Maize Market: मका निर्यात यंदा कमी होणार का ?

देशातील मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी देशातील मका उत्पादन ३३६ लाख टनांवर पोचलं होतं. मात्र यंदा खरिपातील मका उत्पादनात घट झाली आहे. तर निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली.
Maize Market
Maize MarketAgrowon

कापूस दरात सुधारणा

1. देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. अनेक बाजारात कापसाचा सरासरी दर आता ८ हजारांपर्यंत पोचला. मात्र अद्यापही बाजारातील कापूस आवक अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगत आहेत. आज कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळाला. कापसाचे दर सुधारण्यास पोषक स्थिती असल्याने जानेवारीत कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

सोयाबीन बाजार स्थिर

2. आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दरपातळी गाठली आहे. देशात मात्र सोयाबीनचे दर स्थिर आहेत. आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र सोयाबीनचेही दर जानेवारी महिन्यात सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

हळदीचे दर टिकून

3. देशातील बाजारात सध्या हळदीची आवक कमी आहे. त्यामुळं हळदीला सरासरी दर मिळतोय. त्यातच मागील काही दिवसांपासून हळदीला काहीसा उठाव वाढल्याचं व्यापारी सांगित आहेत. सध्या देशातील बाजारात हळदीला ६ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विेंटलचा दर मिळतोय. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातून हळदीला बऱ्यापैकी उठाव राहू शकतो. त्यामुळं हळदीचे दर चांगले राहू शकतात, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत. 

Maize Market
Cotton Import : ऑस्ट्रेलियातून तीन लाख गाठी कापसाची आयात

गुळाची आवक वाढली
4. राज्यातील गुऱ्हाळे सुरु होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला. त्यामुळं बाजारातील गुळाची आवकही वाढली. इतर राज्यांमधूनही गुळाची आवक होतेय. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव आल्याचं जाणवतं. सध्या गुळाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपयांचा दर मिळतोय. पुढील काळात गुळाची आवक चांगली राहू शकते. त्यामुळं दरावरही काहीसा दबाव येऊ शकतो, असा अंदाज गूळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

देशात मका उत्पादन किती होईल?

5. देशातील मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी देशातील मका उत्पादन ३३६ लाख टनांवर पोचलं होतं. मात्र यंदा खरिपातील मका उत्पादनात घट झाली आहे. तर निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळं देशात मक्याची उपलब्धता कमी होती. परिणामी सध्या मक्याचे दर टिकून आहेत. यंदा देशात ३२० लाख टन मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मात्र खरिपातील घटलेले उत्पादन आणि रब्बीतील वातावरण बघत उत्पादन ३२० लाख टनांपेक्षाही कमीच राहील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदा मका उत्पादन घटण्याचा अंदाज असला तरी वापर मात्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा मक्याचा वापर २ लाख टनांनी वाढून ३०१ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज आहे.

तर देशातील दरवाढ बघता यंदा निर्यात ६ लाख टनांनी कमी होऊन २८ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र युक्रेनमधील उत्पादन घट आणि ब्राझील तसेच अर्जेंटीनातील मका पिकाला दुष्काळाचा बसत असलेला फटका, यामुळं यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला चांगाल उठाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतीय मक्याला मागणी येईल. परिणामी निर्यात वाढू शकते, असाही अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्यामुळं पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा यंदा ७ लाख टनांनी कमी होऊन १५ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाजही पुढे येतोय. त्यामुळं यंदाही मक्याला देशातील बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या देशातील बाजारात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. या दरात पुढील काळात २०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com