Rice : भारतीय तांदळाला का मिळतेय पसंती?

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तांदळाचीही टंचाई जाणवत आहे. गव्हाचा पुरवठा कमी झाल्यानंतर मागणी तांदळाकडे वाढली. मात्र महत्वाच्या तांदूळ उत्पादक देशांतच उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचेही दर तेजीत आहेत.
Rice Export
Rice ExportAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

हरभरा उत्पादकांची सरकारकडून निराशा

देशात यंदा हरभरा उत्पादकांच्या वाट्याला निराशाच आली. जवळपास संपूर्ण हंगामात हरभऱ्याचे दर हमीभावाच्या खालीच राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफडेच्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. मात्र सरकारची खरेदी कमी राहिली. सरकारने हमीभावाने हरभरा खरेदीसाठी २९ लाख टनांचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ २५ लाख टन हरभरा खरेदी केला. मध्य प्रदेशात सर्वाधिक ८ लाख टन खरेदी झाली. तर महाराष्ट्रात ७.३२ लाख टन आणि गुजरातमध्ये ५.५८ लाख टन हरभरा नाफेडने खरेदी केला. तर राजस्थानमध्ये अडीच लाख टनांची खरेदी झाली. एकूण उत्पादनाच्या तुलनेत सरकारी खरेदीचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करून खुल्या बाजारात हरभरा विकावा लागला.

निर्यातबंदीनंतरही सरकारी गहू खरेदी कमीच

गहू निर्यातबंदीनंतरही सरकारला गहू खरेदीचं उद्दीष्ट गाठता आलं नाही. सरकारने १९५ लाख टन गहू खरेदीचे सुधारित उद्दिष्ट ठेवले होते. मात्र ४ जुलैपर्यंत सरकारला केवळ १८७ लाख ८८ हजार टन गहू खरेदी करता आला. यापैकी पंजाबमध्ये सर्वाधिक ९६ लाख ४६ हजार टनांची खरेदी झाली. त्यानंतर मध्य प्रदेशात ४६ लाख टन आणि हरियानात ४२ लाख टन गहू खरेदी झाला. आता बहुतांश ठिकाणी खरेदी थांबली आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा निम्माही गहू खरेदी करता आला नाही. त्यामुळे सरकारी योजनांमध्ये गहू वितरणासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारात गव्हाचे दर काहीसे सुधारले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

केंद्राकडून चक्क भात लागवड वाढविण्याचे आवाहन

भाताला इतर पिकांच्या तुलनेत जास्त पाणी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात आणि गव्हाऐवजी इतर पिकांची लागवड करावी, असे आवाहन सरकार करत होते. मात्र सध्या सरकारकडील गहू आणि भाताचा साठा कमी झाला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भाताला चांगली मागणी आहे. त्यामुळे राज्यांनी खरिपात भात लागवडीवर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केले. सध्या देशातून तांदूळ निर्यात जोमाने सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चालू खरिपात भात लागवड करावी, असे आवाहन सरकारने केले आहे.

मे महिन्यात वाढली शेतीमालाची आयात

देशात शेतीमाल आयातीची गती मे महिन्यातही कायम राहीली. मे महिन्यात खाद्यतेलाची ९ लाख ८० हजार टनांची आयात झाली. मे महिन्यात खाद्यतेल आयात वाढेल, असा अंदाज यापुर्वीच वर्तविण्यात आला होता. कापूस आयातही २७ हजार टनांवर पोचली. महिनानिहाय विचार करता ही आयात सर्वाधिक आहे. त्यानंतर ६१ हजार टन कडधान्य देशात आले. यात तुरीचा वाटा अधिक आहे. तर मसाले आयात सुमारे ४१ हजार टन राहिली. विदेशातून शेतमाल आयातीचा दबाव देशांतर्गत बाजारावर पडतो. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

भारतीय तांदळाला का मिळतेय पसंती?

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तांदळाचीही टंचाई (Rice Shortage) जाणवत आहे. गव्हाचा पुरवठा (Wheat Supply) कमी झाल्यानंतर मागणी तांदळाकडे (Rice Demand) वाढली. मात्र महत्वाच्या तांदूळ उत्पादक देशांतच उत्पादनाला (Rice roduction) फटका बसला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचेही दर तेजीत आहेत. याचा फायदा भारताला होत आहे. सध्या पाकिस्तान, थायलंडसह इतर तांदूळ उत्पादक देशांनी दर वाढविले आहेत. भारतीय तांदूळ या देशांच्या तुलनेत स्वस्त पडतो. सध्या पाकिस्तान आणि थायलंडच्या तुलनेत भारतीय तांदूळ टनामागे ४० डाॅलरने स्वस्त आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारतीय तांदळाला पसंती दिली. मागील १० दिवसांत तुकडा तांदळाचे दरही वाढले.

त्यामुळे भारतातून तुकडा तांदळाची निर्यात वाढली आहे. बांगलादेशने तांदळावरील आयातशुल्क कमी केल्याने तेथून मागणी वाढलीय. तर चीन आणि आग्नेय आशिया देशांतूनही तुकडा तांदळाची मागणी वाढली आहे. चीन भारतीय तांदळाची मोठी खरेदी करत आहे. १०० टक्के तुकडा तांदळाची खरेदीही चीनकडूनच जास्त झाली. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते भारत यंदा २२० लाख टन तांदळाची निर्यात करेल. भारतीय तांदळाचे दर इतर देशांच्या तुलनेत स्पर्धात्मक आहेत. ५ टक्के तुकडा तांदूळ भारत ३३५ डाॅलर प्रतिटनाने निर्यात करत आहे. तर थायलॅंड ४२५, व्हिएतनाम ४२२ आणि पाकिस्तान ४०२ डाॅलरने देत आहे. तसेच २५ टक्के तुकडा तांदूळ भारत ३३२ डाॅलर, थायलॅंड ४२२, व्हिएतनाम ४०७ आणि पाकिस्तान ३८८ डाॅलर प्रतिटनाने निर्यात करत आहे. त्यामुळे सहाजिकच भारतीय तांदळाला अनेक देश पसंती देत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com