Edible Oil : पामतेल पडले, सोयाबीनचे काय होईल?

काही महिन्यांपूर्वी पामतेल निर्यातीवर बंदी घालणारा इंडोनेशिया आता मात्र निर्यात वाढवण्यासाठी खटपट करतोय. इंडोनेशियाने नुकताच निर्यात कोटाही वाढवलाय. पामतेलाचे दर घसरलेत.
Palm Oil
Palm OilAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

दुष्काळामुळे ब्राझीलची सोयाबीन निर्यात घटली

१.सोयाबीन उत्पादनात जगात आघाडीवर असलेला देश म्हणजे ब्राझील. २०२० मध्ये अमेरिकेला मागं टाकून ब्राझील सोयाबीन उत्पादनात एक नंबरवर पोहोचला. पण यंदा ब्राझीलची सोयाबीन निर्यात घटलीय. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ब्राझीलने ३१ लाख टन सोयाबीनची निर्यात केली. गेल्या वर्षी याच कालावधीत जेवढी निर्यात झाली होती, त्याच्या तुलनेत ती तब्बल ७२ टक्के कमी आहे. ब्राझीलमध्ये यंदा मोठा दुष्काळ पडलाय. त्याच्या जोडीला उष्णतेची लाट आलीय. त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसलाय. एका सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनात ११.४ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

Palm Oil
बाजारावर पामतेल उत्पादनवाढीचा परिणाम होईल?

वायदेबाजारात मक्याचे दर चढे

2.. जागतिक पातळीवर मका पिकाच्या वाढीसाठी हवामान अनुकूल आहे. पण मागणी कमी राहण्याची भाकीतं केली जात आहेत. जगातील अनेक देशांनी आर्थिक मंदीच्या भीतीने व्याजदर कपात आणि इतर उपायांचा सपाटा लावलाय. त्यामुळे मागणी घटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर दुसऱ्या बाजुला रशिया-युक्रेन युध्द अजून चालूच आहे. त्यामुळे काळ्या समुद्रातून होणारा मक्याचा पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे सध्या तरी वायदेबाजारात मक्याचे दर चढे आहेत. अमेरिकेत सप्टेंबरमध्ये मक्याची काढणी सुरू होईल. पुढच्या काही आठवड्यांत हवामानाचा अंदाज काय राहतोय, याकडे तिथले शेतकरी आणि व्यापारी डोळे लावून बसलेत. कारण मक्याचं पीक आता फुलोऱ्यात येईल. त्यामुळे हवामान कसं राहतंय, यावर उत्पादन किती मिळेल, ते अवलंबून राहणाराय.

Palm Oil
इंडोनेशियाचा पाम तेल निर्यातबंदीचा निर्णय

रशिया गहू निर्यात करण्याची शक्यता

3. रशियाचा २०२२-२३ चा गहू हंगाम १ जुलैपासून सुरू झालाय. यंदाच्या हंगामात रशियात ८५० लाख टन इतकं प्रचंड गहू उत्पादन (Wheat Production) होण्याचा अंदाज आहे. तसंच शिल्लक साठाही विक्रमी आहे. त्यामुळे युक्रेनबरोबर युध्द सुरू असतानाही रशिया गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता धुसर आहे. रशिया यंदाच्या हंगामात ३९० लाख टन गहू निर्यात करण्याचा अंदाज बांधला जातोय. रशिया हा गव्हाचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे. युक्रेनमधूनही गहू निर्यात केली जाते. परंतु रशियाने युक्रेनच्या नाड्या आवळल्यात. युक्रेनमधील शेतीमाल काळ्या समुद्राच्या मार्गे निर्यात केला जातो. रशियाने बंदरे ताब्यात घेतलीत. त्यामुळे युक्रेनमधून होणारा पुरवठा थांबलाय. सध्या जागतिक पातळीवर गव्हाचा तुटवडा आहे. रशियातून निर्यात झाली तर गव्हाचा जागतिक पुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

भुईमूग आणि नारळ निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी

4. देशातील खाद्यतेल तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने भुईमूग (Groundnut) आणि नारळ (Coconut) निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणी एडिबल ऑईल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने केली आहे. देशात खाद्यतेलाचा तुटवडा आहे. जवळपास ६२ ते ६५ टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. त्यावर तोडगा काढण्यासाठी तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवले पाहिजे. तसेच भुईमूग आणि नारळाची निर्यात थांबवली पाहिजे, असे संघटनेचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी याआधीच अभियान जाहीर केलंय. परंतु त्यात पामतेलालाच झुकतं माप दिलंय. त्यामुळे इतर तेलबियांसाठी या अभियानाचा काही उपयोग होणार नाही, असंही या संघटनेने म्हंटलंय.

पामतेल पडले, सोयाबीनचे काय होईल?

5. जागतिक बाजारात पामतेलाची (Palm Oil Rate) घसरगुंडी सुरू आहे. वायदेबाजारातही विक्रमी घसरण आहे. आर्थिक मंदीच्या भीतीने मागणी (Palm Oil Demand) घटलीय. त्या तुलनेत पुरवठा जादा आहे. जगात सगळ्यात जास्त पामतेलाचं उत्पादन इंडोनेशियात होतं. इंडोनेशियाने पामतेलाची निर्यात (Palm Oil Export) वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. निर्यातीवरचा कर आणि लेव्ही कमी केलीय. कमीत कमी १० लाख टन क्रुड पामतेल देशाबाहेर पाठवण्याचा इंडोनेशियाचा प्रयत्न आहे. दरम्यान, इंडोनेशियाने नुकताच पामतेलाच्या निर्यातीचा कोटाही वाढवलाय. इंडोनेशियातील पामतेल उत्पादकांनी स्थानिक बाजारात जितकं पामतेल विकलं, त्याच्या सातपट हा कोटा आहे. देशातील पामतेलाचा साठा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. पामतेल उत्पादनात इंडोनेशियाच्या खालोखाल स्थान आहे मलेशियाचं. तिथेही येत्या काही महिन्यांत पामतेल उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत. कारण तिथं नवीन पीक चांगलं आहे. तसेच स्थलांतरित मजूर कामावर परतलेत. परंतु निर्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे.

रशिया-युक्रेन युध्द सुरूच असल्यामुळे सूर्यफुल तेलाचा पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. मध्यंतरी इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे भारतासारख्या देशांची पंचाईत झाली. भारत पामतेल आयातीसाठी इंडोनेशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताने मग पामतेलाऐवजी सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढवली. त्याचाही परिणाम पामतेलाच्या जागतिक मागणीवर झाला आहे. आता जागतिक पातळीवर पामतेलाचा पुरवठा वाढलाय. पामतेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम सोयातेलावर होऊ शकतो. त्याचा परिणाम सोयाबीनच्या किमतीवर जाणवू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com