खरीप पेरण्यांची स्थिती काय?

देशात अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या पेरणीमध्ये सोयाबीन आणि कापूस आघाडीवर आहे.
खरीप पेरण्यांची स्थिती काय?
Kharif SowingAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

ऑस्ट्रेलियातील हरभरा उत्पादन घटले

जगात हरभरा उत्पादनात (Chana Production) ऑस्ट्रेलिया महत्वाचा देश आहे. येथून अनेक देशांमध्ये हरभरा निर्यात (Chana Export) होते. भारतातही येथून काही प्रमाणात आयात होते. मात्र देशात आयातीवर मोठे शुल्क असल्याने त्याचे प्रमाण कमी आहे. यंदा मात्र ऑस्ट्रेलियातही हरभरा उत्पादन जपळपास २७ टक्क्यांनी घटल्याचे येथील सरकारी संस्थेने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियात मागील हंगामात जवळपास १०.६३ लाख टन हरभरा उत्पादन झाले होते. तर यंदा ६.०६ लाख टनांवरच उत्पादन स्थिरावले. म्हणजेच यंदा येथे ४.५६ लाख टन कमी उत्पादन झाले. त्याउलट भारतात उत्पादन अधिक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून उत्पादन घटीचा लाभ भारत घेऊ शकतो. त्यासाठी सरकारी पातळीवर पुरक धोरण आखावे लागेल, असे जाणकारांनी सांगितले.

गव्हाच्या बदल्यात पामतेल देण्याची इंडोनेशियाची तयारी

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात गहू टंचाई (Wheat Shortage) जाणवते, हे सर्वश्रृत आहे. पण गव्हाची टंचाई पुढील दोन हंगमांतही राहू शकते, असा अंदाज विविध संस्था आणि देश व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाच्या दरातील तेजी इतर शेतमालाच्या तुलनेत टिकून आहे. त्यामुळे आयातीवर अवलंबून असलेले अनेक देश आत्तापासूनच गव्हाची तजवीज करण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी अनेक देशांची भीस्त भारतावर आहे. युईए, टर्की, बांगलादेश या देशांबरोबरच आता जगातील सर्वांत मोठा पामतेल उत्पादक इंडोनेशियाही भारताकडे गव्हासाठी विचारणा करत आहे. इंडोनेशिया भारतीय गव्हाच्या बदल्यात पामतेल देण्यास तयार आहे. तशा वाटाघाटी सध्या सुरु आहे. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर भारताला अधिक पामतेल उपलब्ध होईल आणि खाद्यतेल महागाई कमी होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

सरकारने यंदा एक टक्काही तूर खरेदी केली नाही

सरकारने यंदा तूर आयात करून बाजारभाव पाडले, असेच म्हणावे लागेल. कारण गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू हंगामातील आयात दुप्पट झाली. चालू हंगामात जवळपास ८.४० लाख टन तूर आयात केली. मात्र सरकारने अत्यंत तोकडी तूर खरेदी केली. सरकारच्याच अंदाजाप्रमाणे यंदा देशात ४३ लाख ५० हजार टन तूर उत्पादन झाले. यापैकी सरकारने केवळ ३५ हजार टनांचीची खरेदी केली. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या १ टक्काही खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण तूर खुल्या बाजारात विकावी लागली. खुल्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा १००० रुपयांपर्यंत कमी दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. परिणामी चालू खरिपात तुरीची लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडली.

पामतेलाचे दर कमी झाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आल्यानंतर अनेक शेतीमालांच्या तेजीला ब्रेक लागला. चालू हंगामात पामतेलानेही दराचा विक्रम केला होता. मात्र आता पामतेलातील तेजी विरण्याला सुरुवात झाली. कारण मलेशियाच्या बाजारात ७ हजार रिंगीटचा विक्रमी टप्पा गाठलेल्या पामतेलाच्या दराने आता गट्यांगळ्या खायला सुरुवात केली. सध्या पामतेलाचे दर ५ हजार रिंगीटच्या दरम्यान आहेत. तर सप्टेंबरचे वायदे ४८७६ रिंगीटने झाले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी होऊनही मागणी मात्र कायम आहे. आयातीवर अवलंबून असलेल्या भारतानेही खरेदी वाढवली नाही.

खरीप पेरण्यांची स्थिती काय?

माॅन्सूनने (Monsoon) आत्तापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक भाग व्यापला. मात्र तुरळक ठिकाणीच पेरणीयोग्य पाऊस झाला. महाराष्ट्रासह खरिपासाठी (Kharif Season) महत्वाच्या असेलेल्या अनेक राज्यांत पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे यंदा या राज्यांत खरिपाचा पेरा (Kharif Sowing) थांबला. अनेक भागांत पेरण्या उलटायला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. तरीही अनेक राज्यांच्या काही भागांत पेरण्या झाल्या. राज्य सरकारांनी दिलेल्या पेरण्यांच्या आकडेवारीवरून यंदा कापूस आणि तेलबिया लागवडी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या हंगामात धान्य आणि कडधान्य पिकांना हमीभावही मिळाला नाही. त्यातच सोयाबीन आणि कापसाला ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अधिक दर मिळाला. त्यामुळे यंदा शेतकरी या पिकांची लागवड वाढवतील, हे स्पष्ट झालं होत. या पिकांची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढली.

२० जूनपर्यंतचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ३० टक्क्यांनी लागवडी पुढे आहे. तर एकूण तेलबिया लागवड ३० टक्क्यांनी वाढली. देशात तेलबिया आणि कापूस लागवड वाढली असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र वेगळ्याच घडामोडी सुरु आहे. कापसाचा भाव नरमला. तर खाद्यतेलाचे दरही कमी होत आहेत. त्यामुळे तेलबियांच्या दरातील तेजीलाही ब्रेक बसला. परंतु बाजारातील टंचाई लक्षात घेता, दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. कापूस आणि तेलबिया उत्पादन हवामानावर अवलंबून राहिल. त्यामुळे पुढील काळातील हवामान कसे राहील हे पाहावे लागेल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com