने उपलब्ध आहे. चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्समधून भारतातील तांदळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. भारतात महागाईचा भडका उडाल्यामुळे केंद्र सरकार गव्हापाठोपाठ तांदूळ निर्यातीवरही बंदी घालणार अशी चर्चा सुरू होती. अर्थात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा तातडीने इन्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सचा हा निर्णय आल्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com