Tur Rate : तूर दरवाढीचा लाभ कुणाला?

देशातील बहुतेक शेतकऱ्यांनी तूर कमी भावात विकली. परंतु आता बाजारातील कमी आवक आणि वाढलेली मागणी तसेच कमी पावसामुळे लागवड कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली.
Tur Rate
Tur RateAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

कडधान्य दरात १० टक्के सुधारणा होण्याची शक्यता

देशात यंदा माॅन्सून (Monsoon) उशीरा सक्रिय झाला. जून महिना संपेपर्यंत अनेक भागांत पेरण्या (Sowing) झाल्या नव्हत्या. जुलैमध्ये पाऊस सुरु झाल्याने पेरण्यांनी वेग घेतला. परंतु उशीर झाल्याने कडधान्य पेरा (Pulses Sowing) काहीसा घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच मागील हंगामात मिळालेला कमी दर हेही एक कारण असू शकते. या परिस्थितीत कडधान्य बाजारात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कडधान्य उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला. ऑगस्च महिन्यापर्यंत कडधान्य दरात १० टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा दावा जाणकारांनी केला. असे झाल्यास हरभरा शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

भुतानमधून बटाटा आयातीला सरकारची परवानगी

केंद्र सरकारने भूतानमधून बटाटे आयातीला (Potato Import) परवानगी दिली आहे. भूतानमधून ताज्या आणि शीतगृहात साठवलेल्या बटाट्यांची जून २०२३ पर्यंत आयात करता येईल. या आयातीसाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही. वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विदेश व्यापार महासंचालनालयाने त्यासंबंधीची अधिसूचना नुकतीच काढलीय. बटाट्याच्या मुक्त आयातीमुळे स्थानिक बाजारात बटाट्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक बटाटे पिकवले जातात. त्यानंतर प. बंगाल, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांत बटाट्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. पुणे जिल्ह्यातील मंचर आंबेगाव पट्टा बटाटा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे.

केंद्र सरकारने कापूस आयातीची मुदत वाढविली

यंदा कापसाने १० वर्षांतील विक्रमी दराचा टप्पा गाठल्यावर कापड उद्योगाने सरकारदरबारी धाव घेतली. कापड उद्योगाच्या (Textile Industry) आग्रही मागणीवरून केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयातशुल्क (Cotton Import Duty) रद्द केले. या आयातील आणखी एक महिना मुदतवाढ दिल्यामुळे आता ३१ ऑक्टोबरपर्यंत शुल्कमुक्त आयात होईल. वास्तविक पाहता आता कापूस दरातील तेजी विरली आहे. दर कमी झाले. या परिस्थितीत मुदतवाढ द्यायला नको होती. परंतु देशात पाऊस लांबल्याने कापूस उशीराने बाजारात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असा दावा सरकारने केला. परंतु या निर्णयाचा मानसिक दबाव बाजारावर राहू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

गहू पीठ निर्यातीवर केंद्राकडून निर्बंध

जागतिक पातळीवर रशिया-युक्रेन युध्दामुळे गव्हाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे भारतातून गहू आणि गव्हाच्या पदार्थांची निर्यात वाढली. परिणामी देशातही दर सुधारले. मात्र सरकारने गहू निर्यातबंदी केल्यानंतर गहू आणि पीठाचेही दर नरमले होते. तरीही सरकारने गहू पीठ, मैदा, रवा आणि इतर गहू पदार्थांच्या निर्यातीवर निर्बंध आणले. परंतु निर्यातीवर कुठलीही बंदी नाही. मात्र निर्यात करताना मंत्रिस्तरिय समितीची परवानगी बंधनकारक करण्यात आली, असे परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसुचनेत म्हटले आहे. या निर्णयामुळे निर्यात कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र याचा फटका थेट गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

तूर दरवाढीचा लाभ कुणाला?

देशात यंदा तुरीचे उत्पादन (Tur Production) ३२ ते ३५ लाख टनांच्या दरम्यान राहीले. तर आयात तब्बल ८.४० लाख टन झाली. ही आयात (Tur Import) गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट होती. यामुळे उत्पादन घटूनही देशांतर्गत बाजारात तुरीचे दर दबावात राहीले. शेतकऱ्यांच्या हाती तूर आल्यापासून ते जून महिन्यापर्यंत खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा ३०० ते ७०० रुपयाने कमी होते. सध्या बाजारात तुरीची आवक कमी झाली. त्यातच जून महिन्यात पावसाने दडी दिली. देशात कर्नाटक आणि महाराष्ट्र ही तूर उत्पादनात आघाडीवरील राज्ये. या दोन्ही राज्यांत जून महिन्यात नव्हता. त्यामुळे तूर लागवड माघारली. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस झाला. मात्र तरीही यंदा तूर लागवड कमी होण्याचा अंदाज उद्योगातून व्यक्त होत आहे. तसेच दाल मिल्स आणि स्टाॅकिस्ट यांची खरेदी सुरु आहे.

याचा परिणाम म्हणून तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. बहुतांश शेतकऱ्यांनी तूर कमी भावात विकली. आता हा साठा सध्या मोठे व्यापारी आणि कंपन्यांकडे आहे. ते कमी दरात तूर बाहेर काढण्यास इच्छूक नाहीत. तर दुसरीकडे बाजारात आवक कमी आणि मागणी वाढल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे देशात तुरीचा सर्वसाधरण दर सध्या ६१०० ते ६५०० रुपयांच्या दरम्यान पोचल्याचे जाणकारांनी सांगितले. तर राज्यात बुधवारी आणि गुरुवारी तुरीचा सर्वसाधारण भाव ६२०० ते ६३०० रुपये राहीला. दरात सुधारणा झाल्याचा लाभ तूर हाती असलेल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, असेही जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com