
सोयाबीनचा पेरा साडेनऊ टक्क्यांनी वाढला
देशात तेलबिया लागवडीने आता गती घेतली. २२ जुलैपर्यंत मागील वर्षीपेक्षा जवळपास साडेपाच टक्के अधिक पेरा झाला. मात्र सोयाबीनची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत साडेनऊ टक्क्यांनी अधिक झाली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आत्तापर्यंत १०८ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. जो मागच्या वर्षी याच काळात ९९ लाख हेक्टरवर होता. मागील हंगामातील सोयाबीनला चांगला दर मिळला होता. त्यामुळं यंदा शेतकरी सोयाबीन पेरणी वाढवतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्याप्रमाणं लागवडीत वाढ दिसत आहे. मात्र पेरणी वाढली तरी महाराष्ट्रातील सोयाबीनला पावसाचा तडाखा बसतोय. याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.
गव्हाचे दर १५ टक्क्यांनी सुधारले
भारतात रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन कमी झालं. त्यातच देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. परिणामी देशातील अतिरिक्त साठा कमी झाला. सध्या बाजारातील गव्हाची आवक कमी झाली. पावसाळ्यात गहू पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात, यामुळे प्रक्रिया उद्योगाकडून गव्हाची मागणी वाढली. मैदा, बिस्कीट, पीठ आणि रव्यासाठी गहू खरेदी केला जात आहे. परिणामी मागील दीड महिन्यांतच गव्हाच्या दरात जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाल्याचं जाणकारांनी सांगितलं. शुक्रवारी एकाच दिवासात गव्हाचे दर क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधारले होते.
पोल्ट्रीचे दर उत्पादन खर्चापेक्षा ४० रुपयांनी कमी
कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं पोल्ट्रीखाद्याचे दर मागील वर्षभरात वाढले. पशुखाद्य दरवाढ ३० ते ४० टक्क्यांपर्यंत झाली. मात्र विविध कारणांनी पोल्ट्री उत्पादनांची मागणी कमी झाली. त्याचा परिणाम दरावर झालाय. महाराष्ट्रात सध्या जिवंत पक्षाचा दर म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा दर हा ५५ ते ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला. हा दर उत्पादन खर्चापेक्षा ४० रुपयांनी कमी असल्याचं पोल्ट्री उद्योजकांनी सांगितलं. देशात मागील काही महिन्यांत पोषक वातावरणामुळे पोल्ट्री उत्पादन वाढले. त्यामुळे बाजारात पुरवठा दाटला. परिणामी दर दबावात आल्याचं जाणकारांनी सांगितलं.
पुढील हंगामातही विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज
देशात पुढील गाळप हंगामातही विक्रमी साखर उत्पादन होण्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्मानं व्यक्त केलाय. उपग्रहाच्या आधारे काढलेल्या अंदाजानुसार २०२२-२३ च्या हंगामासाठी गेल्यावर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक ऊस लागवड झाली. पुढील हंगामासाठी ५८ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. तर चालू हंगामासाठी ५५ लाख ८३ हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध होता. तर पुढील हंगामात साखर उत्पादन जवळपास ४०० लाख टनांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. चालू हंगामात ३९४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता, असं इस्मानं सांगितलं.
सोयापेंडवरून का ठरतात सोयाबीनचे दर?
सोयाबीनमध्ये (Soybean) १८ ते २० टक्के तेल आणि ८० ते ८२ टक्के पेंड (Soymeal)असते. त्यामुळं सोयाबीनचा दर (Soybean Rate) हा प्रामुख्यानं सोयापेंडच्या दरावरूनच (Soymeal Rate) ठरत असतो. देशात नाॅन जीएम सोयाबीनची (Non GM Soybean) लागवड होते. त्यामुळं यापासून तयार होणारी पेंडही नाॅन जीएम (Non GM Soymeal) असते. परंतु निर्यात करताना नेहमी भारताच्या सोयापेंडच्या दराची इतर देशाच्या जीएम मालाशी तुलना केली जाते. यावरून निर्यातीची पॅरिटी आहे की नाही, हे ठरते. अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजेच युएसडीएनं २०२२-२३ मध्ये जागतिक सोयापेंड उत्पादन आणि वापर ४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केलाय.
मात्र जागतिक सोयापेंड उत्पादनाचा अंदाज दरमहिन्याला कमी केला जातोय. कारण अमेरिकेत पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळं जागतिक उत्पादन आणि गाळप कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सोयापेंड उत्पादनाचाही अंदाज कमी झाला. त्यामुळं पुढील काळात ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन कसं येतं यावरून सोयापेंड उत्पादन ठरेल. युएसडीएनं यंदा भारतातही सोयापेंड उत्पादन आडीच लाख टनांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र वापर साडेतीन लाख टनांनी वाढेल, असं म्हटलंय. वातावरणामुळे भारताच्या उत्पादनाच्या आकड्यांत कपात होऊ शकते. मात्र वापर वाढल्याचा अंदाज लक्षात घेता सोयापेंडला यंदा चांगली मागणी राहू शकते. यामुळं सोयाबीन दरालाही आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.