मे महिन्यात चीनची सोयाबीन आयात का वाढली ?

जगात सर्वाधिक सोयाबीन आयात (Soybean Import) चीन करतो. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यांत चीनची सोयाबीन आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली. मात्र मे महिन्यात अचानक वाढली. चीनची सोयाबीन आयात वाढण्याचं नेमकं कारण काय?
मे महिन्यात चीनची सोयाबीन आयात का वाढली ?
Soybean ImportAgrowon

आजचं मार्केट बुलेटिनः दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडी.

१. इंडोनेशिया पामतेल निर्यातशुल्क कमी करणार

इंडोनेशियानं पामतेल निर्यातशुल्क (Palm Oil Export) कमी करण्याचं जाहिर केलं. टनामागे ५७५ डाॅलर असलेलं शुल्क ४८८ डाॅलरपर्यंत आणणारे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची लगेच प्रतिक्रिया उमटली. बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर बुधवारी पामतेलाचे ऑगस्टचे वायदे १ टक्क्याने घसरुन ६४२८ रिंगीट प्रतिटनावर आले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. डाॅलरमध्ये १४६३.५७ प्रतिटन दर झाला. तर गुरुवारी हाच दर ६२४३ रिंगीटपर्यंत खाली आला. म्हणजेच इंडोनेशियाच्या निर्णयामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर नरमले. येणाऱ्या हंगामात इंडोनेशियात पामतेल उत्पादन वाढीची शक्यता आहे. त्यामुळंही पामतेलाचे दर कमी झाल्याचा दावा काही जाणकारांनी केलाय.

२. उत्पादन घटल्यानं बटाटा दरात वाढ

देशात बटाटा उत्पादनात (Potato Production) पश्चिम बंगालचा दुसरा नंबरा लागतो. मात्र यंदा लागवडीच्या काळात झालेल्या पावसाने लागवडी खराब केल्या. तसंच नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान यावेळी पाऊस पडला. त्याचा फटका पिकाला बसला. पावसाने केवळ बटाटा उत्पादनावरच नव्हे तर हाती आलेल्या पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये यंदा उत्पादनात २० टक्क्यांची घट आली. उत्पादन केवळ ८५ ते ९० लाख टनांवर स्थिरावलं. तर मागील हंगामात उत्पादन १ कोटी १० लाख टन झालं होतं. उत्पादन घटल्यानं दरही तेजीत आहेत. सध्या बटाट्याला वाणानुसार २२ ते ४२ रुपये दर मिळतोय. मागील वर्षी हाच दर १५ ते २८ रुपये होता, असं जाणकारांनी सांगितलं.

३. साखर निर्यातीत सहकारी कारखानेही आघाडीवर

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यानं गेल्या तीन वर्षांत साखर निर्यात (Sugar Export) वाढली. या निर्यातीत सहकारी साखर कारखान्यांचा वाटा ४१ टक्क्यांवर पोचला. निर्यातीचा फायदा सहकारी साखर कारखान्यांनाही होतोय. त्यामुळं केंद्रानं जास्तीत जास्त सहकारी कारखान्यांना निर्यातीची परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातून होतेय. राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन हंगामात भारतानं विक्रमी २२२ लाख टन साखरेची निर्यात केली. निधीची अडवणूक आणि त्यावर व्याज वाढल्यामुळं उद्योग गुदमरत होता, अशा मोठ्या इन्व्हेंटरीला ट्रिम करण्यात या निर्यातीमुळं मदत झालीये. सहकारी कारखानेही निर्यात करत असल्यानं त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. यातून शेतकऱ्यांचा सहकार टिकेल, असं उद्योगानं म्हटलंय.

४. खरिपासाठी खतं, बियाण्याच्या किमतीत मोठी वाढ

शेतीमालाच्या बाजारभावात चढ-उतार होण्याचं दुष्टचक्र, वाहतूक व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वीज आणि सिंचनासाठी होणारा मनस्ताप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच. शिवाय यात आता २० ते ८० टक्क्यांनी भडकलेल्या निविष्ठांची भर पडलीये. रासायनिक खतांच्या किमती १२ टक्क्यांपासून ते ८८ टक्क्यांपर्यंत वाढल्या. दुसऱ्या बाजूला कापूस व सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना यंदा ५ ते ११ टक्के जादा किंमत मोजून बियाणे खरेदी करावं लागतंय. तणनाशकांच्या किमतीदेखील ४४ टक्क्यांपर्यंत वाढल्यात. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची गळती वाढेल, अशी भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

५. चीनची सोयाबीन आयात मे मध्ये का वाढली ?

जगात सोयाबीनचा मुख्य ग्राहक म्हणजे चीन. चीन दरवर्षी जवळपास ९ ते १० कोटी टन सोयाबीन आयात करतो. चीन हा ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक. मात्र चालू हंगामात ब्राझीलचं उत्पादन घटल्यानं चीननं अमेरिकेकडूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात केली. अर्जेंटीनातूनही सोयाबीन खरेदी केलं. मात्र यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीतये. तसंच सोयापेंडच्या वाढलेल्या दरामुळं पशुखाद्य क्षेत्रातून मागणी घटली. त्यामुळं चीनची सोयाबीन आयातही कमी झाली. चालू वर्षी जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्यांत चीनने ३८० लाख टन सोयाबीन आयात केली. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा आयात अर्ध्या टक्क्यानं कमी झाली. मे महिन्यात मात्र आयातीचा आकडा मोठा दिसतो. एप्रिल महिन्यात जहाजं उशीरा दाखल जाल्यानं मे महिन्यातील आयात एप्रिल तुलनेत २० टक्क्यानं अधिक झालीये. एप्रिल महिन्यात चीनने ८०.८ लाख टन सोयाबीन आयात केली होती. तर मे महिन्यात ९६.७ लाख टनांवर आयात पोचली. चीनमध्ये सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाल्यानं अनेक प्लांट्सनी काम काही महिने बंद केलं होतं. तर काही प्लांट्स कमी क्षमतेनं सुरु होते. ब्राझील आणि अर्जेंटीनात उत्पादन घटल्यानं वाढीव दरानं सोयाबीन घ्यावं लागत होतं. सोयापेंडचे दर वाढल्यानं येथील पशुखाद्यात मका आणि भाताचा वापर वाढला होता, असं येथील प्रक्रियादारांनी सांगितलं. चीनची सोयाबीन आयात अशीच वाढल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com