Soybean Rate : सोयाबीन बाजारात काय घटतंय ?

देशात होणाऱ्या पावसामुळं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयातेलाला मागणी वाढली. त्यामुळं सोयातलाच्या दरात सुधारणा झाली.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

तुरीचे दर तेजीतच

भविष्यातील तुरीच्या दरातील (Tur Rate) तेजी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं आयात तूर (tur Import) खरेदीची तयार केली. त्यासाठी सरकारनं आधारभूत दरही जाहीर केला. आफ्रिकेतून आयात (Tur Import Africa) होणाऱ्या तुरीसाठी ५ हजार ९८० रुपये दर केंद्रानं जाहीर केला. मात्र आफ्रिकेत काही कारणास्तव तूर आणि तूर डाळीच्या (Tur Dal) निर्यात प्रक्रियेत आडचणी येत आहेत. दुसरीकडं देशात तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीचे दर सध्या ६ हजार ५०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीच्या दरातील तेजी यंदा कायम राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

Soybean Rate
Crop Damage : पावसाचे द्राक्ष बागांवर ग्रहण

कोबीची आवक घटली

राज्यात सध्या सुरु असलेल्या पावसानं भाजीपाला पिकाला मोठा फटका दिला. यातून कोबीचे पीकही सुटू शकले नाही. सध्या बाजारातील कोबीची आवक ही सरासरीपेक्षा खूपच कमी होतेय. पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी मोठ्या बाजारांतील आवक १०० क्विंटलपेक्षा कमी दिसते. मात्र इतर बाजारात २० क्विंटलपेक्षाही कमी कोबी विक्रीसाठी येतेय. तर कोबीला सध्या सरासरी १६०० रुपये ते ३ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळात कोबीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापूस दर स्थिर

देशातील बाजारात सध्या नव्या कापासाची आवक पावसामुळं काहीशी कमी दिसत आहे. शेतकरी दिवाळीचा सण आणि रब्बी पेरणीसाठी काही काळ जास्त कापूस विक्री करू शकतात. मात्र गरज भागल्यानंतर दरात सुधारणा होईपर्यंत शेतकरी कापूस रोखू शकतात, असा अंदाज उद्योग पातळीवरून व्यक्त होतोय. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ते ९ हजार ७०० रुपये दर मिळतोय. मात्र मागील हंगामात चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तसचं शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

चवळीच्या दरात सुधारणा

चवळीच्या शेंगाचे दर सध्या तेजीत आहेत. चवळीच्या शेंगाची आवक सध्या नगण्य पातळीवर पोचली आहे. मात्र शेंगांना मागणी कायम आहे. चवळीच्या पिकालाही पावसाचा जोरदार तडाखा बसतोय. परिणामी शेतकऱ्यांना पिकाची काढणी शक्य झालं नाही. त्यामुळं दरही तेजीत आलेत. सध्या चवळीच्या शेंगांना सरासरी २ हजार ५०० रुपये ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. चवळीच्या शेंगांचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

सोयाबीन बाजारात काय घटतंय

देशात तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. मात्र सोयातेलाचे दर वाढले आहेत. रशियाने युक्रेनमधील टर्मिनल पोर्टवर हल्ला केल्यानं तेथील कामकाज ठप्प पडलय. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफुल तेलाची होणारी निर्यात थांबली. यामुळं बाजारात सूर्यफुल तेलाची टंचाई निर्माण होऊन सोयातेलाला मागणी वाढली. परिणामी सोयातेलाचे दरही वाढले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे दर ७०.९७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले आहेत. तर देशात १२३० ते १२४० रुपये प्रतिदहा किलोने सोयातेलाची विक्री होत आहे. मात्र, सोयाबीन बाजार स्थिर दिसतोय. सध्या सुरु असलेल्या पावसानं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान केलं. पिकाचं नुकसान होत असताना सोयाबीनच्या किमान दरात सुधारणा पाहायला मिळाली. कमाल दर मात्र वाढले नाहीत. दुसरीकडं दिवाळी सणासाठी सोयाबीनची विक्री वाढल्यानं बाजारातील आवक वाढलेली दिसते. त्यामुळं अनेक बाजारांमध्ये सध्या सोयाबीन दर दबावात दिसतात.

सोयाबीनला ४ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. सोयातेलाला मागणी वाढल्यानं दरात वाढ झाली. मात्र सोयापेंडला उठाव दिसत नाही. त्यामुळं सोयाबीनचे दर स्थिर आहेत. दिवाळीनंतरही बाजारातील सोयाबीन आवक मर्यादीत राहील्यास दर वाढू शकतात. मात्र आवक वाढल्यास दर कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com