Cotton Market : कापूस दरात चैतन्य कधी येणार?

शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दराची अपेक्षा आहे. मात्र चालू महिन्यात देशातील कापूस दर नरमले. नोव्हेंबरच्या तुलनेत दरात क्विंलटमागे ८०० ते एक हजार रुपयांची नरमाई आली. त्यातच उद्योग दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
 Cotton Market
Cotton MarketAgrowon

शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दराची अपेक्षा आहे. मात्र चालू महिन्यात देशातील कापूस दर (Cotton Rate) नरमले. नोव्हेंबरच्या तुलनेत दरात क्विंलटमागे ८०० ते एक हजार रुपयांची नरमाई आली. त्यातच उद्योग दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाही परिणाम कापूस दरावर जाणवला. पण सध्या कापसाला काय दर मिळत आहे? चालू महिन्यात कापूस बाजारातील (Cotton Market) स्थिती कशी राहील? कापूस दर केव्हा वाढू शकतात? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

 Cotton Market
Cotton Market : कापूस दरात सुधारणा

1. सोयाबीन सुधारण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन दरात मोठी वाढ झाली होती. सोयाबीन दराने काल मागील तीन महिन्यातील उच्चांकी १४.९१ डाॅलर प्रतिटनांचा दर गाठला होता. तर सोयापेंडही ४७१ डाॅलर प्रतिटनावर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होत असताना देशातील बाजारातही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे दरही सुधारले होते. त्यामुळे सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

 Cotton Market
Cotton Rate : कापूस दर कधी वाढतील?

2. तुरीचे दर टिकून

देशातील बाजारात सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. देशातील उत्पादन घटीचा अंदाज असल्याने सरकारने तूर आयातीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आयात जोमात सुरु आहे. तर दुसरीकडे देशातील नवी तूरही बाजारात येत आहे. मात्र तरीही तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ६ हजार ९०० ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा दर पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त  केला. 

 Cotton Market
Tur Rate : देशात तुरीचे दर तेजीतच

3. मका दर काहीसे नरमले

देशात सध्या खरिपातील मक्याची आवक सुरु आहे. मात्र निर्यातही वेगाने होत असल्यामुळे देशातील बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा २०० ते २५० रुपयांनी जास्त आहेत. नेमकं याचं मोठं भांडवल करत पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाने मका निर्यातबंदी करण्याची मागणी केली. सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमी आहे. मात्र याचा काहीसा मानसिक परिणाम बाजारावर जाणवला. सध्या मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार १५० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. पुढील काळात मक्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला

 4. ज्वारी यंदा भाव खाणार

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ज्वारीला सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत दर होते. मात्र बाजारातील कमी आवक आणि वाढत्या मागणीमुळे मागील दोन महिन्यांमध्ये ज्वारीच्या दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांची सुधारणा झाली आहे. सध्या बाजारात खरिपातील ज्वारीची आवक होत आहे. मात्र तरीही ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. खरिपातील उत्पादन कमी राहल्याचा अंदाज तसेच रब्बी पेरणीला होणारा उशीर आणि वाढती मागणी, यामुळे यंदा ज्वारीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 
 

5. देशातील कापूस हंगाम सुरु होऊन आता दोन महिने उलटले आहेत. मात्र बाजारातील कापूस आवक यंदा कमी आहे. गेल्या हंगामात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या आवकेच्या तुलनेत यंदा ४० टक्के कमी कापूस बाजारात आला. यंदा कापूस उत्पादन पावसामुळे कमी राहीले. त्यातच खर्च वाढला. वेचणीचा दर तर आता किलोला १२ ते १५ रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दराची अपेक्षा आहे. मात्र चालू महिन्यात देशातील कापूस दर नरमले. नोव्हेंबरच्या तुलनेत दरात क्विंलटमागे ८०० ते एक हजार रुपयांची नरमाई आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री रोखली. परिणामी दरात जास्त घसरण झाली नाही. मात्र उद्योगांनी कापसाचे दर जास्त असल्याची री ओढत आयातशुल्क रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे कापूस बाजारावर मानसिक दबाव आला. मागील दोन दिवसांमध्ये दर क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत नरमले. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार २०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. मात्र जाणकारांच्या मते सरकार कापूस आयात शुल्क रद्द करणार नाही. तसेच हा निर्णय घेतला तरी कापूस दरावर फारसा परिणाम होणार नाही. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात चढ उतार राहण्याचा अंदाज आहे. मात्र पुढील महिन्यात कापूस बाजारात चैतन्य येऊ शकते. कापसाला सरासरी किमान ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com