Turmeric Market: देशातील हळद उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज

यंदा हळद पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. हळदीची लागवडही यंदा मागील वर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पोषक वातावरण असल्याने उत्पादकता अधिक येण्याची शक्यता आहे. पण यंदा खरंच हळद उत्पादनात वाढ होईल?
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon

कापूस बाजार स्थिर

1.  देशातील कापूस बाजार (Cotton Market) आज स्थिरावला होता. काही बाजारांमध्ये दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र मोठी घट कुठे दिसून आली नाही. काल कापसाचे दर (Cotton Rate) क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत नरमले होते. मात्र आज कापूस दर आहे त्या पातळीवर होते. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. तर राज्यातील भावपातळी ७ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. ही दर पातळी पुढील काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली. 

तुरीचे दर तेजीतच

2. देशातील बाजारात सध्या तुरीची आवक काहीशी वाढत आहे. मात्र दुसरीकडे पुढील काळात आयातीची गती कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुरीचे दर टिकून आहेत. तर काही बाजारांमध्ये तुरीच्या दरात किंचित सुधारणाही पाहायला मिळाली. सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तुरीचे दर या पातळीवर टिकतील, तसेच या दराववर तुरीला आधार मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

हिरव्या मिरचीची आवक वाढली

3. राज्यातील बाजारांमध्ये मागील आठवड्यापासून मिरचीची आवक काहीशी कमी झालेली दिसते. मात्र सध्याची आवक ही सरासरीपेक्षा काहीशी जास्त दिसते. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीचे दरही काहीसे कमी झालेले आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र बाजारात पुढील काळात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर काहीसे कमी होऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

लसणाचे दर टिकून


4. बाजारात सध्या लसणाला सरासरी दर मिळत आहे. मागील महिन्यापासून लसणाचे दर टिकून आहेत. मात्र मागील तीन महिन्यांच्या सरासरीचा विचार करता दरात काहीशी वाढ झाली आहे. सध्या लसणाला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार २०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यंदा लसणाचे उत्पादन चांगले असल्याने दरात जास्त वाढ होण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे लसणाचे दर पुढील काळात याच भावपातळीदरम्यान राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

हंगामात हळदीचे दर टिकतील

5. देशातील बाजारात सध्या हळदीची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत. मात्र यंदा मागील हंगामातील शिल्लक साठा आणि उत्पादन वाढीची शक्यता, यामुळे दर गेल्यावर्षीपेक्षा कमीच दिसत आहेत. यंदा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने हळद उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जातेय. यंदा देशात ३ लाख ५६ हजार हेक्टरवर हळद पीक आहे. मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र जवळपास ६ टक्क्यांनी अधिक असल्याचं जाणकारांनी सांगितलं. चालू हंगामात हळद लागवडीपासून पाऊस आणि पोषक वातावरण होते. यामुळे हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.

Turmeric Market
Turmeric Harvesting : सुधारित पद्धतीने हळद काढणी

पण ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हळद पिकाचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र फारसे नुकसान झाले नाही. सध्या हळद पिकास पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे. तसेच निर्यातही वाढण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी देशातून १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली होती. मात्र चालू हंगामात गेल्यावर्षीपेक्षा १० टक्के अधिक निर्यात होण्याची आशा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हळदीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज आहे. सध्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतो. हा दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

……………..

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com