पुढील हंगामातही गहू टंचाई भासणार?

चालू हंगामात गव्हाची टंचाई असल्याने जागतिक बाजारात दर जवळपास ४० टक्क्यांनी वाढले. मात्र युएसडीएसह महत्वाच्या संस्थांनी पुढील हंगामातही गहू उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली.
Wheat Shortage
Wheat ShortageAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

खाद्यतेल आयातीचा फेरविचार करण्याची एसईएची मागणी

देशात मागील वर्षभरात खाद्यतेलाच्या दरात (Edible Oil Rate) मोठी वाढ झाली. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने साठा मर्यादा, आयात शुल्क कपात (Import Duty) यासारखे निर्णय घेतले. तसेच अलिकेडेच केंद्राने ४० लाख टन सोयातेल आणि सूर्यफुल तेलाच्या विनाशुल्क आयातीला परवानगी दिली. मात्र साॅल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एसईएने या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. एसईएच्या मते खाद्यतेलांचे दर मार्चच्या तुलनेत घटले आहेत. पामतेल २०१० डाॅलर प्रतिटनावरून ६२५ डाॅलरवर आले. तर सोयातेलाचेही दर ३८४ डाॅलरनी कमी झाले आहेत. तसेच सूर्यफुलतेलाचे दर २८५ डाॅलरनी घटले. त्यामुळे देशातील उद्योगाला संरक्षण देण्यासाठी सरकारने शुल्कमुक्त आयातीचा निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

युक्रेनमधील प्रक्रियादारांवर सूर्यफूल पेंड जाळण्याची वेळ

युक्रेनमधील सूर्यफुल गाळप करणाऱ्या उद्योगांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली. मागील हंगामात सुर्यफुल गाळप केल्यानंतर मिळालेल्या पेंडेची युद्धामुळे निर्यात होऊ शकली नाही. त्यामुळे हा साठा तसाच पडून आहे. आता वसंत ऋतुतील पेरण्या उरकल्या असून पीकही जोमात आहे. पुढील काही दिवासांत नवीन सूर्यफुल बाजारात येईल. मात्र मागच्या हंगामातल्या पेंडेचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पेंडेचे दर मागील तीन वर्षांतील निचांकी पातळीला पोहोचलेत. हे दर एवढे कमी आहेत की, त्यातून वाहतुक खर्चही निघणे मुश्कील आहे. मात्र नवीन हंगामासाठी हा साठा बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रक्रियादारांनी पेंड जाळण्याचा निर्णय घेतल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशात यंदा भात लागवडीत ४६ टक्के घट

देशात यंदाच्या खरीप हंगामात भाताची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी घटली आहे. देशात आतापर्यंत १९.६ लाख हेक्टरवर भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. मॉन्सूनची सुरूवात रडतखडत झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा घटलाय. परंतु आता देशाच्या बऱ्याच भागांत मॉन्सूनने वेग पकडलाय. पावसाची तुट ३६ टक्क्यावरून २ टक्क्यावर आलीय. पावसाची स्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात भाताचे लागवडक्षेत्र वाढेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

मागील हंगामात हमीभावाने फक्त एक टक्का मुग खरेदी

देशात मागील काही वर्षांपासून मुगाचे उत्पादन कमी होत आहे. पावसामुळे होणारे नुकसान हे एक कारण आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुगाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक परवडत नाही. मागच्या हंगामात देशात १४ लाख ८० हजार टन मुगाचे उत्पादन झाले. मात्र सरकारने त्यापैकी केवळ १६ हजार ८७७ टन खरेदी केली. याचा अर्थ एकूण उत्पादनापैकी केवळ १.१४ टक्के मुगालाच हमीभाव मिळाला. म्हणजेच शेतकऱ्यांना जवळपास ९९ टक्के मूग खुल्या बाजारात कमी दराने विकावा लागला. चालू हंगामात मुगाला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपये कमी दर मिळाला. यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा मुगाची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे.

पुढील हंगामातही गहू टंचाई भासणार?

जागतिक पातळीवर २०२२ हे वर्ष गहू टंचाई घेऊन आले. रशिया-युक्रेन युध्द (Russia Ukraine War) सुरु झाल्यानंतर जगात गव्हाचा पुरवठा (Wheat Supply) विस्कळीत झाला. त्यातच उष्णतेमुळे अनेक देशांतील गहू उत्पादनात (Wheat Production) घट झाली. त्यामुळे अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजे एफएओने २०२२ मध्ये जागतिक गहू उत्पादन (Global Wheat Production) ०.८ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संघटनेच्या मते मागील चार वर्षांतील ही पहिलीच उत्पादन घट असेल. मागील वर्षी ७७७.१६ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. त्यात २०२२ मध्ये ६.१६ दशलक्ष टनांची घट होईल, आणि उत्पादन ७७१ दशलक्ष टनांवर स्थिरावेल. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने म्हटंलय की, २०२०-२१ च्या हंगामात जगात ७७५.७१ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. तर चालू हंगामात उत्पादन ७७९ दशलक्ष टनांवर पोचले. पुढील हंगामातील उत्पादन ७७३.४३ दशलक्ष टनांपर्यंत राहील. म्हणजेच जागतिक गहू उत्पादन पुढील हंगामात जवळपास ६ दशलक्ष टनांनी कमी राहील.

यंदा ऑस्ट्रेलिया, भारत, मोरोक्को आणि युक्रेन या देशांमध्ये उत्पादन घटले. यापैकी भारतात उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाला फटका बसला आणि उत्पादनात मोठी घट झाली. तर ऑस्ट्रेलिया आणि मोरोक्कोमध्ये दुष्काळी स्थिती आणि उष्णतेमुळे उत्पादन घटले. तर युक्रेनमध्ये युद्धामुळे पीक काढणी होऊ शकली नाही. तसेच पुढील हंगामातील पेरणी घटली. परिणामी जागतिक पातळीवर गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२२-२३ मध्येही जगात गहू टंचाई भासण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com