
यंदा देशातील तूर उत्पादन (Tur Production) घटण्याचा अंदाज आहे. तसेच सरकार दरनियंत्रणासाठी तूर आयातही (Tur Import) वाढविण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यंदा ९ ते १० लाख टन तूर आयात होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
मग या काळात तुरीला काय दर (Tur Rate) मिळू शकतो? तुरीची विक्री कशी फायदेशीर ठरेल? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
1. कापूस दरात काहीशी सुधारणा
मागील आठवडाभर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढ उतार होते. मात्र शुक्रवारी बाजार वाढीसह बंद झाला होता.
तर आज देशातील बाजारातही कापसाच्या दरात काहीशी वाढ झाली होती. अनेक बाजारात आज कापसाची दरपातळी क्विंटलमागे १०० रुपयाने वाढली होती.
आज देशातील बाजारात कापसाला ८ हजार ५०० ते ९ हजार १०० रुपये दर मिळाला. ही दरपातळी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
2. सोयाबीनची दरपातळी कायम
देशातील बाजारात आज सोयाबीनची दरपातळी काहीशी वाढली होती. अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे दर क्विंटलमागं ५० ते १०० रुपयाने वाढले होते.
आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. चालू महिन्यात देशातील सोयाबीन दरपातळी आणखी वाढू शकते.
तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारही वाढीसह बंद झाला होता. त्यामुळं सोयाबीनच्या दरात आणखी काही वाढ होण्याचा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
3. गवारचे दर तेजीत
राज्यातील बाजारात सध्या गवारची आवक खूपच कमी आहे. मोठ्या बाजारांमधील आवक सरासरी १०० क्विंटलच्या आतच आहे.
तर इतर बाजारांमध्ये २० क्विंटलपेक्षाही कमी आवक होतेय. मात्र दुसरीकडं गवारला चांगाल उठाव मिळतोय. त्यामुळं गवारचे दर सध्या तेजीत आहेत.
सध्या गवारला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
4. कांदा दर दबावातच
सध्याचे कांद्याचे दर दबावात आहेत. राज्यातील बाजारात कांदा आवक वाढलेली आहे. आवकेचा दबाव असल्यानं दरही दबावात आले आहेत.
कांद्याची दरपातळी मागील काही दिवसांपासून थोडी सुधारली, मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. सध्या कांद्याला १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय.
बाजारातील कांदा आवक मर्यादीत होत नाही, तोपर्यंत कांदा दर या पातळीदरम्यान राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
5. देशातील तूर उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. मागील हंगामातही तूर उत्पादन घटले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा होती.
कारण मागीलवर्षापर्यंत तुरीची सरासरी आयात ४ लाख ५० हजार टनांपर्यंत होती. पण देशातील उत्पादन घटले आणि दरवाढीची शक्यता निर्माण झाली.
त्यामुळं सरकारनं मुक्त तूर आयातीचं धोरणं राबवलं. आक्रमकपणे तूर आयात केली. त्यामुळं मागीलवर्षात विक्रमी ८ लाख ६० हजार टन तूर आयात झाली.
म्हणजेच अंदापेक्षा दुप्पट तूर देशात आणली. त्यामुळं बाजारातील गणितच बिघडलं होतं. चांगला दर मिळण्याच्या आशेवर पाणी फेरलं. यंदाही देशातील तूर उत्पादन घटणार आहे.
मात्र यंदा सरकारला मागणी आणि पुरवठ्यातील तूट भरून काढणं शक्य होणार नाही. सरकारला ९ ते १० लाख टनांपेक्षा जास्त आयात करता येणार नाही.
ही शक्यता लक्षात घेऊनच सध्या तुरीला ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो.
तर हंगामात तुरीचे दर ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्ते केला.
दरवाढीच्या काळात सरकार स्टाॅक लिमिट, साठ्याची माहिती आदी निर्णय घेऊन बाजारावर मानसिक दबाव आणू शकते.
त्यामुळे शेतकरी म्हणून सरकारला या निर्णयाकडे लक्ष असणे गरजेचे आहे, असंही अभ्यासकांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.