Agrowon Podcast : कापूस दरावरील दबाव कायम

Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाचे दर सध्या दबावात आहेत. अमेरिकेतील दोन बॅंका संकटात आल्यानंतर शेतीमालाच्या बाजारात नरमाई दिसली.
Agrowon Podcast
Agrowon PodcastAgrowon

१) सोयाबीनवरील दबाव कायम (Soybean Rate, Price)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरानं मागील चार महिन्यांतील निचांकी दराची पातळी गाठली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपापरपर्यंत १४.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४५४ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला.

तर देशातील सोयाबीन दरावरही दबाव आहे. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई आणि सोयापेंड निर्यातीची धिमी झालेली गती यामुळं दरावर दबाव आहे. पण पुढील काळात बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) तूर तेजीत राहण्याचा अंदाज (Tur Rate)

देशातील अनेक बाजारात तुरीच्या दरात आज क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसली. तूर डाळीला उठाव असल्यानं प्रक्रिया उद्योगाची खरेदी वाढली आहे. तर व्यापाऱ्यांनी तुरीची चांगली उचल केली. त्यामुळं आजही तुरीला चांगला उठाव मिळाला.

आज तुरीला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तुरीचे दर पुढील काळातही तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हरभरा दरात किंचित सुधारणा

देशातील काही बाजारात हरभरा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. हरभरा दर सध्या ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. नाफेडची खरेदी आता गती घेत आहे. तर नुकत्याच झालेल्या पावसानं अनेक राज्यांमध्ये पिकाचे नुकसान केले.

त्यामुळं उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agrowon Podcast
Kabuli Chana : देशातील काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढेल का?

४) लसणाला चांगला उठाव

राज्यातील बाजारात लसणाचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारातील आवकही मर्यादीत दिसत आहे. पण उठाव चांगला आहे. देशात सध्या लग्न सराई आणि सणांचा काळ आहे. त्यामुळं लसणाची मागणी वाढली.

त्यामुळं लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. लसणाचे दर पुढील काळातही तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) सध्या कापसाला काय भाव मिळतोय? (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाचे दर सध्या दबावात आहेत. अमेरिकेतील दोन बॅंका संकटात आल्यानंतर शेतीमालाच्या बाजारात नरमाई दिसली. कापसासह सोयाबीन, खाद्यतेल, मका आणि गहू या सर्वच शेतीमालांच्या दरात घट झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. शेतकऱ्यांना कापूस साठवण्यात अडचणी आहेत.

Agrowon Podcast
Cotton Stock : शेतकऱ्यांकडे उरला केवळ ४० टक्‍के कापूस साठा

त्यामुळं शेतकरी कापूस विकत आहेत, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. मागील हंगामात मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे होते. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी ९० टक्के कापूस विकला होता. यंदाही मार्चमध्ये दर वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता.

पण दर वाढण्याऐवजी दबावात आले. त्यामुळे शेतकरी पॅनिक सेलिंग करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सध्या ७८.१२ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत. तर देशातील वायदे ६१ हजार ३४० रुपये प्रतिखंडीवर होते.

बाजार समित्यांधील दर प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहे. एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com