Edible Oil: पामतेलामुळे इतरही खाद्यतेलाचे दर नरमले

सध्या पामतेलाचे (Palm Oil) दर ३ हजार ७०० रिंगीटच्या दरम्यान आहेत. इंडोनेशियात पुरवठा वाढला पण मागणी नसल्यानं दरात आणखी दरमाई येऊ शकते, असे जाणकारांनी सांगितलं.
Palm Oil
Palm OilAgrowon

इंडोनेशियात पुढील हंगामात पामतेल (Palm Oil Production) उत्पादन वाढीचा अंदाज आहे. त्यामुळं इंडोनेशियानं पामतेल निर्यात वाढविली. याचा परिणाम जागतिक खाद्यतेल बाजारावर झाला. मागील वर्षभर पामतेल तेजीत असल्यानं सोयातेल, सूर्यफुल, मोहरी, कॅनोला तेलाचेही दर तेजीत होते. पण आता पामतेलाचे दर कमी झाल्यानं या तेलांच्या दरातही नरमाई आली.

मात्र पामतेल स्वस्त होऊनही भारत, चीन, बांगलादेश, अमेरिका आदी देशांनी मागणी कमी केली. याचा दबाव आणखी बाजारावर येतोय. सध्या पामतेलाचे दर ३ हजार ७०० रिंगीटच्या दरम्यान आहेत. इंडोनेशियात पुरवठा वाढला पण मागणी नसल्यानं दरात आणखी दरमाई येऊ शकते, असे जाणकारांनी सांगितलं.

देशात तुरीची लागवड १८ टक्क्यांनी घटली

देशात मागील आठवडाभरात खरिपाच्या पेरणीनं (Kharip Sowing) वेग घेतला. १५ जुलैपर्यंत देशात एकूण ७३ लाख हेक्टरवर कडधान्य पेरा झाला. गेल्यावर्षी याच काळात ७० लाख हेक्टर क्षेत्र कडधान्यानं व्यापलं होतं. म्हणजेच यंदा कडधान्य पेरा ९ टक्क्यांनी वाढला. पण खरिपातील महत्वाचं कडधान्य पीक असलेल्या तुरीची लागवड घटली.

देशात आत्तापर्यंत २६ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. मात्र ही लागवड गेल्यावर्षीपेक्षा १८ टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १० लाख तर कर्नाटकात ८ लाख हेक्टरवर तुरीचा पेरा झाला. मात्र या दोन्ही राज्यांत लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच आहे. शेवटपर्यंत लागवडीची ही स्थिती कायम राहिल्यास देशात तूर उत्पादन कमी होऊ शकतं.

भारतात तेलबिया उत्पादन वाढीचा दर कमी

मागील वर्षभरापासून खाद्यतेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांपासून नोकरदारांनाही बसतोय. सरकारनं अनेक उपाय केले तरी दर कमी झाले नाहीत. याचं महत्वाचं कारण म्हणजेच आयातीवरील अवलंबित्व. भौगोलिक वातावरण, सरकारची धोरणं, शेतकऱ्यांना मिळणारा कमी दर या कारणांमुळे तेलबियांचा (Oil Seeds) पेरा जास्त वाढला नाही.

तसेच पीक उत्पादकतेत अल्प वाढ, बियाणे बदलाचं कमी प्रमाण, शेतीत आधुनिक यंत्रांचा कमी वापर आणि इतर नगदी पिकांतून मिळणारे उत्पन्न, यामुळही तेलबिया पिकांची पेरणी देशात वाढू शकली नाही. जगात तेलबिया उत्पादन वाढीचा वार्षिक दर २.९ टक्के होता. भारतात मात्र हाच दर १.९४ टक्क्यांवर रेंगाळत राहीला. त्यामुळं खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहावं लागतं. याचा फटका ग्राहकांना बसतोय. त्यामुळे भारत खाद्यतेलात स्वयंपूर्ण झाल्यास आर्थिक, राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

युक्रेनमधून साडेचार लाख टन मका निर्यात

युक्रेनमध्ये युध्दाची झळ शेतीसह सर्वच क्षेत्रांना बसतेय. परंतु युक्रेननं शेतीमालाची निर्यात सुरु केली आहे. युक्रेनमधून मागील आठवड्यात मक्याची २ लाख १० हजार टन निर्यात केली. यापैकी ४५ टक्के मका रोमानिया या देशाला गेला. तर १४ टक्के पोलंड आणि ११ टक्के हंगेरीला निर्यात झाला. मागील दोन आठवड्यात युक्रेनमधून साडेचार लाख टन मक्याची निर्यात (Maize Export) झाली.

युक्रेनमधून मका निर्यात ठप्प झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात दर तेजीत आले होते. पण येथून आता मका निर्यात सुरु झाली आहे. मात्र निर्यात कमी होतेय. त्यामुळं युक्रेनच्या निर्यातीचा बाजारावर लगेच परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

जागतिक सोयाबीन उत्पादन कसं राहील?

जागतिक पातळीवर २०२१-२२ च्या हंगामात खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली होती. पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचं उत्पादन कमी झालं. त्यामुळं पामतेलानं दराचा विक्रमी टप्पा गाठला. तर सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचेही दर तेजीत होतं. त्यामुळं २०२२-२३ मध्ये जागतिक तेलबिया पिकांची (Oil seeds Crops) पेरणी वाढून उत्पादन अधिक होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परिस्थितीही सध्या तशीच दिसतेय.

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं दिलेल्या अंदजानुसार जगात ६४३ दशलक्ष टन तेलबिया उत्पादन होण्याचा अंदाजये. तर २०२१-२२ मधील उत्पादन ६०० दशलक्ष टनांवर स्थिरावलं होतं. तसच खाद्यतेल उत्पादन २१० दशलक्ष टनांवरून २१८ दशलक्ष टनांपर्यंत वाढेल, असं युएसडीएनं म्हटलंय. सोयाबीन उत्पादनही पुढील हंगामात वाढण्याची शक्यताये. चालू हंगामात जागतिक सोयाबीन उत्पादन ३५५ दशलक्ष टन झालं होतं. ते पुढील हंगामात ३९१ दशलक्ष टनांवर पोचण्याचा अंदाजये.

सोयाबीन सोबतच पाम आणि कॅनोला उत्पादनही वाढण्याची शक्यात आहे. तर सोयातेल उत्पादन ५९१ दशलक्ष टनांवरून ६१४ दशलक्ष टनांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त केलाय. तर पामतेल उत्पादन मागील हंगामात ७६२ दशलक्ष टनांवर होतं. ते पुढील हंगामात ७९१ दशलक्ष टनांपर्यंत वाढू शकते, असा अंदाजही युएसडीएनं व्यक्त केलाय. जागतिक पातळीवर खाद्यतेल उत्पादन वाढल्यास दरातील तेजी कमी होईल. सध्या पामतेलाचे (Palm Oil) दर कमी झाले आहेतच. मात्र अंदाजाप्रमाणं सोयाबीन उत्पादन वाढल्यास सोयाबीन तेलाच्या (Soybean Oil) दरातही नरमाई येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com