जळगाव जिल्ह्यात भीषण खतटंचाई

खत टंचाईने शेतकरी यंदा सुरवातीलाच मेटाकुटीस आला आहे. प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. खते, बियाणे असोसिएशन आपल्या विक्रेत्यांचा बचाव करीत आहे. सर्व दोष कंपन्यांवर ठेवला जात आहे.

जळगाव जिल्ह्यात भीषण खतटंचाई

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होतानाच रासायनिक खतांचा (Fertilizer) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लिंकिंग, जादा दरात विक्री, अशी स्थिती आहे. १५.१५.१५ व १६.१६.१६ वगळता इतर सर्व मिश्र खतांची टंचाई आहे.

खत टंचाईने शेतकरी यंदा सुरवातीलाच मेटाकुटीस आला आहे. प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. खते, बियाणे असोसिएशन आपल्या विक्रेत्यांचा बचाव करीत आहे. सर्व दोष कंपन्यांवर ठेवला जात आहे. जळगाव शहरासह रावेर, चोपडा, अमळनेर, पारोळा, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव आदी सर्वच भागात डीएपी, १०.२६.२६ या खतांवर लिंकिंग केले जात आहे. १०.२६.२६ चे दर १४७० रुपये प्रतिगोणी आहेत. तर डीएपीचे दर १३५० रुपये आहेत. इतर खतांच्या तुलनेत याच खतांना अधिक मागणी असते. १०.२६.२६ सोबत युरिया तर डीएपीसोबत फॉस्फेटची खरेदी शेतकरी करतात. परंतु या दोन्ही खतांवर विद्राव्य व इतर नको असलेल्या खतांचे लिंकिंग केले जात आहे. एका कंपनीच्या डीएपीवर विक्रेते सर्रास नॅनो युरियाचे लिंकिंग करीत आहेत.

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, नॅनो युरियाची मागणी असावी, यासाठी हे लिंकिंग केले जात असल्याची बतावणी, सारवासारवही विक्रेते, कृषी विभाग करीत आहे. या प्रकाराने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. एका शेतकऱ्याला फक्त चार १०.२६.२६ खताच्या गोण्या एका दुकानावर मिळत आहेत. जळगाव, अमळनेर, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा भागातील खत विक्रेते १४७० रुपयांच्या १०.२६.२६ सोबत २०० ते ३०० रुपयांच्या विद्राव्य खताची लिंकिंग करीत आहेत.

खत गेले कुठे
जिल्ह्यात मागील आठवड्यातच तीन हजार ९०० टन एवढा १०.२६.२६ चा पुरवठा झाला आहे. मलकापूर येथून हे खत कृषी विभागाने पाठपुरावा करून मागवून घेतले. तसेच आणखी या आठवड्यात चार हजार टन १०.२६.२६ खत येईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असल्याचा दावा कृषी विभागाने मागील महिन्यात व खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केला होता. पण हा दावा हवेत विरला आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. याबाबत कुठेही कारवाई, समज देण्यात आलेली नाही. अलीकडेच खत दाखल झाले, मग ते गेले कुठे, कुणी साठविले, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जळगाव संवेदनशील
खते व कापूस बियाण्याच्या बाबतीत जळगाव जिल्हा संवेदनशील मानला जातो. खतांचा राज्यात सर्वाधिक वापर जळगाव जिल्ह्यात केला जातो. पूर्वहंगामी कापूस लागवड मे अखेरीसच ४० ते ५० हजार हेक्टरवर केली जाते. या कापूस पिकाला जूनच्या मध्यात खतांची गरज असते. तसेच केळी पट्ट्यात बारमाही मिश्र व सरळ खतांची गरज असते. परंतु ही गरज पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.

खत साठा पुरेसा आहे. १०.२६.२६ खताचा काहीसा तुटवडा आहे. त्याचा पुरवठा करून घेण्यावर भर आहे. पण कृत्रिम टंचाईबाबत चौकशी केली जाईल. तपासणी मोहीम राबविण्यात येईल. कुणी लेखी तक्रार केल्यास संबंधित विक्रेत्याची चौकशी करून कडक कारवाई करू.
- वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com