Corn Market : जागतिक मका उत्पादन घटल्यानं दर चांगले

भारतातून आयातीला खर्च कमी लागत असल्यानं आफ्रिकेतूनही मागणी येत असल्याचं सांगितलं जातं.
Corn Market
Corn MarketAgrowon

१) कापूस दरात चढ उतार (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सध्या कापसाच्या दरात (Cotton Rate) चढ उतार सुरु आहेत. देशात आज कापसाचे भाव टिकून होते. कपसाला आज सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८१.७८ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशात सध्या कापूस (Cotton Bajarbhav) काहीसा दबावात असला तरी मार्चमध्ये दर सुधारू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलं.

२) सोयाबीनमध्ये वाढ सुरुच (Soybean Rate)

देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. आजही काही बाजारांमध्ये सोयाबीन दर क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी सुधारले होते. त्यामुळं बहुतेक बाजारांमधील सरासरी दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १५.४७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात सोयाबीन दर पुढील काही दिवसांमध्ये सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Corn Market
Wheat Production : राज्यात बारा लाख हेक्टरवर गहू उत्पादन

३) गव्हाचा बाजार दबावात (Wheat Market)

शेतकऱ्यांचा नवा गहू बाजारात येण्याच्या आधीच भाव पाडण्याचा चंग सरकारनं बांधल्याचं दिसतंय. सरकारनं यापुर्वी ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा २० लाख टन गहू सरकार विकणार आहे.

या गव्हाची किंमत हमीभावापेक्षाही कमी ठेवली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. सध्या बाजारात गव्हाचे दर २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पण नव्या मालाची आवक सुरु झाल्यास दरावर दबाव येऊ शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

४) टोमॅटो दरात अपेक्षित वाढ नाही

मागील काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक कमी झालेली दिसते. सध्या पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर बाजारात टोमॅटोची आवक काहिशी अधिक आहे. पण सरासरीपेक्षा आवक कमीच आहे. इतर बाजारांमध्ये सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमी माल बाजारात येत आहे.

पण तरीही टोमॅटोचे दर वाढलेले नाहीत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ९०० ते १ हजार ३०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात टोमॅटोची आवक कमी होऊन दरही सुधारु शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Corn Market
Onion Cultivation : मका, कांद्याचे पीक बहरले

५) मक्याच्या दर टिकतील का?

देशात यंदा खरिपातील मका उत्पादन वाढल्याचं सरकारनं म्हटलं. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मका उत्पादन घटलं. इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसील आणि एफएओच्या मते जगात यंदा ११ हजार ५३० टन मका उत्पादन होईल. मागील हंगामातील उत्पादन १२ हजार २०० टन होतं.

जागतिक पातळीवर मका उत्पादन घटल्यानं दरही वाढले. सध्या अमेरिकेचा मका ३०० डाॅलर प्रतिटनानं मिळतो. तर अर्जेंटीना ३१४ डाॅलरने आणि ब्राझील ३१० डाॅलर प्रतिटनानं मका निर्यात करत आहे. तर भारताचा मकाही ३०८ ते ३११ डाॅलर प्रतिटनाच्या दरम्यान आहे.

पण भारतातून मका आयातीसाठी वाहतुक खर्च कमी लागतो. त्यामुळं व्हिएतनाम आणि मलेशियासह इतर आग्नेय आशियातील देश आणि आखाती देशांमधून मक्याला मागणी वाढलेली आहे.

भारतातून आयातीला खर्च कमी लागत असल्यानं आफ्रिकेतूनही मागणी येत असल्याचं सांगितलं जातं. पण खरेदीसाठी प्रत्यक्ष व्यवहार झाले नाहीत, असं निर्यातदारांनी सांगितलं. त्यातच सध्या खरिपातील मका संपत आला. त्यामुळं निर्यात काहीशी कमी झाली.

आता पुढील काही दिवसांमध्ये रब्बीतील पीक बाजारात येण्यास सुरुवात होईल. सध्या मक्याला चांगला उठाव आहे. बाजारातील दरही २ हजार १०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

रब्बीतील मका पिकालाही मागणी चांगली राहू शकते. त्यामुळं मक्याची आवक वाढली तरी सध्याचे दर टिकू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com